डंपर आंदोलन हिंसक
By admin | Published: March 6, 2016 12:56 AM2016-03-06T00:56:26+5:302016-03-06T00:56:26+5:30
जिल्हाधिकारी कचेरीची तोडफोड : पोलिसांचा लाठीमार; नीतेश राणेंसह १००जण ताब्यात
सिंधुदुर्गनगरी : शुक्रवारपासून सुरू झालेल्या डंपर चालक-मालक संघटनेच्या आंदोलनाला शनिवारी हिंसक वळण लागले. जिल्हाधिकारी भवनात घुसलेल्या आंदोलनकर्त्यांची धरपकड, कार्यालयाची नासधूस, पळापळ यामुळे जिल्हाधिकारी संकुलात एकच हलकल्लोळ माजला. जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला आलेल्या काँग्रेसच्या आमदार नीतेश राणे यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी दालनात घुसण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला. यावेळी झालेल्या पळापळीत व लाठीमारीत अनेक आंदोलक गंभीर जखमी झाले. आमदार नीतेश राणे यांच्यासह सुमारे १०० आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
जिल्ह्यात डंपर-चालक मालक संघटनेमार्फत जिल्हा प्रशासनाने घातलेल्या जाचक अटींविरोधात आंदोलन पुकारले आहे. याचाच भाग म्हणून शुक्रवारपासून सिंधुदुर्गनगरीतील प्रत्येक रस्त्यावर जिल्हाभरातून आलेले सर्व डंपर उभे करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने पासची अट शिथिल करावी, एसएमएस पद्धत बंद करावी, अशा मागण्यांसह काही मागण्या शिथिल व्हाव्यात म्हणून शनिवारपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे शनिवारी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय नेते, डंपरचे मालक व चालक गोळा झाले. आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, संजय पडते, अबिद नाईक, संदेश पारकर, आत्माराम पालेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, दत्ता सामंत, आमदार नीतेश राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, बाबा आंगणे आदी नेते मंडळींसह कार्यकर्ते उपस्थित होते. दुपारी ३ पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी आपणास भेट द्यावी. साडेतीन वाजेपर्यंत ते न आल्यास महामार्गावर रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आला. दरम्यानच्या कालावधीत या संपूर्ण जमावाकडून जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू होती.
दरम्यान, दुपारी ३.३० च्या सुमारास घटनास्थळी आमदार नीतेश राणे यांचे आगमन झाले आणि आंदोलनाची दिशाच बदलून गेली. नीतेश राणे यांच्यासह अनेक आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हरांड्यातील काचा आंदोलकांनी फोडल्या. जिल्हाधिकारी दालनासमोर येऊन दारावर जोरजोरात धक्काबुक्की करण्यात आली.
पोलीस उपअधीक्षकांनी सर्व जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, संतप्त झालेल्या जमावाने जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा घोषा सुरूच ठेवला होता. अखेर पाचजणांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यास जाईल असे ठरविण्यात आले. त्याचवेळी आंदोलकांकडून रेटारेटी सुरू होती. (प्रतिनिधी)
वैभव नाईकांनाही लाठीचा मार
आमदार वैभव नाईकही आंदोलकांसोबत उपोषणास बसले होते. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड सुरू केल्यानंतर पोलिसांनी लाठीमार सुरू केला. उपोषणास बसलेल्या आमदार नाईक यांनाही लाठीमाराचा फटका बसला. स्वत: जिल्हा पोलीस अधीक्षक लाठीमारासाठी उतरले होते.
गुंडगिरी खपवून घेणार नाही
डंपरचालक मालक संघटनेच्या लोकशाही मार्गाने चाललेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. अशा प्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असे जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे व जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.
पोलिसांचा लाठीमार
जिल्हाधिकारी दालनाबाहेरील आंदोलक नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहताच पोलिसांनी जमावकर्त्यांवर लाठीमार सुरू केला. याच दरम्यान आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी भवनाच्या दिशेने दगडफेकही सुरू केली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगविण्यासाठी लाठीमार सुरू केला.