डंपर संघटनेचे आंदोलन पेटले
By admin | Published: March 4, 2016 10:43 PM2016-03-04T22:43:57+5:302016-03-04T23:59:10+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डंपरांची रांग : आजपासून बेमुदत उपोषणास प्रारंभ
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा प्रशासनाच्या मनमानी व आडमुठ्या धोरणाचा निषेध म्हणून शुक्रवारी जिल्हाभरातील डंपर चालकांनी आपले डंपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून उभे केले. ही डंपरची रांग आरोस फाट्यापर्यंत गेल्यामुळे मुख्यालयात येणाऱ्या वाहनांना मोठी अडचण निर्माण झाली होती. जिल्हा व पोलीस प्रशासनाने हे धोरण असेच ठेवले तर उद्या शनिवारपासून बेमुदत उपोषणाचा इशाराही डंपर मालक चालक संघटनेने दिला आहे.
जिल्हा प्रशासनाच्या डंपर वाहतुकीबाबतच्या अत्यंत कठोर अशा निर्णयामुळे डंपर चालक मालक मेटाकुटीस आले आहेत. या संदर्भात वारंवार जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांना सांगूनही त्यांच्या धोरणात कोणताही फरक पडला नाही. या संदर्भात आज अखेर जिल्ह्यातील सर्व डंपर मालकांनी आपले डंपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून रहदारीचा रस्ता पूर्णपणे ठप्प ठेवला. यावेळी नित्यानंद शिरसाट, आबिद नाईक, दत्ता सामंत, संजय पडते, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, सभापती आत्माराम पालयेकर, उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, महेंद्र सांगेलकर, संदेश शिरसाट उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांना आमदार नीतेश राणे, आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत, मजूर संस्थेचे बाबा आंगणे यांनी पाठींबा दर्शविला.
चिरे, खडी, वाळूचा डंपर भरल्यावर तो दोन तासात त्याच्या निर्गतस्थळी जाणे आवश्यक आहे. तसेच डंपर क्षमतेपेक्षा जास्त भरल्यास त्याच्या कितीतरी पट अधिक दंडाची रक्कम वसूल करणे अशा जाचक अटी जिल्हा प्रशासनाने डंपर चालकांवर घातल्या आहेत. याच्या निषेधार्थ आजचा डंपर मालकांचा चक्का जाम होता.
डंपरवर असलेले चालक हे अशिक्षित असतात. त्यांना एस. एम. एस. पाठविणे शक्य नसते. जिल्ह्यात नेटवर्कही अनेक वेळा ठप्प असते. त्यामुळे या जाचक अटींचा नाहक त्रास डंपर मालकांना होतो. असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. सिंधुदुर्ग व्यतिरिक्त इतर कुठल्याही जिल्ह्यात अशा प्रकारच्या अटी नसताना सिंधुदुर्गातच प्रशासन एवढे कठोर पावले का उचलत आहे. याची कारणेही तपासण्यात यावी असेही ते म्हणाले. डंपर मालक बॅँकांची कर्जे घेऊन हा व्यवसाय सुरू ठेवत असतात. त्यामुळे डंपर मालकांना या सर्व प्रकारामुळे आत्महत्येची वेळ आली आहे.
यासर्व प्रकरणी डंपर मालकांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या. पोलीस प्रशासनानेही दारू, जुगार, मटका हे राजरोस होणारे धंदे सोडून वाळूच्या डंपरमागे आपली यंत्रणा जोरदार लावली आहे. त्यामुळे डंपर चालकांना चोरासारखी वागणूक दिली जात आहे. या सर्व प्रकारच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात उग्र निदर्शने करण्यात आली. ‘जिल्हाधिकारी हाय...हाय, अनिल भंडारी चले जाव’, अशा घोषणा देऊन निषेध नोंदवला. सकाळपासून जिल्ह्याभरातून येत असलेल्या डंपरमुळे सिंधुदुर्गनगरीतील सर्व रस्ते डंपरने व्यापले होते. त्यामुळे मुख्यालयात येणाऱ्या बसेस, खासगी वाहने व रिक्षा, मोटरसायकल यांना अडथळा झाला होता. जिल्हा व पोलीस प्रशासनाने हे धोरण असेच चालू ठेवले तर उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा डंपर संघटनेने दिला आहे. सायंकाळी उशीरापर्यंत डंपरचे चालक व मालक सिंधुदुर्गनगरीतील रस्त्यावर उभे
होते. (प्रतिनिधी)
डंपर मालकांचा गंभीर प्रश्न सुरू असतानाच पालकमंत्री मराठवाडा दौऱ्यावर, जिल्हाधिकारी नवी मुंबईत बैठकीला, आमदार मात्र समर्थन करताहेत अशी परिस्थिती त्यामुळे जिल्ह्याला वाली कोण? असा प्रश्न कणकवली मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे यांनी उपस्थित केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डंपर मालकांच्या आंदोलनाच्या ठिकाणी ते बोलत होते. डंपर मालक हे जिल्ह्याचे नागरिकच आहेत. त्यामुळे त्यांना नागरिक म्हणून वागणूक द्यावी. त्यांनी दिलेले निवेदन फाडून टाकले जाते. आपल्याकडे पाच हजार डंपर लावण्यासाठी एवढी जागा आहे अशी प्रशासन अधिकाऱ्यांकडून बेताल व उध्दट उत्तरे दिली जातात. त्यामुळे नागरिकांना न्याय मिळेल का? ही भीती आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास कॉँग्रेस पूर्णपणे त्यांच्या पाठीशी राहील. प्रसंगी कायदाही हातात घेऊ असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीमार्फत दिला.
सत्तेत असलो तरी सर्वसामान्यांसाठी लढणार
प्रशासन सर्वसामान्यांच्या विरोधात आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची त्यांची मानसिकता जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची राहिलेली नाही. सत्तेत असलो तरी सर्वसामान्यांच्या हक्कासाठी प्रसंगी कायदा हातात घेऊ , आंबा नुकसानी वाटप बाजूला ठेऊन तलाठी डंपर चालकांवर कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उतरताहेत. असे सांगत आमदार वैभव नाईक यांनी खंत व्यक्त केली व डंपर चालक मालक संघटनेने केलेल्या आंदोलनाला पाठींबा दिला.
कोणीच माघार घेईना
आपल्यावर होणाऱ्या अन्याया विरोधात डंपर संघटनेने बेमुदत आंदोलनास सुरवात केली. जिल्हाभरातील सर्व डंपर मुख्यालयात उभे करणार असल्याचा इशारा देण्यात आल्यामुळे सकाळपासून मुख्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या आंदोलनाच्या ठिकाणी महसूल अथवा पोलीस प्रशासनाच्या एकाही अधिकाऱ्याने संघटनेवाल्याशी चर्चा न केल्यामुळे प्रशासन विरूद्ध डंपर संघटना हा वाद पहिल्या दिवशी तरी मिटला नव्हता.
डंपर मुख्यालयात उभे
आंदोलनकर्त्यांनी शेकडो डंपर जिल्हाधिकारी भवनात उभे करत आपल्या स्वगृही रवाना झाले. उद्या याच ठिकाणी बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.