मळगाव येथे डंपर वाहतूक रोखली, शिवसेना पदाधिकारी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 03:55 PM2019-12-28T15:55:56+5:302019-12-28T15:57:58+5:30
सावंतवाडी येथील तहसील कार्यालयात गुरुवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी डंपर वाहतुकीमुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास विचारात घेता सुरळीत वाहतूक होण्यासाठी काही मुद्दे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे ठेवले होते. तसेच डंपर रोखण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यानुसार आज मळगाव मुख्य रस्त्यावर तसेच मळगाव-कुंभार्ली रस्त्यावर डंपर रोखण्यात आले.
सावंतवाडी : येथील तहसील कार्यालयात गुरुवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी डंपर वाहतुकीमुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास विचारात घेता सुरळीत वाहतूक होण्यासाठी काही मुद्दे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे ठेवले होते. तसेच डंपर रोखण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यानुसार आज मळगाव मुख्य रस्त्यावर तसेच मळगाव-कुंभार्ली रस्त्यावर डंपर रोखण्यात आले.
दरम्यान, यावेळी तेथे डंपर व्यावसायिक व पदाधिकारी आल्यानंतर त्याठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित गोते आणि पोलीस उपनिरीक्षक आण्णासो बाबर यांनी धाव घेत दोघांमध्ये सामंजस्य घडून यावर तहसीलदार म्हात्रे यांच्याशी चर्चा करण्याचे सुचविले. त्यानुसार येथील तहसील कार्यालयात आज मळगाव, निरवडे, मळेवाड ग्रामस्थांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत डंपर व्यावसायिकांची तहसीलदार म्हात्रे यांच्या उपस्थितीत बैठक सुरू झाली.
बैठकीच्या सुरुवातीलाच डंपर चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
शिवसेना पदाधिकारी व इतरांना जर कंपनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करायची होती तर डंपर रोखण्याचे कारणच काय, असा सवाल सांगेलकर यांनी केला.
डंपर व्यावसायिकांवर कोणाचीही दादागिरी खपून घेणार नाही. डंपरवर कारवाई होत असेल तर इतर गाड्यांवरही करायला हवी, असे ते म्हणाले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आबा कोंडुसकर यांनी सर्वसामान्य नागरिकांना डंपरमुळे उडणारी धूळ, बेदरकारपणे गाडी हाकणे, ओव्हरलोड वाहतूक करणे याचा त्रास होत असून, डंपरसाठी योग्य ताडपत्री द्यावी व योग्य पद्धतीने डंपर भरावा, अशी मागणी केली.
तर शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी मळगाव बाजारपेठ तसेच निरवडे, न्हावेली या गावात सुसाट पद्धतीने डंपर हाकले जात असून वारंवार अपघात होत आहेत. कालच निरवडे येथे एक अपघात झाला. अपघातातून एखाद्याचा जीव गेला तर त्याला कंपनी जबाबदार राहणार का? असे असेल तर आम्ही बैठकीला येत नाही.
मात्र, अपघात झाल्यावर कंपनीने एक लाख रुपये द्यावेत, अशी मागणी केली. यावर जितू गावकर यांनी असे झाल्यास चुकीच्या पद्धतीने कोणीही डंपर चालकांवर आळ घेईल, याकडे लक्ष वेधले. प्रशांत पांगम यांनी आमचा डंपर व्यवसायावरच रोजगार चालतो. अन्य उद्योगधंदे नाहीत. मग आम्ही काय करावे? असा सवाल केला.
डंपर वाहतुकीच्यावेळी नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? माणसाला दिलेले पैसे महत्त्वाचे नसतात, तर जीव महत्त्वाचा असतो, असे राऊळ यांनी सांगितले. यावर ज्या ठिकाणी अपघात किंवा नुकसान होते, त्यावेळी योग्य ती भरपाई दिली जाते, असे ठाकूर यांनी सांगितले.
तर यावेळी उमेश कोरगांवकर आणि चंद्रकांत कासार यानी डंपरचालकांना जी आचारसंहिता आखून दिली आहे, त्याचे त्यांनी पालन करायला हवे. पण तसे होताना दिसून येत नाही, अशी तक्रार केली. शेर्ला, दांडेलीतील रस्ते बरेच अरुंद आहेत. त्यामुळे इन्सुली खामदेव नाक्यावर तुमची सिक्युरिटी गार्ड ठेवा, अशी मागणी केली.
५ जानेवारीपर्यंत सर्व डंपरवर ताडपत्री घालावी!
सांगेलकर यांनी कर्ज काढून डंपर देण्यात आले आहेत आणि डंपर व्यावसायिक कर्जबाजारी आहेत, त्यांनी काय करावे, असा प्रश्न उपस्थित केला. यावर तहसीलदार म्हात्रे यांनी आपण स्वत: साक्षीदार असून, डंपर चालक डंपरवर योग्य जाळी बसवित नाहीत. त्यामुळे धूळ खाली पडते, रस्तेही घाण होतात. यासाठी ५ जानेवारीपर्यंत सर्व डंपरवर चांगली ताडपत्री घालावी. अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशा सूचना दिल्या.
यावेळी रुपेश राऊळ यांनी ताडपत्री नसेल तर डंपर सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. यावर कंपनीचे दत्ता कवठणकर आणि मनोज ठाकूर यांनी आम्ही ताडपत्री लावून घेऊ, पण कुठल्याही परिस्थितीत आम्ही वाहतूक थांबवू शकत नाही. त्यामुळे कंपनीला आणि व्यावसायिकांचे नुकसान होणार असल्याचे सांगितले.