शुटिंगबॉल स्पर्धेत दुर्गवाड संघ विजेता
By admin | Published: April 24, 2017 09:51 PM2017-04-24T21:51:59+5:302017-04-24T21:51:59+5:30
तळेरे येथील स्पर्धा : तळेरे संघाला उपविजेतेपद; ४0 संघांचा सहभाग
नांदगाव : तळेरे येथील खुल्या सेमी शुटिंगबॉल स्पर्धेत अंतिम विजेतेपद पटकावत दुर्गवाड (ता. कुडाळ) संघ सुनील तळेकर स्मृतिचषक २०१७ चा मानकरी ठरला, तर श्री गांगेश्वर क्रीडा मंडळ, तळेरे (अ) संघाला उपविजेतेपद मिळाले. या स्पर्धेत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील
४० संघांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचे उद्घाटन उद्योगपती श्रावणशेठ बांदिवडेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने, तर निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी सूर्यकांत तळेकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर गांगेश्वर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष तथा कणकवली उपसभापती दिलीप तळेकर, जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार, सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोज तळेकर, व्यापारी संघटना अध्यक्ष दत्तात्रय कल्याणकर, गांगेश्वर भजन मंडळ अध्यक्ष उदय पाटील, बाजारपेठ मित्रमंडळ अध्यक्ष उल्हास कल्याणकर, मॅजिक रिक्षा संघटना अध्यक्ष विशाल राणे, विश्वजित तळेकर, विजय पावसकर, शरद वरूणकर, दीपक जठार, उपसरपंच शशांक तळेकर, हनुमंत तळेकर, अविनाश वाड्ये, दशरथ चल्हाण, गांगेश्वर मित्रमंडळ घाडीवाडी अध्यक्ष अनित घाडी, उमाजी तळेकर, नंदकुमार तळेकर, विजय तळेकर, जनार्दन तळेकर, आदी उपस्थित होते.
तळेरे होळी चव्हाटा येथे पार पडलेल्या या स्पर्धेचे आयोजन श्री गांगेश्वर क्रीडा मंडळाच्यावतीने करण्यात आले. विविध जिल्ह्यातील मातब्बर संघांनी आपल्या सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
या स्पर्धेत अंतिम विजेता ठरलेल्या दुर्गवाड संघाला रुपये ८८८८, उपविजेत्या श्री गांगेश्वर क्रीडा मंडळ, तळेरे (अ) संघाला रुपये ५५५५, तर उपांत्य फेरीतील पराभूत संघ वेताळ बांबर्डे व सातेरी पणदूर संघांना प्रत्येकी रुपये १५००, तसेच प्रत्येकाला आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
तसेच वैयक्तिक बक्षिसांमध्ये उत्कृष्ट शूटर - तावडे (वेताळ बांबर्डे), उत्कृष्ट लिफ्टर - नमित घाडी (गांगेश्वर तळेरे), उत्कृष्ट नेटमन -अरबाज (दुर्गवाडा) यांना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना सूर्यकांत तळेकर म्हणाले की, अशा प्रकारच्या क्रीडा, सामाजिक, कृषी व शैक्षणिक उपक्रमांमधून सुनील तळेकर याच्या स्मृतींना उजाळा दिला जात आहे. याबद्दल तुम्ही सर्वजण कौतुकास पात्र आहात. खरेतर एक दिवसाची स्पर्धा असली तरी त्यामागे मेहनत आणि नियोजन खूप महत्त्वाचे असते. अशाप्रकारचे उपक्रम राबवा, आम्ही त्याला नेहमीच सहकार्य करू, असेही ते म्हणाले. यावेळी दिलीप तळेकर व रवींद्र जठार यांनी मनोगत व्यक्त केले.
या स्पर्धेचे समालोचन शशांक तळेकर, दर्शन घाडी, मनोज तळेकर, अनिल जाधव यांनी तर पंच म्हणून नामदेव बांदिवडेकर, शैलेश सुर्वे, महेश पाताडे, स्वप्निल कुलकर्णी यांनी केले. स्पर्धा यशस्वीपणे पार पडण्यासाठी श्री गांगेश्वर क्रीडा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी पंचायत समिती सदस्य अमरसेन सावंत, प्रकाश पारकर, रंजन राणे, वारगांव उपसरपंच एकनाथ कोकाटे, आदींनी भेट दिली. त्यांचे मंडळाच्यावतीने स्वागत करण्यात आले. (वार्ताहर)
नीटनेटके आयोजन
श्री गांगेश्वर क्रीडा मंडळाच्यावतीने प्रथमच खुल्या सेमी शुटिंगबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या नीटनेटक्या नियोजनाबद्दल अनेकांनी गौरवोद्गार काढले.
विशेष सत्कार
नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रवींद्र जठार, कणकवली उपसभापती दिलीप तळेकर, क्रीडा मंडळाचे आश्रयदाते, उद्योगपती श्रावणशेठ बांदिवडेकर, जमीन मालक उदय पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार श्री गांगेश्वर क्रीडा मंडळाच्यावतीने करण्यात आला.