ऐन हंगामात शेतकऱ्यांवर काळाचा घाला
By admin | Published: May 15, 2016 12:18 AM2016-05-15T00:18:51+5:302016-05-15T00:18:51+5:30
२० लाखांची हानी : मळगावात काजू, आंबा बागेला आग
तळवडे : मळगाव-कोमोळ तळी याठिकाणी रेल्वे ट्रॅकलगत असलेल्या २५ एकर जागेत असणाऱ्या आंबा, काजू बागेस आग लागून २० ते २२ लाख रूपयांची हानी झाली आहे. काबाडकष्टातून फुलविलेली आंबा-काजू, माडाची झाडे ऐन हंगामात क्षणार्धात आगीत होरपळून खाक झाली. ही आग दुपारी एकच्या सुमारास ऐन उन्हाच्या कडाक्यात लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, ही आग कशामुळे लागली, याचे कारण समजू शकले नाही.
मळगाव येथील रेल्वे स्थानकाच्या शेजारील असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या आंबा, काजूच्या बागा आहेत. शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास या बागांना अचानक आग लागली. ऐन दुपारच्या कडक उन्हातच ही आग लागल्याने क्षणार्धात आगीचा भडका उडाला. बघता बघता ही आग दुरवर विस्तारली. काही कळायच्या आतच आगीचे लोट आकाशात जाऊन शेजारच्या बागांमध्ये आग शिरली. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पण विस्तारलेल्या आगीने ते कठीण बनले होते.
शेवटी सावळवाडा येथील ग्रामस्थांनी ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील बागांवरील अनर्थ टळला.
दरम्यान, या आगीमध्ये मळगावातील शेतकरी श्रीधर गावकर, सोमा गावकर, बबन गावकर, विजय सावळ, द्वारकानाथ सावळ, नंदकिशोर सावळ, रमेश सावळ, प्रशांत राऊळ या शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. घटनास्थळी मळगाव सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य गजानन सातार्डेकर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप सोनुर्लेकर, विजय हरमलकर, महेश शिरोडकर, पोलीस पाटील रोशनी जाधव, ग्रामपंचायत सदस्य आनंद देवळी आदी घटनास्थळी उपस्थित होते.
दरम्यान, या आगीने शेतकऱ्यांचे जवळपास वीस ते पंचवीस लाखाचे नुकसान झाले असून शासनामार्फत भरपाई देण्याची मागणी पंचक्र ोशीतून होत आहे. (प्रतिनिधी)
अश्रू आणि
घामाच्या धारा...
अनेक वर्षाच्या मेहनतीने उभारलेल्या बागा ऐन हंगामात डोळ्यासमोर क्षणार्धात पेटता पाहणाऱ्या शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. ही आग विझविण्याचा प्रयत्न करताना शेतकऱ्यांच्या हातात पाणी होते तर डोळ्यांतून अश्रूंच्या व अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. डोळ्यासमोरच उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत होरपळल्याने शेतकरीही हवालदिल झाले होते. हे दृश्य पाहणारेही भावूक झाले होते.