भर पावसातही पालखी फिरली चतु:सीमा

By admin | Published: June 21, 2016 07:08 PM2016-06-21T19:08:11+5:302016-06-21T19:08:32+5:30

राजापूर तालुका : आडिवरे येथील श्रीदेवी महाकालीच्या पालखीसाठी ग्रामस्थांची उपस्थिती

During the rainy season, there is a roundabout: boundary | भर पावसातही पालखी फिरली चतु:सीमा

भर पावसातही पालखी फिरली चतु:सीमा

Next

अरूण आडिवरेकर -- रत्नागिरी --अंगावर पडणारा पाऊस... काट्याकुट्यातून जाणारा मार्ग... कंबरेभर पाण्यातून जाणारी वाट... होडीच्या हेलकाव्यातून जाणारी पालखी... ढोलताशांचा निनाद... त्यासोबत नाचणाऱ्या अबदागिरी... चार दिवस न थकणारे पाय... घरोघरी देवीची भरली जाणारी ओटी अशा भक्तीपूर्ण आणि तितक्याच उत्साहात पार पडली. आडिवरे येथील श्रीदेवी महाकालीची चतु:सीमा फेरी व पालखी भेटीच्या या सोहळ्यात सर्व गाव एकत्र आला होता. राजापूर तालुक्यातील आडिवरे येथे श्रीदेवी महाकालीचे जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारी म्हणून या देवीची महती आहे. याठिकाणी शिमगोत्सव आणि नवरात्रोत्सव हे दोन मोठे उत्सव साजरे होतात. इतर देवतांप्रमाणे या देवीची पालखी नवरात्रोत्सवाशिवाय मंदिराबाहेर पडत नाही, हे विशेष आहे. शिमगोत्सवातही पालखी देवदर्शनासाठी निघत नाही. देवीला कौल लावण्याची प्रथा असून, हा कौल मिळाल्यानंतर देवीची पालखी फिरण्यासाठी बाहेर पडते. यावर्षी ७ ते १० जून या कालावधीत देवीची पालखी चतु:सीमा फिरण्यासाठी बाहेर पडली होती.
देवीचा कौल घेतल्यानंतर श्रीदेवी महाकाली, श्रीदेवी महालक्ष्मी, श्रीदेवी महासरस्वती, श्रीदेव रवळनाथ, श्रीदेव नगरेश्वर या देवतांचे मुखवटे पालखीत ठेवून पालखी ढोल-ताशांच्या गजरात चतु:सीमा फिरण्यासाठी बाहेर पडते. राजरस्त्याने जाऊन पहिल्या दिवशी ही पालखी कोंडसर खुर्द येथील श्री सत्येश्वर मंदिरात ठेवली जाते. तेथून दुसऱ्या दिवशी नवेदर मार्गावरून मोगरे येथील लक्ष्मीनारायण मंदिरात आणली जाते. तिथे थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही पालखी वेत्ये येथे येण्यासाठी निघते. भराडे वाड्यातून निघून वाडापाणेरे, कांगापूर, वाडातिवरे, तिवरे येथून ही पालखी वेत्ये येथे येते. याठिकाणी येत असताना वेत्ये येथील खाडीतून पालखी आणली जाते. यावेळी खाडीतून पालखीचा होणारा प्रवास विलोभनीय असतो. तेथून ज्याठिकाणी देवीची मूर्ती सापडली तेथे पालखी वेत्येतील ग्रामस्थांकडे दिली जाते. ती कालिकावाडीतील शंकरेश्वर मंदिरात येते. तिथून ती वाडीखुर्दातून वाडापेठ येथील पिंपळावर येते. तिथे नारळाचा प्रसाद करून दिला जातो. तेथून ही पालखी मंदिरात आणून पुन्हा पूजाअर्चा करून कौल लावण्यात येतात. देवीच्या स्वागतासाठी घरोघरी रांगोळ्या काढलेल्या असतात.रात्री उशिरापर्यंत देवीची ओटी भरण्यासाठी व दर्शनसाठी महिलावर्गासह लहान मुलांची गर्दी असते. ज्याठिकाणी सीमा बदलते त्याठिकाणी गाऱ्हाणे घालण्याची प्रथा आहे. त्याप्रमाणे गाऱ्हाणे घालण्यात येतात. या पालखी सोहळ्यात संपूर्ण गाव सहभागी होतो. यावेळी भक्तीपूर्ण वातावरणात व मोठ्या आनंदात या सोहोळ््याचा आनंद येथे लुटला जातो.

माहेरवाशीणी नाही थांबत घरी ---वेत्ये येथे देवी माहेरवाशीण म्हणून येते. तिची ओटी भरण्यासाठी वेत्ये येथे माहेरवाशीणीदेखील हजर राहतात. पण, पालखी ओटी भरून झाल्यानंतर तेथे न थांबता निघून येते. त्यामुळे येथील माहेरवाशीणीदेखील तेथे त्या रात्री थांबत नाहीत.

पावसाचाही दिलासा --देवीची पालखी ज्या भागात फिरत होती, तेथे पावसाचा थेंबही नव्हता. पण मोगरे येथील लक्ष्मीनारायण मंदिरात पालखी जाताच पावसाने जोरदार सुरूवात केली. तशीच प्रचिती कालिकावाडी येथेही आली. कालिकावाडीत पालखी असताना वाडापेठ येथे तुफान पाऊस पडत होता. पण पालखीच्या ठिकाणी पाऊसच नव्हता. तर पालखी कालिकावाडीतील शंकरेश्वर मंदिरात जाताच मुसळधार पावसाने झोडपून काढले.

गुढ्या उभारून स्वागत --देवीचे माहेरघर म्हणून वेत्ये या गावाची ओळख आहे. याठिकाणी देवीची मूर्ती सापडली त्यामुळे या गावाला तिचे माहेर म्हटले जाते. देवी येणार म्हणजे ग्रामस्थांसाठी आनंदाचा क्षण असतो. देवीच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी दारोदारी गुढ्या, तोरणं उभारली होती. घरासमोर सडा - रांगोळीही काढण्यात आली होती.


-आडिवरे येथील श्रीदेवी महाकालीचे जागृत देवस्थान.
-देवीचा कौल मिळाल्यानंतर पालखी पडते बाहेर.
-केवळ नवरात्रोत्सवातच देवीची पालखी पडते बाहेर.
-शिमगोत्सवात इतर देवतांसारखी पालखी बाहेर पडत नाही.

Web Title: During the rainy season, there is a roundabout: boundary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.