शिवाजी महाराजांच्या काळात वतनापेक्षा इमानदारीला महत्व - शिवचरित्रकार डाॅ.शिवरत्न शेट्ये 

By अनंत खं.जाधव | Published: February 27, 2023 07:30 PM2023-02-27T19:30:23+5:302023-02-27T19:30:56+5:30

'प्रतापगडाचा रणसंग्राम केवळ अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणे एवढीच मर्यादित ही घटना नाही'

During Shivaji Maharaj time honesty was more important than homeland says Shiv biographer Dr Shivaratna Shetye | शिवाजी महाराजांच्या काळात वतनापेक्षा इमानदारीला महत्व - शिवचरित्रकार डाॅ.शिवरत्न शेट्ये 

शिवाजी महाराजांच्या काळात वतनापेक्षा इमानदारीला महत्व - शिवचरित्रकार डाॅ.शिवरत्न शेट्ये 

googlenewsNext

सावंतवाडी : शिवाजी महाराजांच्या काळात सुध्दा फोडाफोडीचे राजकारण करण्यात आले पण शिवाजी महाराज हुशार आणि संयमी असल्यामुळेच स्वराज्य निर्माण होवू शकले. त्यावेळी वतनापेक्षा इमानदारीला महत्व होते, असे उद्गार शिवचरित्रकार तथा हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवरत्न शेट्ये यांनी काढले.

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या शिवजागराच्या निमित्ताने शेट्ये यांचे  येथील राजवाड्यात प्रतापगडाचा रणसंग्राम’ या विषयावर व्याख्यान पार पडले.

यावेळी खेमसावंत भोसले, शुभदादेवी भोसले, लखम सावंत- भोसले, भोसले नॉलेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, डॉ. प्रवीण ठाकरे, डॉ. उदय नाईक, ॲड. शामराव सावंत, डॉ. जी.ए. बुवा, अन्नपूर्णा कोरगावकर, राष्ट्रीय साक्षी वंजारी,वाय. पी. नाईक, डॉ. विशाल पाटील आदि उपस्थित होते.

शेट्ये म्हणाले,  विलक्षण बुद्धीचातुर्य, अत्यंत नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि गनिमी कावा या साऱ्यांची जगाला प्रचिती देणारे युद्ध म्हणजे प्रतापगडाचा रणसंग्राम होय. अफाट फौजेनिशी आलेल्या अफजलखानाला मराठ्यांच्या अतुलनीय शौर्याने प्रतापगडावरच संपविले. यामागे  शिवरायांची अलौकिक बौद्धिक क्षमता तर होतीच शिवाय त्यांच्याजवळ असलेले त्यांचे विशेष वकील पंतोजी गोपीनाथ बोकील यांची प्रसंगावधान कूटनीती आणि गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची मुत्सद्येगिरी देखील महत्वपूर्ण व निर्णायक ठरली. 

१० नोव्हेंबर १६५९ रोजी दुपारी दीड वाजता छत्रपती शिवराय व अफजल खान यांची झालेली भेट आणि त्यानंतर अफजलखानाने गमावलेला प्राण ही घटना म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना होती. मराठ्यांना त्यांच्या पराक्रमाची जाणीव या घटनेमुळे तर झालीच, परंतु छत्रपती शिवरायांच्या शौर्याची गाथा अफगाणिस्तान, तुर्कस्तान, सौदी अरेबिया, इंग्लंड अशा अनेक देशांपर्यंत पोहोचली. म्हणूनच प्रतापगडाचा रणसंग्राम केवळ अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणे एवढीच मर्यादित ही घटना नाही, तर जगातील सर्वोत्तम युद्धांपैकी एक आहे, असे इतिहासकार सेतू माधव पगडी लिहितात, असेही भाष्य शिवरत्न शेटये यांनी केले.

छत्रपती शिवरायांनी आपल्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात जीवाला जीव देणारे सवंगडी, मित्र व मावळे तयार केले. म्हणूनच ‘स्वराज्य’ उभे राहू शकले. स्वतः च्या मुलाचे लग्न बाजूला करून कोंढाणा घेण्यासाठी जीवाचे बलिदान देणारे तानाजी मालुसरे, सिद्धी जोहरशी प्राणपणाने लढणारे शिवा काशीद, फक्त ३०० मावळ्यांना घेऊन घोडखिंड लढणारे बाजीप्रभू देशपांडे, तसेच महाराजांसाठी स्वतःचे प्राण सदैव वेचण्यासाठी तयार असलेले जिवाजी महाले, हिरोजी इंदुलकर, येसाजी कंक, कोंडाजी फर्जंद असे कितीतरी निष्ठावान मावळे महाराजांनी तयार केले म्हणूनच छत्रपती शिवराय हे केवळ पन्नास वर्षाच्या आयुष्यात शेकडो गड किल्ले जिंकून स्वराज्य उभे करू शकले. मात्र अलीकडे स्वार्थासाठी निष्ठा विसरून गेलेले राज्यकर्ते निर्माण झाले आणि म्हणूनच स्वराज्याचे सुराज्य होऊ शकले नाही, अशीही खंत शेटये यांनी व्यक्त केली.

Web Title: During Shivaji Maharaj time honesty was more important than homeland says Shiv biographer Dr Shivaratna Shetye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.