दत्ता सामंत यांनाही विधिमंडळात नेणार!, माजी खासदार निलेश राणेंचा ठाम विश्वास
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 24, 2022 12:23 PM2022-08-24T12:23:59+5:302022-08-24T12:25:01+5:30
विरोधकांनी कितीही विष कालवलं तरी राणे आणि सामंत वेगळे होणार नाहीत
मालवण (सिंधुदुर्ग) : मालवण-कुडाळ विधानसभा मतदारसंघातून मी आमदार व्हावे या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. मात्र मी कोणत्या पदावर जावे ही देवाची इच्छा. लोकांसाठी, समाजासाठी काम करत राहायचे. याच भावनेतून काम करत असताना पक्षाचे आदेश व देवाच्या इच्छेने आमदार झालो तर माझ्या नंतर दत्ता सामंत यांनाही त्याच सन्मानाने विधिमंडळात नेणे हेच माझे प्रयत्न राहतील. असे ठाम मत भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी मालवण घुमडे येथे बोलताना व्यक्त केले.
दत्ता सामंत यांच्या वतीने घुमडाई मंदिर येथे आयोजित भजन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी निलेश राणे व दत्ता सामंत यांची दिलखुलास भाषणे झाली. राजकीय टोलेबाजीही यावेळी रंगली.
यावेळी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी दत्ता सामंत यांच्या भजन स्पर्धा आयोजनाचे कौतुक केले. सामंत यांचे कार्य व कार्यक्रम कधीच फायद्यासाठी नसतात तर सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी असतात. तसेच त्यांचे कार्यक्रम आयोजन वेगळ्या उंचीचे व दर्जेदार असतात. ही भजन स्पर्धाही यशस्वी झाली.
यालाही मनाचा मोठेपणा लागतो
याठिकाणी दत्ता सामंत यांच्यासह सगळेच माझ्या आमदारकीसाठी सदिच्छा व्यक्त करतात. मात्र मी कोणत्या पदावर जावे ही देवाची इच्छा पक्षाचे आदेश असतील. मात्र दत्ता सामंत सारखी माणसे मनाने मोठी आहेत. दुसऱ्याला मोठे करणे, मोठे व्हा हे त्यांचे सांगणे यालाही मनाचा मोठेपणा लागतो. त्यांनी माणसे कमावली. राणे साहेबांसोबत ते निष्ठेने राहिले. राजकारणसाठी त्यांनी काही केले नाही. केवळ समाजकारण केले. जनतेची सेवा हीच राणे साहेबांची शिकवण आहे. त्याच धर्तीवर आम्हीही कार्य करतो. दत्ता सामंत आणि आमच्यात आपुलकीचे नाते आहे. आम्ही सांघिक खेळ खेळतो. मैदानात खेळ खेळायला आम्हाला आवडते. म्हणजेच सर्वांसोबत राहायला आम्हाला आवडते. जनता हेच आमच्यासाठी सर्वस्व आहे.
कितीही विष कालवलं तरी राणे-सामंत वेगळे होणार नाहीत
सर्वांच्या आशिर्वादाने मी आमदार झालो तर विधिमंडळ सभागृहात दत्ता सामंतही असतील हे निश्चित. दत्ता सामंत माझे मोठे भाऊ आहेत आणि हे नाते कायम राहील. मी पक्षाकडे त्यांच्यासाठी शिफारस करणार. विरोधकांनी कितीही विष कालवलं तरी राणे आणि सामंत वेगळे होणार नाहीत. त्यांच्यात दुरावा असणार नाही असेही निलेश राणे यांनी सांगितले.