वेंगुर्लेतील सुरुचे बन, बीच परिसरातील झाडांची कत्तल, तहसीलदारांकडे तक्रार : वृक्षतोडीचा महसूलकडून पंचनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 01:20 PM2017-11-29T13:20:59+5:302017-11-29T13:43:29+5:30
वेंगुर्ले तालुक्यात सुरुचे बन व बीच असलेल्या सागरेश्वर मंदिरालगतच्या ३० वर्षांच्या ४० ते ५० फूट उंचीच्या सुमारे ३० झाडांची कत्तल मंगळवारी व बुधवारी करण्यात आली. या तोडीबाबत स्थानिक उभादांडा ग्रामपंचायतीकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी वेंगुर्ले तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार महसूल विभागामार्फत पंचनामा करण्यात आला आहे.
वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यात सुरुचे बन व बीच असलेल्या सागरेश्वर मंदिरालगतच्या ३० वर्षांच्या ४० ते ५० फूट उंचीच्या सुमारे ३० झाडांची कत्तल मंगळवारी व बुधवारी करण्यात आली. या तोडीबाबत स्थानिक उभादांडा ग्रामपंचायतीकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी वेंगुर्ले तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार महसूल विभागामार्फत पंचनामा करण्यात आला आहे.
शासन दरवर्षी एक कोटी वृक्ष लागवड करते. वृक्षसंवर्धनासाठी राष्ट्रीय स्तरावर अभियान हाती घेण्यात आले असताना समुद्र्र किनाऱ्याला लागून असलेल्या आणि सामाजिक वनीकरण विभागाने लागवड केलेल्या सुरुच्या झाडांची कत्तल करणे संतापजनक असल्याची प्रतिक्रिया भाजपचे तालुका उपाध्यक्ष चिंतामणी धुरी यांनी व्यक्त केली आहे.
या वृक्षतोडीबाबत उभादांडा ग्रामपंचायत, वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय किंवा अन्य शासकीय स्थानिक कार्यालयांना माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांतून शासनाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. तलाठ्यांनी घटनास्थळी पंचयादी घातली. त्यावर ग्रामस्थ चिंतामणी धुरी, रत्नाकर वराडकर, मधुसूदन तिरोडकर, शंकर माने यांनी सह्या केल्या आहेत.
उभादांडा सागरेश्वर मंदिर येथील सर्व्हे नं. ४७ मधील असलेल्या सुरुच्या बनातील अवैध वृक्षतोड करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. अन्यथा आंदोलन करावे लागेल, अशा इशारा उभादांडा परिसरातील चिंतामणी धुरींसह ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर रत्नाकर वराडकर, प्रदीप परुळेकर, विजय सांडये, मधुकर तिरोडकर, आंद्रू फर्नांडिस, जयवंत दीपनाईक यांच्यासह २८ जणांच्या सह्या आहेत.
वृक्षतोड शासकीय परवानगीनेच : संजय कल्पे
वेंगुर्ले सागरेश्वर बीच येथील सुरुच्या झाडांची तोड तेथे स्वदेश भ्रमण अंतर्गत होणाऱ्या इंडोनेशिया कॉटेज प्रकल्पासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मंडळाच्या बांधकाम विभागाच्या अहवालानुसार शासनाची परवानगी घेऊन केल्याची माहिती एमआयडीसीचे सिंधुदुर्ग-रत्नागिरी विभागाचे संजय कल्पे यांनी दिली.
इंडोनेशिया कॉटेजला सीआरझेडची परवानगीही शासनाने दिली आहे. झाडे तोडण्यासंदर्भात निविदा वा त्या झाडांचा लिलाव याबाबत वरिष्ठ स्तरावरुन प्रक्रिया झालेली आहे. त्यामुळे हा झाडांची गैरतोड वा चोरीचा विषय नाही, असे कल्पे यांनी स्पष्ट केले.