कालव्याला भगदाडाचे ग्रहण
By admin | Published: February 5, 2016 10:40 PM2016-02-05T22:40:36+5:302016-02-05T23:56:43+5:30
तिलारीत कोट्यवधीचा निधी : आभाळंच फाटलंय, ठिगळं लावणार तरी कुठे ?
वैभव साळकर -- दोडामार्ग तिलारी प्रकल्पाला गेल्या दोन वर्षापासून कालवा फुटीचे ग्रहण लागले आहे. मागील दोन वर्षात तब्बल सातवेळा कालव्यांना भगदाड पडण्याच्या घटना घडल्या. पाटबंधारे विभागाकडून कोट्यवधीचा निधी कालव्याच्या कामावर खर्ची झाला असतानाही कालवे फुटत आहेत. त्यामुळे हा निधी नेमका झिरपला कोठे, हे शोधून काढणे संशोधनाचा विषय ठरला आहे. गेल्या दोन महिन्यात तर कालव्यांना भगदाड पडण्याच्या सपाटा सुरू आहे. त्यामुळे कालव्यांंची कामे निकृष्ट पद्धतीने झाली असल्याचेच निदर्शनास येत आहे. तर कालव्याची पाहणी केली असता बऱ्याच ठिकाणी भविष्यात आणखीन भगदाडे पडण्याची शक्यता आहे. परिणामत: आभाळच फाटल्याने ठिगळे तरी कुठे-कुठे लावणार, अशा अवस्थेत कालवा विभागाचे अधिकारी सापडले आहेत. गोवा आणि महाराष्ट्र राज्यांच्या संयुक्त विद्यमाने तिलारी आंतरराज्यीय प्रकल्प साकारला आहे. ७४ टक्के वाटा गोव्याचा, तर उर्वरित २६ टक्के वाटा महाराष्ट्राचा असे समीकरण प्रकल्पाबाबत करार करताना दोन्ही राज्य शासनादरम्यान ठरले. जसा खर्चाचा वाटा तसाच पाण्याचादेखील ठरविण्यात आला. प्रकल्पाचे पाणी गोव्यात नेण्यासाठी कालव्यांची कामे युद्धपातळीवर करण्यात आली. सन १८८० च्या दरम्यान सुरू झालेले धरणाचे काम सन २०१५ पर्यंत पूर्ण करण्यात आले. सुरूवातीला ४८ कोटीपर्यंत अंदाजपत्रक असलेला हा प्रकल्प दीड हजार कोटीवर जाऊन पोहोचला. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रूपयांचा निधी प्रकल्पावर खर्ची घालण्यात आला. यातील बराचसा निधी मुख्य धरण व कालव्याच्या कामावर खर्ची घालण्यात आला. गोव्यात पाणी नेण्यासाठी दोन कालवे काढण्यात आले आहेत. मुख्य धरणाचे पाणी डाव्या कालव्याद्वारे गोव्यात डिचोली तालुक्यात, तर तेरवण मेढे उन्नेयी बंधाऱ्याचे पाणी पेडणे तालुक्यात सोडण्यात येते. त्यापैकी डाव्या कालव्याची लांबी १८.३७९ किलोमीटर आहे, तर उजव्या कालव्याची लांबी २४.६९२ किलोमीटर आहे. या दोन्ही कालव्यांवर कोट्यवधीचा निधी खर्ची घालण्यात आला. ज्या पद्धतीने पाण्यासारखा निधी खर्ची घालण्यात आला, त्या अनुषंगाने कालव्याची कामे सुद्धा दर्जेदार होणे अपेक्षित होते. परंतु कालव्यातून पाणी सोडून १२ ते १५ वर्षे होतात तोच कालवे ढासळण्याचे प्रकार घडू लागले आहेत. गेल्या दोन वर्षात कालव्याला भगदाड पडणे, फुटणे, असे प्रकार सातत्याने होत आहेत. त्यामुळे खरोखरच कालव्यांची कामे दर्जेदार झाली आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या दोन वर्षात तब्बल सातवेळा कालवे फुटले आहेत. काही ठिकाणी भगदाडे पडली आहेत. त्यामुळे निकृष्ट कामाचे नमुने चव्हाट्यावर आले आहेत. पाटबंधारे विभाग कोट्यवधी रूपयांचा निधी खर्ची घालतो. मग हा निधी जातो तरी कोठे? असा प्रश्न आता सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे. दोन वर्षापूर्वी सर्वात प्रथम खानयाळे याठिकाणी डावा कालवा फुटण्याची घटना घडली. त्यानंतर ठराविक काळाने एका पाठोपाठ एक कालव्यांना भगदाडे पडण्याच्या घटना घडत गेल्या. उजव्या कालव्याला तिलारी, घोटगेवाडी याठिकाणी, तर डाव्या कालव्याला खानयाळे ते बोडदे यादरम्यान भगदाडे पडली.
उर्वरित कालव्याची पाहणी केली, तर अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्याठिकाणी कालवा फुटण्याची किंवा भगदाड पडण्याची शक्यता अधिक आहे. सध्या कालव्याचे गोव्यात जाणारे पाणी बंद आहे. त्यामुळे कालव्यांची झालेली परिस्थिती स्पष्टपणे दिसते. प्लास्टिक कापडावर कालव्यांना सिमेंंट-काँक्रिटच देण्यात आलेला मुलामा केव्हाचाच निखळून पडला आहे.
तर अनेक ठिकाणी गाळ साचला आहे. त्यामुळे भविष्यात कालव्यांच्या सुरक्षेबाबत सध्यातरी सांगणे कठीण आहे. ज्याठिकाणी भगदाडे पडली आहेत, त्याठिकाणी केवळ तकलादू उपाययोजना करून वेळ मारून नेण्याचा प्रकार कालवा विभागाकडून सुरू आहे.
देशभरात कामे रखडली : पंतप्रधान निधीबाबत माहिती देण्याची मागणी
देशभरात रखडलेल्या धरणांची कामे युद्धपातळीवर व्हावीत, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निधी देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार तिलारी धरणाला पंतप्रधान निधीतून ३२० कोटी रूपयांचा निधी मिळण्याची अपेक्षा आहे. आठ दिवसांपूर्वीच राज्याचे पाटबंधारे खात्याचे सचिव तिलारीला भेट देऊन गेले. मात्र, हा निधी कोणत्या कामांवर खर्च होणार, हे जाहीर करावे आणि कालव्यांच्या आतापर्यंतच्या झालेल्या कामांची चौकशी व्हावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांकडून होत आहे.