पर्यावरणपूरक प्रकल्प राबविणार
By admin | Published: June 5, 2016 10:53 PM2016-06-05T22:53:57+5:302016-06-06T00:50:33+5:30
दीपक केसरकर : जिल्ह्याच्या विकासासाठी हा केवळ ट्रेलर, पिक्चर बाकी आहे
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गचा आर्थिक विकास साधताना जिल्ह्याचे कोकणपणही जपले गेले पाहिजे. कोकणची शक्ती आपण अद्याप ओळखू शकलेलो नाही. म्हणूनच येथील लोकांच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणपूरक प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. ग्रामीण पर्यटनात सध्या केवळ पाच समूह घेण्यात आले आहेत. मात्र पावसाळ्यानंतर जिल्ह्यातील उर्वरित ग्रामीण पर्यटन समूह (गाव) या योजनेत समाविष्ट केले जातील, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले. जिल्ह्याच्या विकासाचा हा केवळ ट्रेलर आहे. अजून पिक्चर बाकी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
ग्रामीण पर्यटन आराखडा सादरीकरणानंतर ते पत्रकारांशी शरद कृषी भवन येथे बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगांवकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्गचा विकास करताना येथील निसर्ग पाहता पर्यावरणपूरक प्रकल्प निसर्गाची जपणूक व शाश्वत विकास असावा या दृष्टीने या आराखड्यांचे सादरीकरण रविवारी करण्यात आले असे सांगून पालकमंत्री केसरकर म्हणाले की, सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. परंतु त्याच्या अंतर्गत अनेक सुंदर गाव आहेत. या सर्व गावांची पर्यटनाशी सांगड घालून ग्रामस्थांचा आर्थिकदृष्ट्या विकास व्हावा या दृष्टीने कोकण ग्रामीण पर्यटन समूह आराखडा बनविण्यात आला आहे.
हा आराखडा रचना संसद या संस्थेने त्यांच्या अभ्यासक्रमात या विषयाचा अंतर्भाव करून केला आहे. यासाठी त्यांना कोणतेही वेगळे शुल्क देण्यात आलेले नाही. केवळ त्यांचा येण्याजाण्याचा खर्च करण्यात आला होता.
या संस्थेने विजयदुर्ग, सावडाव, आचरा, आंबोली, परुळे या पाच गावांना केंद्रबिंदू ठेवून पर्यटनदृष्ट्या समूहांचा अभ्यास करून आराखडा बनविला आहे. यात पर्यावरणपूरक बाबींना जास्त महत्व देण्यात आले आहे. या दृष्टीने लवकरच कामही सुरु करण्यात येईल.
यासाठी स्वदेश भ्रमण योजनेंतर्गत ८२ कोटी रुपये मंजूरही झाले आहेत. यानंतर जिल्ह्यातील इतरही समूहांचा विचार करण्यात येणार आहे.
या योजनांमधून पायाभूत सुविधा निर्माण करणे, लोकांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी मिळवून देणे तसेच कृषीपूरक व्यवसाय व उद्योग यांची साखळी तयार करणे हा उद्देश आहे. यासाठी महिला बचतगटांचीही मोठी मदत लागणार आहे व लोकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.
निसर्गाच्या संरक्षणातून लोकांचा विकास यासाठी जास्तीत जास्त उद्दीष्ट्य मिळावे म्हणून प्रयत्न व सूक्ष्म नियोजन यातून आपली शक्तीस्थाने ओळखून शासनाकडून निधी घेतला व त्याचा विनियोग केला तर आपण नक्कीच विकासाचे उद्दीष्ट गाठू शकू असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
केसरकर : त्यावेळी डोळे बंद होते का?
चिपी विमानतळाच्या कामावरून आपल्यावर टीका होत आहे. धावपट्टी अडीच किलोमीटरची की साडेतीन किलोमीटरची याबाबत राजकारण करून आपल्यावर टीका केली जात आहे. मात्र या विमानतळासंदर्भातील करारावर सह्या करताना डोळे बंद ठेवले होते का असा सवाल आम्ही विचारला तर चालेल का? पण आम्हांला टीका करायची नाही. कारण केवळ टीकेने विकास होत नाही. विकास हा सहकारातून होऊ शकतो. त्यामुळे मला टीका न करता जिल्ह्याचा विकास करावयाचा आहे, असेही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
केवळ टीका करून विकास होत नाही तर टीकेचे उत्तर आपल्या कामातून व लोकांच्या समृद्धीतून दिले गेले पाहिजे, असा टोला त्यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.