मठ-सतये गाव इको-सेन्सिटीव्ह घोषीत करावा

By admin | Published: August 16, 2015 11:47 PM2015-08-16T23:47:31+5:302015-08-16T23:47:31+5:30

एकमताने ठराव : १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत घेतला निर्णय

Eco-Sensitav is declared as Math-Satyay village | मठ-सतये गाव इको-सेन्सिटीव्ह घोषीत करावा

मठ-सतये गाव इको-सेन्सिटीव्ह घोषीत करावा

Next

वेंगुर्ले : मठ-सतये गावावर लादलेल्या सिलिका मायनिंग प्रकल्पाला असलेला ग्रामस्थांचा विरोध ग्रामसभांमधील ठराव, जनसुनावणीच्यावेळी व्यक्त झाला आहे. या पाश्र्वभूमीवर १५ आॅगस्ट रोजी झालेल्या मठ गावच्या ग्रामसभेत मठ-सतये गाव इको-सेन्सिटीव्ह (पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात यावे असा महत्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या ग्रामसभेला दीडशे पेक्षा जास्त ग्रामस्थ उपस्थित होते.मठ-सतये गाव हे पश्चिम घाटाच्या पायथ्याजवळील डोंगरांच्या कुशीत वसलेले आहे. साधारणपणे ३000 मि. मी. पर्जन्यवृष्टी होणाऱ्या या गावात १५00 पेक्षा जास्त वनस्पतींच्या जाती आढळतात. यापैकी १00 पेक्षा जास्त दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत. ११ वनस्पतींच्या प्रजातींना लुप्त होण्याचा धोका आहे. मठ ग्रामपंचायत परिसरात गवा, बिबटे, खवले मांजर, लांडगा आणि जैव विविधता साखळीतील अत्यंत महत्वपूर्ण असलेला पट्टेरी वाघ आढळल्याच्या नोंदी वनविभागाकडे आहेत. याव्यतिरिक्त सरपटणा-या प्राण्यांमध्ये घोरपड, अजगर पक्ष्यांमध्ये हॉर्नबिल, गिधाडे, फुलपाखरांच्या दुर्मिळ प्रजाती आढळतात.मठ गावातील झरे, नाले यांचे पाणी १0 किलोमीटरच्या आत असलेल्या अरबी समुद्रात वेंगुर्ला येथे मिळते. या भागात लहान झरे मुबलक प्रमाणात आहेत. पाण्याच्या उपलब्धतेमुळेच आंबा, काजू, नारळ, पोफळींच्या बागायतीवर शाश्वत जीवनपद्धती अस्तित्वात आहे. या भागात सरकारी राखीव जंगले असून, आम्हाला कोणताही प्रदुषणकारी प्रकल्प नको आहे, यासाठी मठ-सतये गाव इको-सेन्सिटीव्ह क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात यावा असा ठराव ग्रामस्थांनी पारीत केला आहे.
हा ठराव शासनाने मान्य केल्यास मठ गावात कोणताही प्रदुषणकारी प्रकल्प उभा राहू शकणार नाही. इको-सेन्सिटीव्हमुळे दैनंदिन जीवनातील व्यवहारांना कोणतीही बाधा येत नसून अशा भागात फळप्रक्रिया, पर्यटन सारखे हरीत उद्योग सुरु करता येतात, ज्यातून शाश्वत रोजगार निर्मिती होण्याची शक्यता असते. स्वयंस्फूतीर्ने इको-सेन्सिटीव्हचा ठराव घेणारी मठ ग्रामपंचायत ही वेंगुर्ले तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
या महत्वपूर्ण ठरावाबरोबरच मठ गावात पट्टेरी वाघाचे अस्तित्व असल्याची नोंद जैवविविधता कायद्या अंतर्गत स्थापन झालेल्या जैवविविधता समितीच्या नोंदवहीमध्ये करण्यात यावी असाही महत्वाचा ठराव घेण्यात आला. पट्टेरी वाघाचे अस्तित्व मठ गावापुरते मयार्दीत नसून, लगतच्या तुळस, होडावडे, आडेली, वजराट या गावांच्यालगत असलेल्या डोंगरामध्येही असल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Eco-Sensitav is declared as Math-Satyay village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.