एकीच्या बळातून आर्थिक उन्नती

By admin | Published: September 17, 2015 11:24 PM2015-09-17T23:24:20+5:302015-09-18T00:04:25+5:30

बचत गटामार्फत ‘सेतू’ कार्यालय...

Economic Growth | एकीच्या बळातून आर्थिक उन्नती

एकीच्या बळातून आर्थिक उन्नती

Next

या भागातील लोकांना विविध दाखल्यांसाठी देवरूख किंवा रत्नागिरीला जावे लागते. येथील लोकांची ही गैरसोय लक्षात घेऊन सतीमाता महिला बचत गटाने देवरूख येथील मातृमंदिर संस्थेच्या बचतगट महासंघाकडून कर्ज घेतले. आणि या बचतगटाच्या सदस्या श्रद्धा सुर्वे यांच्या पुढाकाराने ‘सेतू’ कार्यालय सुरू केले. आता यात तीनजणींची भागीदारी आहे. येथील लोकांना आता अगदी जवळच ही सुविधा उपलब्ध झाल्याने हे ‘सेतू’ कार्यालय एवढे छान चालते की येथील नागरिकांना देवरुख, रत्नागिरीसारख्या ठिकाणी जावे लागत नाही. या महिलांच्या कल्पकतेतून अजूनही वैशिष्ट्यपूर्ण व्यवसाय त्यांना करायचे आहेत. या महिलांची एकी हेच त्यांचे बळ असल्याने प्रत्येक व्यवसायात यशस्वी होण्याचा विश्वास त्यांना आहे.

बचत गटांची चळवळ आता रत्नागिरी जिल्ह्यात वेगाने विस्तारू लागली आहे. महिला काही तरी व्यवसाय करून आर्थिक उन्नती करण्याच्या उद्देशाने एकत्र येऊ लागल्या आहेत. शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील महिलांनाही बचतगटाचे महत्व कळू लागले आहे. अशाच उद्देशाने तालुक्यातील साखरपा जाधववाडी येथील महिलांनी एकत्र येऊन २६ जानेवारी २००० साली सतीमाता महिला बचतगटाची स्थापन केली. जाधववाडी येथे सतीमाता मंदिर आहे. त्याच्या साक्षीने हा सतीमाता महिला बचतगट स्थापन झाला आहे. या १५ सदस्यांपैकी काही तर ‘सेतू’ कार्यालयही चालवू लागल्या आहेत. या महिलांच्या धडपडीची दखल घेत जिल्हा बँकेकडून त्यांना सतत सहकार्यही मिळत असते.
या बचतगटाच्या अध्यक्ष शुभांगी लोटणकर, सचिव श्रद्धा सुर्वे, खजिनदार उमा लोटणकर तर सविता माने, दमयंती पांढरे, वनीता माने, स्मिता जाधव या सदस्या आहेत. या बचतगटाची सुरूवात मासिक २० रूपये वर्गणीने झाली. या गटातील महिलांच्या पुढाकाराने गावात आणखी गट स्थापन झाले आहेत. भवानी, आशा, प्रगती, सिद्धी, जुगाई या बचतगटांच्या माध्यमातून जाधववाडीतील सर्व महिलांचे एकत्रीकरण झालेले आहे. अंगणवाडीच्या शेजारी देवाची जागा आहे. तिथे एक घंटा बसवली आहे. ती वाजवली की सर्व महिला या ठिकाणी एकत्र येतात आणि विचारविनिमय करतात. या सर्व महिलांनी अगरबत्ती, फिनेल आदी विविध वस्तूंचे प्रशिक्षणही पूर्ण केले आहे. तसेच पापड बनविण्याचेही प्रशिक्षण या महिलांनी घेतले आहे. आरसीसी प्रोजेक्टही त्यांनी चालू केला आहे. या महिलांनी विविध व्यवसाय करतानाच सामाजिक बांधिलकीतून जनजागृतीचे कार्यही सुरू केले आहे. एडस् जागृती याचबरोबर हिमोग्लोबीन तपासणी शिबिर, जनशिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने शिवणकला, ब्युटीपार्लर प्रशिक्षणही घेतले आहे. त्यामुळे या प्रशिक्षणाचा उपयोग या महिला आपल्या व्यवसायासाठी करत आहेत. या बचतगटातील सदस्या रेश्मा लोटणकर ग्रामपंचायत सदस्य आहेत. ८ मार्च या जागतिक महिला दिनी ग्रामपंचायतीत सर्व महिला एकत्र येतात. अंगणवाडी मदतनीस, गावच्या महिला समिती अध्यक्षा योजना लोटणकर स्त्रीयांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात. या महिलांनी दारुबंदी मोहीमही यशस्वीपणे राबविली आहे. या महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्याचे कामही या बचतगटामार्फत केले जाते.
यावर्षी १९ मार्चला या महिलांनी महिला दिन साजरा केला. तेव्हा तब्बल २०० महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही या महिलांनी सादर केले. नवरात्रीवेळी या महिला दांडिया नृत्य साजरे करतात. हळदीकुुंकू कार्यक्रम तर दरवर्षीच साजरा होतो.
सध्या या महिला मराठी शाळा, अंगणवाड्यांना चुरमुरा लाडू तयार करुन विकतात. त्यांनी बनविलेल्या स्वादिष्ट कुळीथ, डांगर पीठालाही चांगलीच मागणी आहे. या विविध बचतगटांच्या महिला सर्वच उपक्रमात सहभागी होत असतात. या बचतगटातील काही महिलांचा दुसरा बचतगट स्थापन करण्यात आला आहे. त्यात योगीता कनावजे, सचिव स्मिता जाधव, खजिनदार समीता जाधव, सदस्या योजना लोटणकर, शुभांगी लोटणकर, रेश्मा लोटणकर, सविता माने, श्रद्धा सुर्वे, विजया सुर्वे, वनीता माने, सुनीता कनावजे, सुरेखा जाधव, सुवर्णा कनावजे, अनुसया जाधव, ज्योस्त्ना जाधव यांचा समावेश आहे.
सोयिस्कर व्हावे, या हेतुने या महिलांनी विविध बचतगट केले असले तरी त्यांच्या एकोप्यातून गावात अनेक कार्यक्रम साजरे होतात. विविध उपक्रमांवेळीही या महिला आपली घरची कामे बाजूला सारून एकत्र येतात. अजूनही या महिलांना विविध उपक्रम राबवायचे आहेत. वेगवेगळ्या व्यवसायातून त्यांना आपला आर्थिक विकास साधावयाचा आहे. या सुमारे २०० महिला बचतगटांच्या माध्यमातून एकीचे बळ दाखवून इतर बचत गटांपुढे आदर्श निर्माण करत आहेत. त्यांना गावातील ग्रामस्थांचेही सहकार्य नेहमीच मिळते. या बचत गटांना मातृमंदिर संस्थेचे नेहमीच मार्गदर्शन मिळत असते. आत्मनिर्भर झालेल्या या महिला खऱ्या अर्थाने समाधानी आहेत.
- शोभना कांबळे

Web Title: Economic Growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.