कणकवलीत पर्यटन महोत्सवातून आर्थिक समृद्धी येईल : प्रवीण दरेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 04:31 PM2020-01-03T16:31:11+5:302020-01-03T16:33:36+5:30
कणकवली पर्यटन महोत्सवातून शहराचा विकास होतानाच आर्थिक समृद्धी बरोबरच वैभव प्राप्त होईल, असे प्रतिपादन विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केले.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच कोकणाचा पर्यटनातून सर्वांगिण विकास साधण्यासाठी येथील फळे, मच्छि व अन्य मेव्यावर प्रक्रीया करणारे उद्योग निर्माण व्हायला हवेत. त्यातून कोकण 'सुजलाम , सुफलाम' होईल यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करूया.
आता बांद्यातून भाजपाच्या विजयाला सुरूवात झाली आहे. या विजयाच्या रूपाने ज्या शिवसेनेने कोकणवर अन्याय केला त्या शिवसेना हटावाची मोहिम सुरू झाली आहे. असे सांगतानाच या कणकवली पर्यटन महोत्सवातून शहराचा विकास होतानाच आर्थिक समृद्धी बरोबरच वैभव प्राप्त होईल, असे प्रतिपादन विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केले.
कणकवली उपजिल्हा रूग्णालयासमोरील पटांगणावर कणकवली पर्यटन महोत्सव २०२० चे उद्घाटन प्रवीण दरेकर यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी आमदार नितेश राणे, आमदार रमेश पाटील , भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, , जि़ल्हापरिषद अध्यक्षा समीधा नाईक, जि़ल्हापरिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जयदेव कदम, राजू राऊळ, संदेश सावंत, संजना सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, रवींद्र गायकवाड, बाळ माने, राजू भाटलेकर, राजू राऊळ, जयदेव कदम, सभापती दिलीप तळेकर,सुनील पारकर , संजय कामतेकर, अभिजित मुसळे, बंडू हर्णे, अबीद नाईक, विराज भोसले , सुप्रिया नलावडे, मेघा गांगण आदींसह नगरसेवक, भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रवीण दरेकर म्हणाले, कोकणच्या विकासात माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. त्यांच्या व्यक्तीमत्वाने मी प्रभावीत होतो. त्यांनी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते म्हणून केलेले काम आमच्यासाठी मार्गदर्शक असेच आहे. राज्याला त्यांच्या रूपाने खंबीर नेतृत्व मिळाले आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार आचार-विचार धारा गुंडाळून सत्तेवर आले आहे.
ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांच्याबरोबर संघर्ष केला . त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचे काम शिवसेना करत आहे. शेतकऱ्यांची या सरकारने फसवणूक केली आहे. कोकणातील मच्छिमारांसाठी पाचशे कोटींची मागणी सभागृहात आम्ही केली. त्याबाबत सरकारने एक चकार शब्दही काढला नाही. ज्या शिवसेनेला कोकणने १५ आमदार दिले . त्या सरकारने कोकणच्या मुळावर उठण्याचे काम केले. त्यामुळे शिवसेना हटाव मोहिमेची सुरूवात बांद्यातून सुरू झाली आहे. आता यापुढे कोकणात भाजपाचाच झेंडा फडकेल, असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या शब्दाप्रमाणे नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली साखर कारखाना उभारण्यात येईल, असेही ते म्हणाले.
नितेश राणे म्हणाले, सिंधू महोत्सवाच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पर्यटन महोत्सवाची सुरुवात जिल्ह्यात केली. त्यांच्याच प्रेरणेने आम्ही कणकवलीत पर्यटन महोत्सव सुरू केला आहे. या पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून मागील वर्षी ६ कोटींची उलाढाल झाली होती. पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून व्यापार उदिम वाढीस लागतो.
कणकवली शहरात होणाऱ्या उड्डाणपुलामुळे बाजारपेठेला थोडासा फटका बसणार आहे. त्यासाठीही आम्ही विचार केला आहे. कणकवलीत पर्यटक यायला हवेत. यासाठी आमची धडपड आहे. महाराष्ट्रातील पहिले कंटेनर मत्स्यालय कणकवलीत उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे.
देशातील पहिले कंटेनर थिएटर देवगड शहरात आहे. देवगड, कणकवलीसारखा विकास सावंतवाडीकराना हवा आहे. त्यासाठीच त्यांनी आमच्या हाती सत्ता दिली आहे. राज्यात पाहुणे सरकार आहे. पाहुणे चार दिवस येतात आणि जातात. तसेच हे सरकार थोड्याच दिवसांचे आहे. उद्धव म्हणजे उध्वस्त हे समीकरण आहे. द्वेषबुद्धीने हे सरकार काम करत आहे.
नवीन नगरविकास मंत्री कणकवली शहरातील रस्त्याची कामे थांबवण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना दूरध्वनी करतात.
हे द्वेषाचेच उदाहरण आहे. विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्याचे शासकीय घर काढून घेण्यात आले आहे. तर माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचे संरक्षण कमी केले आहे.
बाळासाहेब ठाकरेंना खलिस्तानी धोका असताना राणें सारख्या शिवसैनिकांनी संरक्षण पुरवले होते. मात्र, बाळासाहेबांना संरक्षण देणाऱ्यांचे संरक्षण या द्वेषी मुख्यमंत्र्यांनी कमी केले आहे. त्यामुळे या द्वेषी सरकारचे वाभाडे आम्ही जनतेसमोर काढणार आहोत.
समीर नलावडे म्हणाले, कला - क्रीडा - संस्कृती आणि खाद्य संस्कृती ही सिंधुदुर्गची ओळख आहे. पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून या संस्कृतीची जपणूक आम्ही करत आहोत. आमदार नितेश राणेंच्या पुढाकाराने कणकवलीत मत्स्यालय होते आहे. यासाठी जागाही निश्चित केली आहे. नितेश राणे यांचे कणकवली शहराच्या विकासाकडे प्राधान्याने लक्ष आहे.
केवळ पर्यटन महोत्सवच नव्हे तर सामाजिक उपक्रमातही कणकवली नगरपंचायत अग्रेसर आहे. १५ कोटींचे गार्डन आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स शहरात होणार आहे. नितेश राणेंमुळे मी नगराध्यक्ष झालो आहे. त्यांचे आमच्यावर उपकार असून संदेश सावंत आणि मी त्यांना केव्हाच विसरू शकत नाही. असेही ते यावेळी म्हणाले. राजन तेली म्हणाले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सिंधू महोत्सवाची सुरुवात केली. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे.
देशातील आघाडीचे कलाकार . खेळाडू सिंधू महोत्सवासाठी सिंधुदुर्गात येऊन गेले आहेत. डिसेंबर महिन्यात आंब्रडमध्ये लॉरेन्स मान्येकर , बांदा येथे अक्रम खान तर सावंतवाडीत संजू परब या त्रिमूर्तींनी विजय मिळवला. अमर, अकबर, अँथोनीचा फ़ॉर्म्युला आमदार नितेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाला आहे. आता ' चांदा ते बांदा 'नव्हे तर 'बांदा ते चांदा' अशी भाजपाची घोडदौड होणार आहे. आमदार शरद पाटील, प्रमोद जठार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.