CoronaVirus Lockdown : देवगड तालुक्याची आर्थिक नाडी लॉकडाऊनच्या जाळ्यात, मत्स्य व्यवसाय संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 03:14 PM2020-06-10T15:14:44+5:302020-06-10T15:17:31+5:30

देवगड तालुक्याची आर्थिक नाडी असलेला मत्स्य व्यवसाय सुरुवातीच्या काळात वादळाने व अखेरच्या काळात कोरोनाने कोलमडला आहे. त्यामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या या मत्स्य व्यावसायिकांना शासनाने आर्थिक पाठबळ देणे गरजेचे आहे.

Economic pulse of Devgad taluka in the net of lockdown | CoronaVirus Lockdown : देवगड तालुक्याची आर्थिक नाडी लॉकडाऊनच्या जाळ्यात, मत्स्य व्यवसाय संकटात

CoronaVirus Lockdown : देवगड तालुक्याची आर्थिक नाडी लॉकडाऊनच्या जाळ्यात, मत्स्य व्यवसाय संकटात

googlenewsNext
ठळक मुद्देदेवगड तालुक्याची आर्थिक नाडी लॉकडाऊनच्या जाळ्यात, मत्स्य व्यवसाय संकटात सुरुवातीच्या काळात वादळ, त्यानंतर कोरोनामुळे मच्छिमारांच्या चेहऱ्यावर निराशा

देवगड : देवगड तालुक्याची आर्थिक नाडी असलेला मत्स्य व्यवसाय सुरुवातीच्या काळात वादळाने व अखेरच्या काळात कोरोनाने कोलमडला आहे. त्यामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या या मत्स्य व्यावसायिकांना शासनाने आर्थिक पाठबळ देणे गरजेचे आहे.

देवगड तालुक्याची अर्थव्यवस्था मत्स्य व आंबा व्यवसायांवर अवलंबून आहे. यातील मत्स्य व्यवसाय नोव्हेंबर-डिसेंबरच्या सुरुवातीच्या काळातच बहरतो. मात्र, याच कालावधीत मच्छिमारांना अनेक वादळांना सामोरे जावे लागल्याने मासळी व्यवसाय नुकसानीत गेला. वादळसदृश परिस्थितीतून बाहेर पडत असतानाच कोरोना विषाणूमुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन झाले. याचा गंभीर परिणाम मत्स्य व्यवसायावर झाला.

मार्च, एप्रिल व मे महिन्यात गोवा व इतर राज्यांतून देवगड तालुक्यातील महागड्या मासळीला मोठी मागणी असते. मात्र, यावर्षी याच कालावधीत लॉकडाऊन झाल्याने संपूर्ण मत्स्य व्यवसायावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले. कोरोनाचा फटका मच्छिमारी व्यवसायाला जास्त बसला.

लॉकडाऊनच्या काळात देवगडमधील सुमारे २२२ खलाशी रत्नागिरी जिल्ह्यातील तुळसुंदे या ठिकाणी अडकल्याने २० ते २५ नौका बंद स्थितीत होत्या. त्यात इतर नौकांवरीलही खलाशांचा समावेश असल्याने त्या नौकांनाही कमी खलाशी घेऊन व्यवसाय करताना कसरत करावी लागली.

एकामागोमाग एक अशी येणारी छोटी-मोठी वादळे, मासळी मिळण्याचे प्रमाण कमी व अंतिम टप्प्यातील कोरोनाचे संकट यामुळे मच्छिमारी व्यवसायावर या हंगामात अखेरपर्यंत संक्रांतच आली. एप्रिल व मे महिन्याचा पहिला पंधरवडा हा मच्छिमारी हंगामासाठी महत्त्वाचा काळ समजला जातो. या हंगामात मोठ्या प्रमाणात मासळी मिळते. तसेच याच हंगामात मुंबईकर चाकरमानी येत असल्याने मासळीला स्थानिक बाजारपेठेत दरदेखील चांगला मिळत असतो. मात्र, लॉकडाऊनमुळे या व्यवसायावर परिणाम झाला.

छोट्या नौकांना तर हा हंगाम तोट्यातच गेला. त्यातच १ जूनपासून मच्छिमारी व्यवसाय बंद झाल्याने नौकामालकांनाही नौका किनाऱ्यावर घ्याव्या लागल्या आहेत. दरवर्षी उत्साहाने नौका समुद्रकिनारी घेऊन त्या शाकारण्यासाठी मच्छिमार बांधव गुंतलेले असतात. मात्र यावर्षी अनेक वादळे, कोरोनामुळे व्यवसायावर परिणाम झाल्याने उत्साहाऐवजी निराशाच मच्छिमारांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती.

खोल समुद्रातील मच्छिमारी व्यवसाय बंद झाला असून खाडीतील पारंपरिक मच्छिमारीला वेग येणार आहे. मात्र, पावसाने अद्याप मोठ्या प्रमाणात हजेरी न लावल्याने पारंपरिक मच्छिमारीही अद्याप सुरू झाली नाही. पारंपरिक मासळी व्यवसायाला यावर्षी निसर्गाने साथ दिली तर त्यांना चालना मिळेल. कारण यावर्षी मुंबईकर चाकरमानी हजारोंच्या संख्येने कोरोना विषाणूमुळे गावागावात दाखल झाले आहे. पावसाळ्यामध्ये मासळीकडे त्यांचाही कल असणार आहे.

पारंपरिक खाडीकिनारी होणारी मासेमारी उभारी मिळवून देण्याची आशा

देवगड तालुक्यातील मुणगे गावापासून विजयदुर्गपर्यंत समुद्रकिनारा लाभला आहे. यामध्ये मुणगे, मोर्वे, तांबळडेग, मिठबांव, कातवण, कुणकेश्वर, तारामुंबरी, मिठमुंबरी, देवगड, फणसे, पडवणे, कळंबई, हुर्शी, गिर्ये, रामेश्वर, विजयदुर्ग ही गावे किनाऱ्यालगत आहेत.

तालुक्यातील काही गावांना खाडीकिनारा लाभला आहे. यामध्ये मोंड, वानिवडे, वाडातर, वाघोटण, मणचे, मुटाट, तिर्लोट, टेंबवली, कालवी, तळवडे, गढीताम्हाणे, धालवली या गावांचा समावेश आहे. येथे मोठ्या प्रमाणात पारंपरिक मच्छिमारी केली जाते. या मच्छिमारीवर अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. यामुळे पारंपरिक मच्छिमारी व्यवसाय यावर्षी खाडीकिनारी असलेल्या कुटुंबांना कोरोना संकटात उभारी मिळवून देईल अशी आशा व्यक्त होत आहे.

देवगड किनारपट्टीवर मागील सहा महिन्यांपासून बहुतांशी काळात मच्छिमारी करणाऱ्या बोटी नांगरून ठेवल्या जात होत्या.

Web Title: Economic pulse of Devgad taluka in the net of lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.