नारळ लागवडीवर भर दिल्यास सिंधुदुर्गात आर्थिक क्रांती : गिरीराज सिंग
By admin | Published: May 11, 2017 12:20 PM2017-05-11T12:20:09+5:302017-05-11T12:20:09+5:30
कुडाळ येथे माहाक्वॉयर काथ्या प्रकल्पाची पहाणी
सिंधुदुर्गनगरी दि.११: नारळाला कल्पवृक्ष अस म्हणतात ते सर्वाथार्ने योग्य आहे. नारळ वृक्षाच्या प्रत्येक भागाचा उपयोग होतो. याच अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळ लागवडीवर भर दिल्यास आर्थिक क्रांती होईल असा विश्वास केंद्रीय सुक्ष्म व लघु मध्यम उद्योग राज्य मंत्री गिरीराज सिंग यांनी कुडाळ येथे बोलताना व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाच्या कुडाळ येथे माहाक्वॉयर काथ्या प्रकल्पाची पहाणी व भेट दिल्यानंतर आयोजित कार्यक्रमात गिरीराज सिंह बोलत होते. यावेळी व्यासपिठावर पालकमंत्री दीपक केसरकर, खादी व ग्रामउद्योग मंडळाचे चेअरमन विशाल चोरडीया, जिल्हाधिकारी उदय चौधरी, व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव दौंड, लिना बनसोड, क्वॉयर बाडार्चे चंद्रशेखर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच रोजगार निर्मिती व शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न आहे. असे सांगून गिरीराज सिंग म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने महामंडळाच्या माध्यमातून काथ्या प्रक्रिया उद्योग उभारुन रोजगाराला चालना देण्याचे महात्वपूर्व पाऊल उचल आहे. ही रोजगार निर्मितीच्या दृष्टीकोनातून अभिनंदनीय बाब आहे. काथ्या प्रक्रिया उद्योगामुळे सिंधुदुगार्तील महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे. आंबा, काजू, कोकम, भात या पिकांवर प्रक्रिया उद्योग उभारुन शेतक-यांच उत्पन्न दुप्पट करण्याच स्वप्नही साकारल जाईल.
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी चांदा ते बांदा या प्रकल्पाची सविस्तर माहिती देऊन प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीतून जिल्ह्यातील उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपूर वापर करुन रोजगार निर्मितच आणि शेतक-यांच उत्पन्न दुप्पट हे ध्येय साकारणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
कोकण बॅक प्रकल्पास भेट
कोकण बांबु केन डेव्हलपमेंट सेंटर कुडाळ (कोकण बॅक) या प्रकल्पास केंद्रीय उद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंग यांनी भेट देऊन सुमारे अडीच तास चर्चा केली. संचालक संजय करपे यांनी पॉवर पॉइट प्रेन्झेटेशनच्या माध्यमातून बांबु प्रक्रिय उद्योगाची सविस्तर माहिती दिली. यावेळी खासदार विनायक राऊत, प्रमोद जठार, संदेश पारकर, मोहन हाडावडेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपवन संवरक्षक समाधान चव्हाण, सामाजिक वनिकरण विभागाचे उप वन संवरक्षक व्ही. डी जाधव आदी उपस्थित होते.
सावंतवाडी चितार आळीस भेट
सकाळी सावंतवाडी शहरातील चितार आळीस भेट देऊन केंद्रीय उद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंग यांनी लाकडी हस्त कलेची माहिती घेतली. यावेळी राजवाडा तसेच समाज मंदिरालगत बांबु प्रशिक्षण व प्रक्रिया युनिटला भेट दिली. बौध्द पौर्णिमे निमित्त समाज मंदिरातील भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांनी अभिवादन केले.
अधिकारी वर्गाशी विकासाबाबत चर्चा
कुडाळ येथील महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास मंडळाच्या विश्रागृहावर पंतप्रधान रोजगार हमी योजना , स्टॅड अप इंडिया, मेक इन इंडिया मुद्रा योजना, कौशल्य विकास कार्यक्रम, पिक कर्ज वितरण, गृह कर्ज वितरण, उद्योग आदी बाबत केंद्रीय सुक्ष्म लघु व मध्यम उद्याग केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंग यांनी बैठक घेऊन योजनांचा सविस्तर आढावा घेतला.