उद्योग बंद पडणे संपूर्ण समाजाला घातक : अर्थतज्ज्ञ उदय बोडस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 02:18 PM2019-05-02T14:18:47+5:302019-05-02T14:23:50+5:30
सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग बंद पडणे हे संपूर्ण समाज व्यवस्थेसाठी घातक आहे. यातून लाखो लोक बेरोजगार होतील. अनेक कुटुंबे रस्त्यावर येतील. गिरणी कामगारांच्या संपाप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रातला कामगार देशोधडीला लागेल. त्यामुळे हे उद्योग टिकविण्यासाठी आणि सरकारवर नैतिक दबाव आणण्यासाठी कामगारांची एकजूट आणि प्रसिद्धी माध्यमांचा आवाज महत्वाचा आहे असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ उदय बोडस यांनी येथे केले.
कणकवली : सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग बंद पडणे हे संपूर्ण समाज व्यवस्थेसाठी घातक आहे. यातून लाखो लोक बेरोजगार होतील. अनेक कुटुंबे रस्त्यावर येतील. गिरणी कामगारांच्या संपाप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रातला कामगार देशोधडीला लागेल. त्यामुळे हे उद्योग टिकविण्यासाठी आणि सरकारवर नैतिक दबाव आणण्यासाठी कामगारांची एकजूट आणि प्रसिद्धी माध्यमांचा आवाज महत्वाचा आहे असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ उदय बोडस यांनी येथे केले.
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ उदय बोडस यांचे हॉटेल गोकुळधामच्या सभागृहात व्याख्यान झाले. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे कामगार प्रतिनिधी संतोष रानडे, सुरेंद्र दळवी, एस.टी.कामगार संघटनेचे सिंधुदुर्ग विभागीय अध्यक्ष रवींद्र भिसे, एलआयसी कामगार प्रतिनिधी सुनील राऊत आदी उपस्थित होते. विविध कामगार संघटनांच्यावतीने हा कार्यक्रम झाला.
यावेळी उदय बोडस म्हणाले, सरकार बीएसएनएल मोडीत काढायला निघाले आहे. यात ५४ हजार कर्मचारी घरी बसणार आहे. २९ मे रोजी जी व्यक्ती पंतप्रधानपदाची शपथ घेईल. त्या व्यक्तीच्या निर्णयावर बीएसएनएलसह सार्वजनिक क्षेत्रातील सर्वच कामगारांचे भवितव्य अवलंबून आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बीएसएनएल जर मोडीत निघाली तर नेटवर्क कोलडमणार आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका, एलआयसी आणि इतर संस्था बंद पडणार आहेत.
सरकारला सार्वजनिक क्षेत्रातील सर्वच उद्योग बंद करायचे आहेत. त्यासाठीच निवृत्तीची मर्यादा ५० वर्षावर आणण्याचा घाट घातला जात आहे. तसेच सर्वच क्षेत्रात खासगीकरण आणून कामगार चळवळ मोडीत काढली जात आहे. याविरोधात संघटित क्षेत्रातील कामगार वर्ग आवाज उठवतोय. पण जनतेमधून त्याला पाठिंबा मिळत नाही. संप केला तर त्यालाही प्रतिसाद मिळत नाही . अशी स्थिती आहे.
सरकारच्या या कामगार विरोधी धोरणाविरोधात जिथे संधी मिळेल तेथे आवाज उठवायला हवा. विशेषतः युवा वर्गाला कामगार विरोधी धोरणे आणि पुढील बेरोजगारीचे धोके समजावून सांगायला हवेत. सर्वच घटकांतून चळवळ उभी राहिली तरच सरकारला जाग येईल. अन्यथा कामगारवर्ग रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही अशीही भीती उदय बोडस यांनी यावेळी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, ग्राहक संघटनांनी ग्राहकांच्या हक्काचे विषय मोठ्या प्रमाणात हाती घ्यायला सुरुवात केली आहे. सार्वजनिक ठिकाणी जिथे व्यासपीठ मिळेल तिथे जनतेत जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. तसेच स्थानिक पातळीवर दबाव गट निर्माण झाले तर कामगार हिता बरोबरच अन्य महत्वपूर्ण निर्णय होऊ शकतील. त्यामुळे सामान्य जनतेचाही फायदा होईल.असेही उदय बोडस यांनी यावेळी सांगितले.
माध्यमांनी जागल्याची भूमिका बजावावी !
कामगार विरोधी धोरणाविरोधात तसेच देशात सध्या सुरू असलेल्या घडामोडींविषयी प्रसिद्धी माध्यमांनी जागल्याची भूमिका बजावावी.असे जर झाले तर मोठ्या प्रमाणात जनतेत जागृती होईल आणि काही प्रमाणात तरी परिस्थितीत सुधारणा होईल. असेही उदय बोडस यांनी यावेळी सांगितले.