सिंंधुदुर्ग :शिक्षणात तडजोड चालणार नाही : नीतेश राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 01:17 PM2018-09-12T13:17:19+5:302018-09-12T13:20:17+5:30
अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या मागे खंबीरपणे उभे राहून लोकप्रतिनिधींनी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत आमदार नीतेश राणे यांनी येथे व्यक्त केले.
कणकवली : शिक्षणात तडजोड करणे म्हणजे भवितव्याशी खेळण्याचा प्रकार आहे. राज्याचा तसेच देशाचा विकास करायचा असेल तर शिक्षणात तडजोड करून चालणार नाही. शिक्षणाला पर्याय नाही. विद्यार्थ्याने चांगले शिक्षण घेऊन जिल्हा विकासाला हातभार लावावा. अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या मागे खंबीरपणे उभे राहून लोकप्रतिनिधींनी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत आमदार नीतेश राणे यांनी येथे व्यक्त केले.
कणकवली पंचायत समिती अंतर्गत कणकवली तालुका परीक्षा समिती आयोजित येथील मातोश्री मंगल कार्यालयात मंगळवारी आयोजित गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी पंचायत समिती सभापती तथा तालुका परीक्षा समिती अध्यक्षा भाग्यलक्ष्मी साटम, उपसभापती दिलीप तळेकर, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती सायली सावंत, जिल्हा परिषद सदस्या संजना सावंत, स्वरूपा विखाळे, गटविकास अधिकारी मनोज भोसले, जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार, पंचायत समिती सदस्य गणेश तांबे, मनोज रावराणे, प्रकाश पारकर, मिलिंद मेस्त्री, स्मिता मालडीकर, हर्षदा वाळके, सुजाता हळदिवे, तृप्ती माळवदे, सुचिता दळवी, दिव्या पेडणेकर, स्वाती राणे, मनिष दळवी, सहाय्यक गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
नीतेश राणे म्हणाले, लंडनच्या अभ्यास दौºयावरून आल्या आल्या या कार्यक्रमास उपस्थित राहिलो. अशा शैक्षणिक गुणगौरव कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी हितगुज करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारल्याने समाधान मिळते.
शिक्षकांनी मार्गदर्शन करायचे. लोकप्रतिनिधींनी त्याच्या पाठीशी उभे राहून त्यांना ताकद दिली पाहिजे असे आपले मत आहे. या गुणगौरव कार्यक्रमाचा भविष्यात फायदा होणार आहे, असे ते म्हणाले. शिक्षण खात्यात चाललेल्या कारभाराबाबत त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. तसेच दूरसंचारच्या ह्यई-लर्निंगह्णच्या घोषणेची नीतेश राणे यांनी खिल्ली उडविली.
पाटी पुस्तकांपुरते शिक्षण मर्यादित न ठेवता भविष्यात आपला विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकून राहिला पाहिजे, म्हणून आपण १२५ शाळा डिजिटल करण्याचा उपक्रम राबविला. प्रत्येक लोकप्रतिनिधीने अशा उपक्रमास हातभार लावण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे आमदार राणे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भाग्यलक्ष्मी साटम म्हणाल्या, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे तसेच आमदार नीतेश राणे यांचे सातत्याने प्रयत्न असतात. आमदार राणे यांनी शाळा डिजिटल करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला.
क्रिकेट अॅकॅडमीच्या माध्यमातून त्यांनी युवा खेळाडूंना चांगले व्यासपीठ मिळवून दिल्याचे सांगून नारायण राणे यांचे विकासाचे, शैक्षणिक प्रगतीचे स्वप्न साकार व्हावे यासाठी पंचायत समिती राबवित असलेल्या उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला.
यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत, टॅलेंट सर्च परीक्षेत, ज्ञानी मी होणारमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नीतेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. राज्यस्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शामसुंदर सावंत यांचा सपत्नीक तसेच जिल्हा पुरस्कारप्राप्त श्वेता सुहास मेस्त्री यांचा परीक्षा समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांनी केले. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले तर परीक्षा समितीचे सचिव सुहास पाताडे यांनी आभार मानले.|
पंचायत समितीचा पहिला नंबर
महाराष्ट्रातील सर्व पंचायत समितींचा एकत्रित गुणगौरवाचा कार्यक्रम आयोजित केला तर त्यामध्ये प्रगतशील कामगिरीत कणकवली पंचायत समितीचा पहिला नंबर लागेल, अशा शब्दात गौरवोद्गार काढून आमदार नीतेश राणे म्हणाले, कणकवली पंचायत समिती विविध लोकोपयोगी काम करीत असल्याचे पाहून समाधान वाटते.