शिक्षण विभागाला गवंडींचा विसर
By admin | Published: June 28, 2015 10:34 PM2015-06-28T22:34:13+5:302015-06-29T00:33:01+5:30
शिक्षण विभागाकडून पेन्शन केसबाबतचा प्रस्तावच जिल्हा परिषद रत्नागिरीकडे पाठविला गेला नसल्याने गवंडी यांच्या कुटुंबियांची परवड होताना दिसत आहे.
देवरूख : शिक्षकी पेशात काम करताना सामाजिक बांधिलकी जोपासात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या आणि क्रीडा क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविलेल्या संगमेश्वर तालुक्यातील पाटगाव येथील शिक्षक व राष्ट्रीय कबड्डी पंच सुभाष गवंडी यांचाच संगमेश्वर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला विसर पडला आहे. शिक्षण विभागाकडून पेन्शन केसबाबतचा प्रस्तावच जिल्हा परिषद रत्नागिरीकडे पाठविला गेला नसल्याने गवंडी यांच्या कुटुंबियांची परवड होताना दिसत आहे. याकडे शिक्षण विभाग गांभीर्याने लक्ष देईल का? असा आर्त सवाल कुटुंबियांनी केला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील हरहुन्नरी शिक्षक, आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच गवंडी यांच्या निधनानंतर पेन्शन मिळावी, यासाठीची कागदपत्र पत्नीने पंचायत समिती शिक्षण विभागाकडे सादर केली. पेन्शनबाबतची कागदपत्र दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात न आल्याने पंचायत समिती कार्यालयात धूळ खात पडली आहेत. संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गवंडी हे विद्यार्थीप्रिय शिक्षक त्याचबरोबर उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच होते. गवंडी हे पाटगावचे रहिवासी होते. अल्पशा आजाराने त्यांचे १४ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. गवंडी यांच्या निधनानंतर ४ मेच्या दरम्यान त्यांच्या पत्नीने पेन्शन मिळावी, यासाठी संगमेश्वर पंचायत समिती शिक्षण विभागाकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली.
यासंदर्भात गवंडी यांनी पंचायत समिती कार्यालयात चौकशी केली असता, पेन्शन केस व कागदपत्र आजतागायत जिल्हा परिषद, रत्नागिरीकडे मंजुरीसाठी पाठवलेली नसल्याचे म्हणणे आहे.
येथील पंचायत समितीत असणाऱ्या अधिकारीवर्गाच्या कामकाजाबाबत नाराजीचा सूर उमटत आहे. दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही पेन्शन केस व सेवापुस्तक पंचायत समिती कार्यालयात ठेण्याचा नेमका हेतू काय? असा सवाल उमटत आहे.गवंडी यांचे दोन लहान मुलगे असून, शिक्षण घेत आहेत. सुभाष गवंडी यांच्या निधनामुळे कुटुंबाची जबाबदारी गवंडी यांच्या पत्नीवर येऊन पडली आहे. याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)