शिक्षण विभागाचा नियोजनशून्य, भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 01:20 PM2019-06-24T13:20:07+5:302019-06-24T13:21:32+5:30
दोडामार्ग तालुक्याच्या शिक्षण विभागाचा भोंगळ व नियोजनशून्य कारभार शनिवारी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. तालुक्यातील तेरवण-मेढे व मांगेली शाळेत एकही शिक्षक हजर नसल्याने शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना व्हरांड्यात ताटकळत राहण्याची वेळ आली. त्यामुळे पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे तालुक्याच्या शिक्षण विभागाची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेल्याने तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे.
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्याच्या शिक्षण विभागाचा भोंगळ व नियोजनशून्य कारभार शनिवारी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. तालुक्यातील तेरवण-मेढे व मांगेली शाळेत एकही शिक्षक हजर नसल्याने शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना व्हरांड्यात ताटकळत राहण्याची वेळ आली. त्यामुळे पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे तालुक्याच्या शिक्षण विभागाची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेल्याने तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे.
दोडामार्ग तालुक्याचा शिक्षण विभाग गेल्या काही दिवसांपासून नियोजनशून्य कारभारामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मांगेली देऊळवाडी शाळेतील तिन्ही शिक्षकांची पदे रिक्त झाल्याने शाळा बंद आंदोलन झाले आणि तालुक्याच्या शिक्षण विभागाच्या नियोजनशून्य कारभाराचा पहिला प्रकार पुढे आला.
तब्बल तीन दिवसांच्या शाळा बंद आंदोलनानंतर देऊळवाडी शाळेला दोन कायमस्वरूपी शिक्षक तर दोन कामगिरीवर शिक्षक देण्यात आले. परंतु शाळा पहिल्याच दिवशी बंद राहिल्याने तालुक्यातील हा प्रकार चांगलाच चर्चेत आला.
याबाबतची चर्चा थांबते ना थांबते तोच शनिवारी पुन्हा एकदा असाच प्रकार चव्हाट्यावर आला. मांगेली पळसवाडी शाळा क्रमांक दोन व तेरवण-मेढे येथील शाळा क्रमांक २ मध्ये शिक्षक शनिवारी गेलेच नाहीत. त्यामुळे शाळा बंद राहिली. परंतु विद्यार्थ्यांना मात्र शाळेच्या व्हरांड्यात ताटकळत थांबण्याची वेळ आली.
तेरवण-मेढे शाळा क्रमांक २ मध्ये एकूण दोन शिक्षक आहेत. त्यापैकी एक शिक्षक कामगिरीवर तर दुसरा शिक्षक निवडणुकीच्या कामासाठी नेमण्यात आला. त्यामुळे शाळेत एकही शिक्षक दिला नाही. वास्तविक या ठिकाणी पर्यायी शिक्षक पाठविणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे शाळा बंद राहिली. या प्रकाराबाबत पालकांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.
नाराजी ओढवली
एका बाजूने शाळेच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे वाजत गाजत स्वागत होत असताना दुसरीकडे मात्र मांगेली देऊळवाडी शाळेत वर्गच न भरल्याने तालुक्याच्या शिक्षण विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली. त्यानंतर मांगेलीमधील फणसवाडी शाळेत शिक्षक हजर न झाल्याने एक दिवस शाळा बंद राहिली. असे दोन प्रकार वारंवार घडले. त्यामुळे तालुक्याचा शिक्षण विभागावर नाराजी ओढवली आहे.