शिक्षणाचे बाजारीकरण नको

By admin | Published: January 29, 2016 09:55 PM2016-01-29T21:55:24+5:302016-01-30T00:17:23+5:30

नितीन गडकरी : मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटीच्या सुवर्ण महोत्सवाची सांगता

Education does not want to be marketed | शिक्षणाचे बाजारीकरण नको

शिक्षणाचे बाजारीकरण नको

Next

असुर्डे/चिपळूण : शिक्षण हे ज्ञानाधिष्ठीत तसेच रोजगाराभिमूख असले पाहिजे़ सध्या शिक्षणाचे बाजारीकरण सुरु झाले आहे. शिक्षणाचे बाजारीकरण नको तर सार्वत्रिकरण झाले पाहिजे. शिक्षणावर होणारा खर्च भविष्यातील भांडवल आहे. शिक्षण हे व्यावसायाभिमुख हवे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग व नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
मार्गताम्हाणे येथे आज (शुक्रवारी) मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटीचा सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ पद्मावती देवी विद्या संकुलात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग व नौकानयन मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी गडकरी बोलत होते. बचत गटामार्फत टिकाऊ प्लास्टीकमधून डांबर निर्मिती व चांगली आर्थिक उन्नती होऊ शकते. यासाठी त्यांनी केलेल्या प्रकल्पाची माहिती सांगितली़ प्रत्येक गोष्टीत रोजगार निर्मिती कशी करता येऊ शकेल ते पहावे. केसापासून अमोनिया अ‍ॅसिड ज्याचा वापर फळांवर करतो त्याची किंमत ९०० रुपये आहे. ते आपल्याला यामुळे २०० रुपयाला मिळू शकते़ नागपूरमध्ये टॉयलेटच्या पाण्यावर प्रक्रिया करुन महाराष्ट्र सरकारला हे पाणी १८ कोटीला विकण्यात आले़ पुढील वर्षी यावर आणखी वेगळी प्रक्रिया करुन प्रदूषणविरहीत बसेस चालवणार असल्याचे सांगितले़ पेंडयापासून प्लास्टिक निर्मितीचा नवीन प्रकल्प तयार होत आहे व हे प्लास्टिक तीन दिवसात विघटीत होऊ शकते, अशी माहिती सांगितली़ सागरमाला प्रोजेक्टमध्ये नवीन योजना अंतर्भूत करणार आहे. यामध्ये दहा मच्छिमारांनी एकत्र येऊन २५ लाख जमा करायचे. १० लाख शासन देणार असून, ६० लाख किंमतीचा ट्रॉलर देणार आहे़ त्यामुळे १२ नॉटिकलपेक्षा दूरवर असलेल्या समुद्रात मोठया प्रमाणात मासेमारी करुन मोठे उत्पन्न मिळू शकते़ तसेच यामुळे निर्यातीला चालना मिळेल, असेही मंत्री गडकरी यांनी सांगितले.
या समारंभासाठी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, सहकार व बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार हुसेन दलवाई, आमदार भास्कर जाधव, मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार आशिष शेलार, माजी आमदार डॉ. विनय नातू, उद्योजक किशोर अवर्सेकर, भाजप प्रवक्ते व मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी आमदार मधु चव्हाण, जयसिंग मोरे, अजित साळवी, सुरेश चव्हाण व सर्व संचालक व्यासपीठावर उपस्थित होते़ या शिक्षण संस्थेच्या सभागृहाचे स्वर्गीय रुक्मिणी गणपत चव्हाण सभागृह असे अनावरण केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याहस्ते झाले. शिक्षण मंत्री तावडे यांनी कौशल्य विकास अभ्यासावर भर देणार असल्याचे सांगितले. दर दिवशी एक तास खेळणाऱ्या मुलाला १० गुण बोनस देण्याचा नवीन पर्याय आहे. चालू वर्षात दहावीला एकही विद्यार्थी नापास होणार नाही, असे सांगितले़
केंद्रीय मंत्री गीते यांनी मोदींच्या मंत्री मंडळातील गडकरी हे गतिमान मंत्री असल्याचे सांगितले़ कोकणाचा आता शिक्षणात पहिला नंबर लागतो़ परंतु, शासनाने ग्रामीण भागातील शिक्षण संस्थांना शहरी भागातील शिक्षण संस्थांपेक्षा सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला सर्वांनी सहकार्य करण्याचे उपस्थितांना आवाहन करुन सागरी महामार्ग केंद्राच्या अखत्यारीत दिले तर राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे त्यांचेही चौपदरीकरण होऊ शकेल, असे सांगितले़
संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मधु चव्हाण यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. सर्व मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव मोहन चव्हाण यांनी केले़ या कार्यक्रमासाठी सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, भाजपचे तालुकाध्यक्ष रामदास राणे, सुचय रेडीज, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, रामपूरचे जिल्हा परिषद सदस्य महेश कातकर उपस्थित होते. (वार्ताहर)

अनेकांचे ऋणनिर्देश : संस्थेच्या कार्याची माहिती स्मरणिकेतून
पद्मावती विद्या संकुलात उत्कृष्ट सजवलेल्या शामियान्यात पदार्पण करण्यापूर्वी एनसीसी छात्रांनी व विद्यार्थ्यांनी झांज पथक वाजवून मानवंदना दिली. त्यानंतर अध्यक्ष मधु चव्हाण यांच्या मातोश्रींच्या नावे असलेल्या सभागृहाचे उद्घाटन झाले. यावेळी संस्थेला जमीन देणारे, दान करणारे, संस्थेसाठी श्रमदान करणाऱ्या मंडळींचा ऋणनिर्देश करण्यात आला. यावेळी वसंतराव भागवत, माजी आमदार डॉ. तात्यासाहेब नातू, बाबुराव शिर्के यांची प्रकर्षाने आठवण करण्यात आली.

अनेकांचे ऋणनिर्देश : संस्थेच्या कार्याची माहिती स्मरणिकेतून
पद्मावती विद्या संकुलात उत्कृष्ट सजवलेल्या शामियान्यात पदार्पण करण्यापूर्वी एनसीसी छात्रांनी व विद्यार्थ्यांनी झांज पथक वाजवून मानवंदना दिली. त्यानंतर अध्यक्ष मधु चव्हाण यांच्या मातोश्रींच्या नावे असलेल्या सभागृहाचे उद्घाटन झाले. यावेळी संस्थेला जमीन देणारे, दान करणारे, संस्थेसाठी श्रमदान करणाऱ्या मंडळींचा ऋणनिर्देश करण्यात आला. यावेळी वसंतराव भागवत, माजी आमदार डॉ. तात्यासाहेब नातू, बाबुराव शिर्के यांची प्रकर्षाने आठवण करण्यात आली.



संस्थेच्या स्वर्गीय रुक्मिणी गणपत चव्हाण सभागृहाचे नामकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते झाले. यावेळी नऊवारी साडी परिधान केलेल्या विद्यार्थिनींनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने संस्थेतर्फे तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. संस्थेच्या कार्याचा सुरुवातीपासूनचा आढावा या स्मरणिकेत घेण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये उत्साह
मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटीच्या सुवर्ण महोत्सवाच्या सांगता समारंभाला मंत्री उपस्थित राहणार होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमस्थळी सुंदर रांगोळ्या रेखाटल्या होत्या. कार्यक्रमस्थळी मंत्र्यांना पाहण्यासाठी विद्यार्थी उत्सुक होते.

Web Title: Education does not want to be marketed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.