डिजीटल शाळांसाठी शिक्षणमंत्र्यांची भेट
By admin | Published: May 17, 2016 10:37 PM2016-05-17T22:37:27+5:302016-05-18T00:16:48+5:30
शैक्षणिक दर्जा सुधारेल : सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन
मालवण : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे चांगली गुणवत्ता आहे. इंग्रजी माध्यमातील शाळांना टक्कर देणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमध्ये दर्जात्मक विद्यार्थी दडलेले असतात. त्यामुळे शासन स्तरावरून जिल्हा परिषद शाळा डिजीटल तसेच ई-लर्निंग करण्यात याव्यात, या मागणीसाठी भाजपा मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेत लक्ष वेधले आहे. मंत्रिमहोदयांनी शासनाच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय घेवू, असे आश्वासन दिल्याचे मोंडकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. मालवण तालुक्यातील रेवंडी प्राथमिक शाळेत डिजीटल शिक्षणाचे धडे दिले जात असून विद्यार्थ्यांनीही त्यात चांगले कसब दाखवत गुणवत्ता सिध्द केली आहे. त्या अनुषंगाने प्राथमिक शाळा डिजीटल झाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढेल. (प्रतिनिधी)
शाळांची यादी सादर
मालवणातील शाळांची पटसंख्याही लक्षणीय असून विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने अभ्यास करता येईल. तालुक्यातील किमान ३५ शाळांमध्ये भाजप सरकारच्या माध्यमातून ई-लर्निंग व डिजीटल शाळा या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, असेही मोंडकर यांनी निवेदनात म्हटले आहे. तालुक्यातील जास्त पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळांची यादी शिक्षणमंत्र्यांना देण्यात आली असून याबाबत मंत्री तावडे सकारात्मक असल्याचे मोंडकर यांनी म्हटले आहे.