शिक्षणाधिकारी धारेवर
By admin | Published: June 5, 2014 12:37 AM2014-06-05T00:37:42+5:302014-06-05T00:38:15+5:30
सतीश सावंत : विद्यार्थ्यांना रंगीत गणवेश मिळालेच पाहिजेत
सिंधुदुर्गनगरी : शालेय गणवेशाचा रंग बदलण्याचा ठराव घेऊन तब्बल दोन वर्षे लोटली तरी याबाबत प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठवला होता. या वृत्ताची दखल घेत या शैक्षणिक वर्षातच विद्यार्थ्यांना आकर्षक रंगाचे गणवेश मिळालेच पाहिजे, असा पवित्रा जि.प. सदस्य सतीश सावंत यांनी घेत शिक्षणाधिकार्यांना धारेवर धरले. यावेळी शिक्षणाधिकार्यांनी यासाठी खास अधिकार्यांची नियुक्तीही केली आहे. गणवेशाचा रंग निश्चितीसाठी १२ रोजी खास शिक्षण समिती सभेचे आयोजनही करण्यात आले आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना आकर्षक गणवेश मिळणार हे आता निश्चित झाले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या गणवेशाचा पारंपरिक रंग बदलून आकर्षक रंगातील गणवेश पुरविण्याचा दोन वर्षांपूर्वी शिक्षण समितीने निर्णय घेतला होता. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रशासनाकडून सदस्यांच्या या ठरावाला वाटाण्याच्या अक्षता लावणार्या प्रशासनासह सदस्यांना जाग येण्यासाठी ‘लोकमत’ने गणवेश रंग बदलाबाबत प्रशासन उदासीन असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल आजच्या समिती सभेत घेण्यात आली. गणवेश रंगाबाबत चर्चा करताना सदस्य सतीश सावंत यांनी शिक्षणाधिकारी धाकोरकर यांना धारेवर धरले. मात्र धाकोरकर यांनी, आता वेळ निघून गेली, असे म्हणत गणवेशाचा रंग बदलणे शक्य नसल्याचे सांगितले. या शिक्षणाधिकार्यांच्या भूमिकेला विरोध दर्शवत सदस्य आक्रमक बनले. गणवेशाचा रंग बदलायला दोन वर्षे लागतात का? गतवर्षी उशीर झाला असेल मात्र यावर्षी गणवेशाचा रंग बदलला पाहिजे, याबाबत तत्काळ कार्यवाही करा. आठ दिवसात विविध रंगाच्या गणवेशाचे नमुने सादर करा. यावेळी कणकवली, कुडाळ, दोडामार्ग व सावंतवाडी या चार गटशिक्षणाधिकार्यांची नेमणूक करून त्यांच्याकडे गणवेशाचा रंग बदलाबाबतची जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी सदस्यांनी १२ जून रोजी दुपारी ३.३० वाजता गणवेशाचा रंग निश्चित करण्यासाठी खास शिक्षण समिती सभा लावली असून यावेळी रंगसंगती निश्चित करण्यात येणार आहे. गणवेश रंग बदलाच्या विषयावरून सदस्य व अधिकारी यांच्यात वादळी चर्चा झाली. अखेर खूप वेळ रंगलेल्या चर्चेअंती आता विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षापासून आकर्षक रंगाचा गणवेश मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)