अनाथ कन्येला संस्थेचे शिक्षणाचे पंख

By admin | Published: September 6, 2015 10:35 PM2015-09-06T22:35:12+5:302015-09-06T22:35:12+5:30

वात्सल्याचे छत्र : सनदी अधिकारी होण्याकडे ‘मधूर’ प्रवास

The education wings of the orphan girl | अनाथ कन्येला संस्थेचे शिक्षणाचे पंख

अनाथ कन्येला संस्थेचे शिक्षणाचे पंख

Next

शोभना कांबळे - रत्नागिरी  दोनवेळा ‘पोरकी’ होण्याचा शाप भोगत असतानाच संस्थेने दिलेल्या मायेच्या छत्रामुळे शिक्षणाचे पंख लाभले आणि अनाथ असलेल्या ‘मधुरा’ची वाटचाल उच्च शिक्षणाच्या दिशेने सुरू झाली. त्यामुळे आता ‘एम. एस. डब्ल्यू.’ला प्रवेश घेतलेली मधुरा आता सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरारी घेऊ लागली आहे. मधुरा जन्मल्यानंतर मुंबईतील वात्सल्य मंदिरात वाढली. हे बालगृहच तिचे सर्वस्व होते. सातव्या वर्षी तिला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाटकर दाम्पत्याच्या रूपाने माता-पित्यांचे छत्र लाभले. चिमुकली मधुरा आई-बाबा मिळताच हरखून गेली. मात्र, नियतीला तिचे हे सुख बघवले नाही आणि ती बारा वर्षांची असतानाच मातृछत्र हरपले. त्यानंतर दोन वर्षांनी वडिलांचेही निधन झाले. ती दुसऱ्यांदा अनाथ झाली. तिला लांजा येथील बालगृहात दाखल करण्यात आले. तिचे आठवीपासूनचे शिक्षण पुढे सुरू झाले. मधुरा जात्याच हुशार असल्याने तिने मन लावून अभ्यास केला आणि दहावीत ६० टक्के, तर बारावीत कला शाखेत ६८ टक्के गुण मिळवले.
पुढच्या शिक्षणासाठी तिला गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात प्रवेश मिळाला. त्यामुळे रत्नागिरीतील प्रतिभा शासकीय महिला वसतिगृहात ती दाखल झाली. या संस्थेत खऱ्या अर्थाने मधुराचा ‘मधूर’ प्रवास सुरू झाला. संस्थेच्या अधीक्षिका मंदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मधुराचा सर्वांगीण विकास सुरू झाला. महाविद्यालयाच्या एन. एस. एस. विभागाच्या प्रा. डॉ. चित्रा गोस्वामी आणि त्यांचे सहकारी यांनीही या हिऱ्याची पारख करून त्याला पैलू पाडण्यास सुरुवात केली. यातूनच तिच्या लेखनाला प्रोत्साहन मिळाले. कॉलेजच्या सहकार अंकामध्ये तिचे लेख प्रसिद्ध होऊ लागले. अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्येही तिने वर्चस्व निर्माण केले. मधुराचे कॉलेज सकाळचे असल्याने दुपारनंतरच्या मोकळ्या वेळात तिने शॉर्टहँड, फॅशन डिझायनिंग, कराटे यांचेही प्रशिक्षण पूर्ण केले. हा प्रवास तिचा अतिशय वेगाने झाला. तिच्या या हुशारीमुळे, धडपड्या वृत्तीमुळे ती संस्थेप्रमाणे आपल्या शिक्षकांचीही लाडकी झाली. त्यांचे सहकार्य तिला पावलोपावली मिळू लागले. या साऱ्यांच्या प्रेरणेने मे २०१५ मध्ये मधुरा चक्क ६६ टक्के गुणांनी बी. ए. उत्तीर्ण झाली. या आनंदाबरोबरच तिच्या आयुष्यात अतिशय आनंदाचा क्षण म्हणजे तिला तिच्या आत्येनेच माता - पित्याचे छत्र दिले आहे. त्यामुळे ती आता आत्येच्या प्रेमळ छायेखाली आयुष्याचा पुढचा प्रवास करत आहे.
आजवरच्या प्रवासात आलेल्या अनुभवामुळे मधुराला अनाथ मुलांसाठी काम करण्याची तीव्र इच्छा आहे. त्यामुळे तिला सनदी अधिकारी बनायचे आहे. यासाठी कितीही परिश्रम करावे लागले तरी तिची तयारी आहे. मधुरा आता पणजी येथील विद्यापीठात एम. एस. डब्ल्यू करतेय. त्याचबरोबर कणकवली येथील नेहरू युवा केंद्रात तालुका समन्वयक म्हणूनही काम करतेय. ती तिथे असली तरी तिची पावले ज्या संस्थेने तिला हा सारा आनंद मिळवून दिला, त्या प्रतिभा शासकीय महिला वसतिगृहाकडे, पाटील मॅडमना, गोस्वामी मॅडमना भेटण्यासाठी आपसूक वळतात. तिचा काळाकुट्ट भूतकाळ केव्हाच नष्ट झाला आहे.


मला संस्थेने प्रेम आणि आत्मविश्वास दिला. संस्था नसती तर मी इथपर्यंत पोहोचू शकले नसते. गोस्वामी मॅडम, पाटील मॅडम यांच्यामुळेच माझ्या जीवनात आता आनंद आला आहे. अनाथ मुलांसाठी, महिलांसाठी मला काहीतरी करायचय. आयएएस अधिकारी होण्याचे माझे स्वप्न आहे. त्यासाठी मी एमपीएससी परीक्षेचीही तयारी करतेय.
- मधुरा पाटकर

संस्थेत आल्यानंतर मधुरा विविध स्पर्धांमध्ये यश मिळवीत गेली. १ मे, १५ आॅगस्ट, २६ जानेवारी या दिवशी तिचा मुद्दाम सत्कार करायचे, यातून इतर मुलींनाही प्रेरणा मिळत गेली. संस्थेत आलेल्या मुलींना पुढे काय करायचे, हे कळत नाही. पण या मुलींची आवड लक्षात घेऊन त्यांना मार्गदर्शन केले, तर त्या नक्कीच त्याचे चीज करतात, याचे उत्तम उदाहरण मधुरा आहे. अशा कित्येक मुली आहेत.
- मंदा पाटील,
अधीक्षीका


येथील जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी जावेद शेख यांची बदली झाली असून, त्यांचा तात्पुरता कार्यभार सिंधुदुर्गचे यु. एस. भोसले यांच्याकडे देण्यात आला आहे. मधुराबाबत मंदा पाटील यांनी त्यांना माहिती देताच त्यांनी मधुराला बोलावले, तिचे कौतुक केले आणि तिला सांगितले, तुझे टायपिंग पूर्ण झाले की सांग. मी तुला नक्कीच नोकरी मिळवून देईन. त्यामुळे मधुराला खूप धीर आला आहे.

Web Title: The education wings of the orphan girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.