'शिक्षण आपल्या दारी' उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 01:04 PM2020-09-25T13:04:42+5:302020-09-25T13:06:43+5:30

कोरोना व्हायरसचा फटका विविध क्षेत्रांना बसत आहे. त्यात शिक्षण क्षेत्राचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये विद्यार्थी येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कणकवली पंचायत समितीने ' शिक्षण आपल्या दारी ' हा सर्वसमावेशक उपक्रम हाती घेतला आहे. तालुक्यातील ७,५०० विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घरबसल्या घेत असून त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे.

'Education at your door' activity guide for students! | 'शिक्षण आपल्या दारी' उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक !

 शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांच्यासारखे अधिकारी व शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन प्रश्नसंच तपासत आहेत.

Next
ठळक मुद्दे'शिक्षण आपल्या दारी' उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक !कणकवली पंचायत समितीचा उपक्रम ; ७५०० विद्यार्थ्यांना फायदा

सुधीर राणे

कणकवली  : कोरोना व्हायरसचा फटका विविध क्षेत्रांना बसत आहे. त्यात शिक्षण क्षेत्राचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये विद्यार्थी येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कणकवली पंचायत समितीने ' शिक्षण आपल्या दारी ' हा सर्वसमावेशक उपक्रम हाती घेतला आहे. तालुक्यातील ७,५०० विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घरबसल्या घेत असून त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे.

कोरोनामुळे शाळांचे शैक्षणिक कामकाज थांबले आहे . शहरी भागातील काही शैक्षणिक संस्थांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे . मात्र , ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कसे टाळता येईल ? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणारा विद्यार्थी हा सर्वसामान्य कुटुंबातील असतो. त्यामुळे या मुलांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचविणे शक्य नव्हते . ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध होत नाही. तर अनेक मुलांकडे अँड्रॉईड मोबाईल संच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार हे निश्चित होते .

त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कणकवली पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून ' शिक्षण आपल्या दारी ' हा अभिनव उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले .

या उपक्रमामधून ऑफलाईन पध्दतीने दर आठवड्याला विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांनी लेखी प्रश्नसंच पोहोचवायचे. तसेच पूर्वी दिलेले प्रश्नसंच संकलित करून त्याचे परीक्षण करायचे असे ठरले. त्याप्रमाणे या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली . कणकवली तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांनी सहकार्य केल्याने ६५० शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले . त्यांनी घरोघरी जात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या उपक्रमासाठी पंचायत समिती सेस फंडातून शैक्षणिक निधी घेण्याचे ठरविण्यात आले . तसा ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत मांडल्यानंतर सर्वानुमते त्याला मंजुरी मिळाली . याउपक्रमासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी , केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक आणि शिक्षक असे सर्वजण कामाला लागले . शिक्षकांकडून स्वाध्याय कार्ड वितरित व संकलित करण्याबरोबरच केंद्रप्रमुख , शिक्षणविस्तार अधिकारी सुध्दा विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचत स्वाध्याय कार्डची तपासणी करत आहेत.

कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान पाहून पालक चिंतेत होते . अशा परिस्थितीत ' शिक्षण आपल्या दारी ' या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना फायदा झाला. शिक्षकांच्या माध्यमातून प्रश्नसंच घरी येत असल्याने व त्यातील न समजणारे विषय मुले विचारत असल्याने पालकांचाही सहभाग या उपक्रमात वाढू लागला आहे.

एरव्ही शाळेमध्ये काय शिकविले जाते याची सहसा दखल न घेणाऱ्या पालकांना घरी त्यांचीच मुले अभ्यासक्रमावरून प्रश्न विचारू लागली आहेत. त्यामुळे घरामध्ये शैक्षणिक संवाद होऊ लागला. हे या उपक्रमाचे मोठे फलित आहे .

पंचायत समितीकडून दर आठवड्याला या उपक्रमासाठी सुमारे ११ हजारांचा निधी खर्च केला जातो . सेस फंडाचा निधी संपल्याने आता विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमासाठी ठेवलेला निधी या कामासाठी खर्च केला जाणार आहे . ' शिक्षण आपल्या दारी ' उपक्रमात सहभागी होताना तालुक्यातील शिक्षकांनी मोठे योगदान दिले आहे .

कणकवली तालुक्यातील विविध चेकपोस्टवर कोविड ड्युटी करताना , गावागावातील शाळामध्ये संस्था विलगीकरण झालेल्या चाकरमान्यांकडे लक्ष देण्याचे काम शिक्षक करत होते . हे करत असताना या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही , याची खबरदारीही तालुक्यातील शिक्षकांनी घेतली आहे. त्यांचे हे काम वाखाणण्याजोगे आहे.

यापुढेही उपक्रम सुरूच राहणार !

तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचणे शिक्षक , त्यांचे कुटुंबीय तसेच विद्यार्थी व पालकांसाठी त्रासदायक आहे. त्यामुळे येत्या काळात ' शिक्षण आपल्या दारी' हा उपक्रम पीडीएफ प्रश्नसंच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून सुरू ठेवला जाणार आहे . असे गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांना चांगला शैक्षणिक फायदा !

कणकवली तालुक्यातील पहिली ते सातवीपर्यंतच्या २२२ शाळांमधील विद्यार्थ्यांना आतापर्यंत ८ स्वाध्याय कार्ड देण्यात आले आहेत . तर या माध्यमातून ऑगस्टपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला आहे . त्यामुळे 'शिक्षण आपल्या दारी' या उपक्रमाचा चांगला फायदा तालुक्यातील विद्यार्थ्यांना झाला आहे. या उपक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो . असे सभापती दिलीप तळेकर म्हणाले.

Web Title: 'Education at your door' activity guide for students!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.