सिंधुदुर्गात रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 06:10 PM2019-04-05T18:10:24+5:302019-04-05T18:15:06+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात होताना दिसत आहे.
सिंधुदुर्गनगरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात होताना दिसत आहे. जिल्हा परिषदेला सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात ४ लाख २२ हजार मनुष्य दिनाचे उद्दिष्ट साध्य करत १२ कोटी ५० लाख रुपये मजुरीवर खर्च केला आहे. तर २०१९-२० या आर्थिक वर्षांत ६ लाख ६८ हजार ९२८ मनुष्य दिनाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा प्रारंभ झाला तेव्हापासूनच या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही योजना ग्रामीण भागात पोहोचवली गेली. ग्रामीण भागातील कुटुंबाला वर्षाला १०० दिवस काम देवून त्यांच्या आर्थिक स्त्रोताबरोरबरच गावाचा विकास करून घेणे हे मुख्य कारण या योजनेचे आहे. या योजनेअंतर्गत फळबाग लागवड, सिंचन विहीर, शोषखड्डे, बंधारे, गुरांचे गोठे, शौचालय, पायवाटा, रस्ते, कुक्कुटपालन शेड, संरक्षण भिंत यासारखी कामे ग्रामीण मजुरांच्या माध्यमातून केली गेली.
गत आर्थिक वर्षात या योजनेची स्थिती पाहिली तर समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी मनुष्यदिन उद्दिष्ट ४ लाख ९ हजार होते. पैकी ४ लाख २२ हजार पुर्ती करण्यात आली. तर लेबर बजेट खर्च १४ कोटी ५० लाख एवढे होते. पैकी मजुरीवर १२ कोटी ५० लाख २७ हजार रुपये खर्च करण्यात आले.
यात देवगड तालुक्यात मनुष्य दिनाचे ६१ हजार उद्दिष्ट होते पैकी ८८ हजार साध्य करून मजुरीवर २ कोटी १३ लाख ६८ हजार खर्च झाला आहे. दोडामार्ग तालुक्याला २३ हजार मनुष्य दिन उद्दिष्टपैकी २१ हजार साध्य झाले आहे. यावर ५५ लाख १९ हजार रुपए खर्च झाला आहे. कणकवलीत ७५ हजार मनुष्य दिन उद्दिष्टपैकी ५२ हजार साध्य करण्यात आले आहे. यावर १ कोटी ९६ लाख ५७ हजार रुपये खर्च झाले आहेत.
कुडाळात ६७ हजार मनुष्य दिनापैकी ८४ हजार साध्य झाले असून यावर २ कोटी ६६ लाख मजुरीवर निधी खर्च झाला आहे. मालवण तालुक्यात ८६ हजार मनुष्यदिनापैकी १ लाख १८ हजार साध्य झाले आहेत. यावर ३ कोटी ५५ लाख रुपये खर्च झाले आहेत. सावंतवाडी तालुक्यात ५४ हजार मनुष्य दिनाच्या उद्दिष्टपैकी ३४ हजार पुर्तता झाली असून यावर ९४ लाख खर्च झाला आहे. वैभववाडी तालुक्यात २१ हजार मनुष्यदिन पैकी १० हजार पुर्ती झाली आहे. यावर २९ लाख २२ हजार रुपये खर्च झाले आहेत. वेंगुर्ला तालुक्यात २४ हजार उद्दिष्टपैकी १५ हजार मनुष्य दिन साध्य झाले असून ४० लाख १९ हजार रुपये मनुष्यदिनावर खर्च झाले आहेत.
६ लाख ६९ हजाराचे उद्दिष्ट
चालू आर्थिक वर्षासाठी ६ लाख ६८ हजार ९२८ मनुष्यदिनाचे उद्दिष्ट शासनाने जिल्हा परिषदेला दिले आहे. यात देवगड १ लाख १९ हजार ०२४, दोडामार्ग ३० हजार २९६, कणकवली तालुक्याला १ लाख १५ हजार ७२८, कुडाळ १ लाख २० हजार ५३५ , मालवण १ लाख ३९ हजार ३५७, सावंतवाडी ७२ हजार १६४, वैभववाडी ३० हजार ९८५, वेंगुर्ला ४० हजार ८३९ मनुष्यदिनाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.