कोकण रेल्वेला अडचणीत आणण्याचे प्रयत्न

By admin | Published: August 29, 2014 10:43 PM2014-08-29T22:43:01+5:302014-08-29T23:09:27+5:30

मोहन केळुसकर : मध्य रेल्वेवर आरोप, दुपदरीकरणाची मागणी

Efforts to relieve Konkan Railway | कोकण रेल्वेला अडचणीत आणण्याचे प्रयत्न

कोकण रेल्वेला अडचणीत आणण्याचे प्रयत्न

Next

कणकवली : मध्य रेल्वेच्या मोटरमन आणि गार्डने कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत व्हावी याच उद्देशाने रोहा स्थानकात हद्दीच्या वादावरून विनाकारण हंगामा केला. मालगाडीच्या अपघातामुळे आधीच विस्कळीत झालेली कोकण रेल्वे सेवा आणखी बिघडली. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. कोकण रेल्वेला अडचणीत आणण्याचे हे मध्य रेल्वेचे षड्यंत्र आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी या प्रश्नी तातडीने गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच कोकण रेल्वेच्या एकेरी मार्गाच्या क्षमतेपेक्षा सध्या दीडपटीने गाड्या या मार्गावरून धावत असल्याने कोकण रेल्वेच्या या मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी रेल्वे मंत्र्यांसह कोकणातील खासदारांना केली आहे.
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर आणि कोकण रेल्वेचे अध्यक्ष यांच्यामध्ये समन्वय नसल्याने चाकरमान्यांना तसेच या मार्गावरून दक्षिण आणि उत्तरेकडे धावणाऱ्या गाड्यांतील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. तसेच मध्य रेल्वेने मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या दबावाखाली निलंबित केलेल्या मोटरमनचे निलंबन मागे घेऊन केंद्रीय रेल्वे प्रशासनाचे हसे करून घेतले. तरी या दोन्ही रेल्वेच्या या अधिकाऱ्यांची तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वास्तविक गेली अनेक वर्षे कोकण रेल्वेच्या मार्गाचा वापर कोकण रेल्वे व्यतिरिक्त मध्य रेल्वे, दक्षिण-मध्य रेल्वे, उत्तर-मध्य रेल्वे, तर काही प्रमाणात पश्चिम रेल्वे करीत आहे.
मात्र, यापूर्वी रेल्वेच्या हद्दीवरून अशा प्रकारचे वाद झाले नाहीत. केवळ गणेशोत्सवाला कोकणात चाललेल्या चाकरमान्यांना वेठीस धरण्यासाठी मोटरमनने हा वाद उकरून काढला. त्यामध्ये कोकण रेल्वे मार्ग तोट्याचा असल्याचे भासविण्याचे षड्यंत्र आहे. अलिकडे तीनवेळा मालगाड्या घसरल्याने ही रेल्वे ठप्प झाली होती. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून या मार्गाचे दुपदरीकरण तातडीने हाती घ्यावे. बोगदे, पूल याठिकाणी अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा बसवून उर्वरित मार्गाचे तातडीने दुपदरीकरण करणे शक्य आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Efforts to relieve Konkan Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.