जयानंद मठकरांच्या स्मारकासाठी प्रयत्नशील: दीपक केसरकर
By admin | Published: April 20, 2017 04:55 PM2017-04-20T16:55:16+5:302017-04-20T16:55:16+5:30
सावंतवाडीत मठकरांची पुण्यतिथि साजरी; मधु मंगेश कर्णिकांना मठकर स्मृती पुरस्कार
आॅनलाईन लोकमत
सावंतवाडी, दि. २0 : जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या पत्रकार भवनाचा लवकरच भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी सर्व आवश्यक तांत्रिक मुद्दे पूर्ण झाल्याचे सांगत कै. जयानंद मठकर यांनी शेवटपर्यंत पत्रकारिता सुरू ठेवत अनेक विषयांना वाचा फोडण्याचे काम केले. तेच काम आजचे पत्रकार करत आहेत. भविष्यात मठकरांचे स्मारक उभे रहावे, अशी इच्छा व्यक्त करत त्यासाठी प्रयत्नही करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी येथे दिली.
ज्येष्ठ पत्रकार व साप्ताहिक वैनतेयचे माजी संपादक कै. जयानंद मठकर यांच्या प्रथम स्मृतीदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त श्रीराम वाचन मंदिर व सावंतवाडी तालुका पत्रकार संघ यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री केसरकर बोलत होते.
यावेळी कै. जयानंद मठकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर ह्यवैनतेयकारह्ण जयानंद मठकर पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार शशिकांत सावंत यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. दीपक नेवगी, सारस्वत बँकेचे संचालक सुनील सौदागर, वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष प्रा. प्रवीण बांदेकर, गणेश जेठे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई, मिलिंद मठकर, अ?ॅड. संदीप निंबाळकर, संजू शिरोडकर, बाळासाहेब बोर्डेकर, डॉ. जी. ए. बुवा, सखी पवार, प्रा. अरूण पणदूरकर, शशिकांत नेवगी, प्रा. मिलिंद भोसले आदी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना मधु मंगेश कर्णिक म्हणाले, मानवी जीवनाचे प्रश्न पुन्हा मान वर करत आहेत. यासाठी लेखकाने वास्तववादी लेखनाकडे वळण्याची नितांत गरज आहे. महाराष्ट्रातील पत्रकारिता ही पुरोगामी मानली जाते. टिळकांची पत्रकारिता ज्वलंत होती, तर आगरकरांची पत्रकारिता सौम्य होती. मात्र, स्वातंत्र्य मिळविणे हे दोघांचे एकच ध्येय होते. हीच पत्रकारिता आताच्या पत्रकारांनी पुढे चालविली पाहिजे, असे कर्णिक म्हणाले.
प्रास्ताविकात प्रा. प्रवीण बांदेकर यांनी वि. स. खांडेकर यांच्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना मिळावा, असा आशावाद व्यक्त करत त्यांच्या साहित्यातील योगदानाबाबतची माहिती दिली. पत्रकार संघाच्या उपक्रमांची माहिती सदस्य संतोष सावंत यांनी दिली. सूत्रसंचालन सुमेधा नाईक-धुरी यांनी केले. (वार्ताहर)
वास्तव साहित्यासाठी मरणाचीही तयारी ठेवा...
सद्यस्थितीचे वातावरण अजूनही अस्थिर असून साहित्यिकांनी सत्यासाठी अविरत प्रयत्नरत राहण्याची गरज आहे, त्यासाठी वास्तववादी लेखन हीच काळाची गरज आहे. त्यामुळे साहित्यिकांनी अशा साहित्य निर्मितीसाठी जगायची आणि मरायची तयारी ठेवली पाहिजे, असा सल्ला मंधु मंगेश कर्णिक यांनी साहित्यिकांना दिला.