कणकवलीत २० ते २७ सप्टेंबर कालावधीत आठ दिवस कडक जनता कर्फ्यू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 04:26 PM2020-09-17T16:26:40+5:302020-09-17T16:30:16+5:30
कणकवली शहरात वाढणारा कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता २० ते २७ सप्टेंबर या कालावधीत कडक जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या सभेत घेण्यात आला आहे. या कालावधीत शहर १०० टक्के बंद रहाणार आहे.
कणकवली : कणकवली शहरात वाढणारा कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता २० ते २७ सप्टेंबर या कालावधीत कडक जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या सभेत घेण्यात आला आहे. या कालावधीत शहर १०० टक्के बंद रहाणार आहे.
कणकवली नगरवाचनालय सभागृहात नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली जनता कर्फ्यूबाबत निर्णय घेण्यासाठी ही सभा झाली.यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, नगरसेवक अभिजित मुसळे,मेघा गांगण,सुशांत नाईक,पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जेठे,व्यापारी मंदार आळवे,नंदू उबाळे,राजू पारकर,महेश नार्वेकर, विलास कोरगावकर, अँड.दीपक अंधारी व अन्य नागरिक उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले, कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी कणकवली शहरात जनता कर्फ्यू झाला पाहिजे,अशी अनेक नागरिकांची मागणी आहे. त्याबाबत नगरपंचायतला अनेक निवेदन आली आहेत.त्यामुळे त्याबाबत आपण सर्वांनी चर्चेतून मार्ग काढायचा आहे. दिवसेंदिवस शहरात रुग्ण वाढत आहेत. ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आमची कोणत्याही व्यापाऱ्यांना त्रास देण्याची भूमिका नाही.
व्यापाऱ्यांनी नगरपंचायतला सहकार्य करायचे आहे. शहर १०० टक्के बंद झाले पाहिजे.सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी. नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आम्हाला कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्युचा निर्णय घ्यावा लागेल.परिस्थिती भयानक आहे. व्यापाऱ्यांना मी या सभेला बोलावले होते. काही व्यापारी जनता कर्फ्यूसाठी तयार नव्हते. त्याच्याशी सल्लामसलत सुरू आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी मिळून काम करुया. शहर येणारा रविवार ते पुढचा रविवारी बंद ठेवायचे आहे. दूध व भाजी विक्री पण बंद ठेवायची आहे. औषधे फोनवर संपर्क साधून दुकानदारांकडून घ्यायची आहेत.
आम्ही कोणावर जनता कर्फ्यू लादणार नाही. एखादी व्यक्ती मृत झाल्यास त्यांच्या घरात कोणीही येत नाही.घरात कोरोना बाधित रुग्ण असलेल्या व्यक्तीही आपले दुकान उघडे ठेवत आहेत. हे योग्य नव्हे. याबाबत निश्चितच विचार करावा.
यावेळी व्यापारी मंदार आळवे म्हणाले,आम्ही प्रथम शहराचे नागरिक आहोत.त्यानंतर व्यापारी आहोत. त्यामुळे १०० टक्के शहर बंद होत असेल तर व्यापारी आपली दुकाने निश्चितच बंद ठेवतील. एँड. दीपक अंधारी म्हणाले, वाढत्या कोरोनाचा विचार करा,सगळे व्यवहार बंद ठेवा. न्यायालये बंद आहेत. त्यामुळे काही काळ शहर बंद ठेवले तर किती फरक पडणार आहे ? याचा विचार करावा. प्रथम ग्राहक शिल्लक राहिला पाहिजे.तरच उद्याचा व्यापार टिकेल हे सर्वांनी लक्षात ठेवावे.
शिवसेना गटनेते नगरसेवक सुशांत नाईक म्हणाले, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी मदत करावी. कुडाळच्या धर्तीवर शहर बंद करु या. पुढिल काळाचा विचार करुन आता निर्णय घेतला पाहिजे. अशी व्यापारी व सर्वांना मी विनंती करतो.
गणेश जेठे म्हणाले,कोरोना हा विषय गांभीर्याने घ्यावा. मधुसुदन बांदिवडेकर यांचे कोरोनामुळे अचानक निधन झाले. अशा होणाऱ्या मृत्यूतून तरी धडा घेऊन आपण काही तरी तातडीने निर्णय व्हायला हवा. ग्रामीण भागातील लोक शहरात जास्त येतात. त्यामुळे साखळी तुटली तरच कोरोनावर मात करता येईल.
अभिजित मुसळे म्हणाले,ओरोसला जिल्हा रुग्णालयात भीषण स्थिती आहे. कोरोनाचा हा भयानक आजार आहे. तो गंभीरपणे घ्या.खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांना सेवा द्यायला हवी. ऑक्सिमिटर सर्वांकडेच आहे. त्यामुळे योग्य उपचार मिळण्यासाठी खासगी डॉक्टरांनी सहकार्य करावे.
या सभेत अन्य उपस्थित मान्यवरानीही आपली मते मांडली. त्यानंतर सर्वानुमते कणकवलीत जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सर्वांचे आभार नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मानले.
सभेतील महत्वाचे निर्णय !
शहरात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात येतील. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. आवश्यक औषधांची व्यवस्था फोनवर करावी. येत्या दोन दिवसांत नागरिकांनी आवश्यक साहित्याची खरेदी करावी.