आठ बंडखोरांची सेनेतून हकालपट्टी
By admin | Published: February 16, 2017 11:30 PM2017-02-16T23:30:55+5:302017-02-16T23:30:55+5:30
राजापुरात सात; रत्नागिरीत एकाचा समावेश
राजापूर/रत्नागिरी : शिवसेनेची पक्षशिस्त मोडून पक्षाविरोधात बंडखोरी करणाऱ्या राजापुरातील सात, तर रत्नागिरीतील एका पदाधिकाऱ्याला तत्काळ बाहेरचा मार्ग दाखवून शिवसेनेने कारवाईचा बडगा उगारला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.
शिवसेनेतील बंडखोरी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीही शमली नाही. त्यानंतरही सेनेच्या विरोधात बंडखोरांनी काम सुरू ठेवल्याने रत्नागिरी तालुक्यातील शिवसेनेचे गोळप उपविभागप्रमुख राकेश साळवी यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. याबाबत तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी एका पत्रकाद्वारे प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.
राजापूर तालुक्यातही शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली होती. जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेत बंडखोरी झाली आहे. त्यामध्ये ओणी गटातून माजी तालुका संपर्कप्रमुख संतोष पावसकर, पाचल गटातून पूर्वा पाथरे, कोदवली गणातून अभिजित गुरव यांनी पक्षाला थेट आव्हान देत आपले अर्ज सादर करीत ते कायम ठेवल्याने शिवसेनेपुढील अडचणीत वाढ झाली आहे. त्यातूनच सेनेतील नाराजीचे उघड दर्शन झाले होते.
पक्षालाच थेट आव्हान देणाऱ्या बंडखोरांसमवेत त्यांना साथ देणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी थेट मातोश्रीवर गेल्या व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘त्या’ बंडखोरीची दखल घेऊन सात बंडखोरांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखविला आहे. त्यामध्ये ओणीतून बंडखोरी करणारे माजी संपर्कप्रमुख संतोष पावसकर, पाचलच्या बंडखोर उमेदवार पूर्वा पाथरे यांचे पती व पाचलचे शाखाप्रमुख प्रसाद पाथरे, पाचलचे आणखी एक शाखाप्रमुख सुरेश ऐनारकर, तळवडेचे शाखाप्रमुख संदीप बारस्कर, नेरकेवाडीचे दिलीप पवार, पाचलच्या महिला विभाग संघटक शशिकला देवरुखकर, कोदवली गणाचे उमेदवार अभिजित गुरव यांचा समावेश आहे.
गुरुवारी राजापूर दौऱ्यावर आलेले शिवसेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत व आमदार राजन साळवी यांनी चर्चा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांचा बंडखोरांवरील कारवाईबाबतचा निर्णय सांगण्यात आला. त्यानुसार शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी पक्षप्रमुखांच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे जाहीर केले आहे. त्याचवेळी काही नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पाचल शाखाप्रमुखपदी हेमंत सीताराम नारकर, पाचलचे आणखी एका शाखाप्रमुख प्रकाश धुळप, तळवडे शाखाप्रमुखपदी सुरेश गुडेकर, नेरकेवाडी रमेश शिवगण व पाचल महिला संघटकपदी अंजली कडू यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, ही घोषणादेखील तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी केली आहे.
अखेर शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या मंडळींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्याचे आता कसे पडसाद उमटतात याकडे तालुक्यातील राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)