Sindhudurg: वझरेत एकाचवेळी अठरा परप्रांतीय कामगारांना मलेरियाची लागण, आरोग्य विभागात खळबळ
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 31, 2023 05:27 PM2023-08-31T17:27:26+5:302023-08-31T17:28:12+5:30
दोडामार्ग ( सिंधुदुर्ग ) :सध्या सर्वत्र तापसरीच्या साथीने लोक बेजार झाले असताना वझरे येथील आंगण गृहप्रकल्पात काम करणाऱ्या तब्बल ...
दोडामार्ग (सिंधुदुर्ग) :सध्या सर्वत्र तापसरीच्या साथीने लोक बेजार झाले असताना वझरे येथील आंगण गृहप्रकल्पात काम करणाऱ्या तब्बल अठरा परप्रांतीय कामगारांना मलेरियाची लागण झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.त्यामुळे खडबडून जागा झालेला आरोग्यविभाग हाय अलर्ट झाला असून घटनास्थळी जात जंतुनाशक फवारणी करण्याचे काम आरोग्य कर्मचाऱ्यांनी हाती घेतले आहे.
बदलत्या वातावरणामुळे दोडामार्ग तालुक्यात सध्या तापसरीची साथ सुरू आहे.त्यात साथीच्या तापाचा देखील समावेश आहे. डासांपासून लागण होणाऱ्या हिवतापाची साथ झपाट्याने वाढत आहे. वझरे येथे आंगण गृह प्रकल्प होत असून त्याठिकाणी इमारती उभारण्याचे काम चालू आहे. हे काम करण्यासाठी अनेक परप्रांतीय कामगार त्या ठिकाणी राहतात. गेली काही वर्षे चाललेल्या इमारतींचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे हे कामगार त्याच ठिकाणी बस्थान मांडून आहेत. इमारतींच्या आत व सभोवताली डबक्यात किंवा प्लास्टिक मध्ये पाणी साचून राहिले असल्याने त्या ठिकाणी डासांची पैदास वाढली आहे.
या डासांपासून तेथील कामगारांना हिवतापाची लागण झाली. हिवतापाची लागण झाल्याचे कळताच आरोग्य विभागाने त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण इमारतींची व सभोवतालच्या परिसराची पाहणी केली. यावेळी ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यात डासांच्या अळी व डास निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. तसेच तेथील कामगारांची देखीक तपासणी केली. आतापर्यंत सुमारे १८ जण हिवताप बाधित झाले आहेत. त्या हिवताप बाधित १८ कामगारांना मोरगाव पिएससीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार गोराड हे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करीत आहेत.
या प्रकारानंतर आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहे. काम चालू असलेल्या इमारतींमध्ये व सभोवताली साचलेल्या पाण्यात डासांची अळी शोधून काढून ती नष्ट करण्याचे काम हाती घेतले आहे. गेली चार दिवस ते किटक नाशक औषधाची फवारणी करीत आहेत. यावेळी जिल्हा हीवताप अधिकारी कार्यालय ओरोसचे कीटक नाशक सहाय्यक सागर किनळेकर, मोरगाव पीएससीचे आरोग्य सेवक अमोल गवस, आरोग्य सेवक विशाल यादव आदी त्याठिकाणी ही मोहीम राबवित आहेत.