अनेक प्रश्न बेदखल
By Admin | Published: March 25, 2015 10:15 PM2015-03-25T22:15:20+5:302015-03-26T00:08:01+5:30
वसंत सरवणकर : देवगड पंचायत समिती सभा
पुरळ : खातेप्रमुख सभेला उपस्थित राहत नाही, अशी तक्रार वरिष्ठांकडे करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे त्यांची तक्रार लोकायुक्तांकडे करावी, अशी सूचना वसंत सरवणकर यांनी देवगड पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये लावून धरत मागील सभेच्या अनेक प्रश्नांची पूर्तता न झाल्याने खेद व्यक्त केला.देवगड पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा बुधवारी किसान भवन सभागृहात सभापती डॉ. मनोज सारंग यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती स्मिता राणे, गटविकास अधिकारी विजय चव्हाण आदी उपस्थित होते. तालुक्यामध्ये बनावट किटकनाशकांची विक्री केली जात आहे, असा प्रश्न माजी सभापती सरवणकर यांनी केला होता. या प्रश्नाची पुनरावृत्ती सरवणकर यांनी केली. यावेळी पंचायत समिती कृषी विभागाने सांगितले की, आम्हाला एकही बनावट औषध मिळालेले नाही. आमचा विक्रेत्यांवर लक्ष आहे. या उत्तरावर सरवणकर यांनी नाराजी व्यक्त करीत बनावट औषध खुलेआमपणे विक्री केली जाते याची चौकशी करा, असे सुचविले.
देवगड पंचायत समितीच्या दिवसभर चाललेल्या मासिक सभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्त वेळेत मिळण्यासाठी व देवगड प्रादेशिक नळयोजनेवरील अनधिकृत नळ जोडणीधारकांवर कारवाई करावी व शिरगावमधील पाण्याचे नियोजन करावे, असा महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली सभा सायंकाळी ६ वाजता संपली. अनेक विषयांवर चर्चा करून सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. सभेच्या सुरूवातीलाच मागील सभेचे इतिवृत्त वेळेत मिळत नसल्यावरून रवींद्र जोगल यांनी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केल्यावर यापुढे इतिवृत्त सभागृहात न देता सभेपूर्वी दहा दिवस अगोदर देण्यात येईल, असे सभापतींनी सांगितले. इळये पाटथर येथील दलित वस्तीतील रस्ता करणे या ६ लाखांच्या कामावर केवळ ६० हजार रूपये खर्च झाले. याची चौकशी करण्याची मागणी मागील बैठकीत मनस्वी घारे यांनी केली होती. या बैठकीत घारे यांनी पुन्हा प्रश्न उपस्थित केल्यावर अंदाजपत्रकाप्रमाणे काम झालेले नाही, असे स्पष्टीकरण उपअभियंता मोहिते यांनी
दिले. (वार्ताहर)
पाणी चोरीवरून अनेक प्रश्न उपस्थित
नळयोजनेवरून पाणी चोरीचा विषय सभागृहात सदस्यांनी उचलून धरला. मात्र, पाणी चोरी होत नाही असाच अहवाल पाणीपुरवठा विभागामार्फत प्राप्त झाला असल्याचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी सांगितले. रवींद्र जोगल यांनी देवगड नळयोजनेवर २१ अनधिकृत नळजोडण्या असून या जोडण्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. शिरगावमध्ये मुबलक पाणीपुरवठा होत असल्यामुळे या योजनेवरून देवगड, जामसंडे या गावांना होणारा पाणीपुरवठा नियमित होत नसल्याचे शिरगाव येथील पाणीपुरवठा नियंत्रणात आणावा, अशी मागणी हर्षा ठाकूर यांनी केली. सौंदाळे गावात सरपंचांच्या संगनमताने अनधिकृतरित्या पाण्याचा वापर व अपव्यय होत असून याबाबत चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी सदस्य प्रकाश गुरव यांनी केली.