उपाध्यक्षपदी एकनाथ नाडकर्णी
By Admin | Published: February 17, 2016 01:05 AM2016-02-17T01:05:19+5:302016-02-17T01:07:46+5:30
अपेक्षेप्रमाणे निवड : दोडामार्गकडे दोन पदे, कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे दोडामार्ग तालुक्यातील सासोली मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या एकनाथ नाडकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषद भवनात नाडकर्णी यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहात एकप्रकारे शक्तीप्रदर्शन केले होते. दरम्यान, नाडकर्णी यांची उपाध्यक्षपदावर वर्णी लावल्यामुळे दोडामार्ग तालुक्याला दोन पदे मिळाली आहेत.
रिक्त असणाऱ्या जिल्हा परिषद उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी निवड प्रक्रिया झाली. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर उपस्थित होते. यावेळी सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, सतीश सावंत, रणजीत देसाई, दिलीप रावराणे, अंकुश जाधव, प्रमोद कामत, रत्नप्रभा वळंजू, आत्माराम पालयेकर, संदेश सावंत, दीपलक्ष्मी पडते, संजय बोंबडी, भगवान फाटक, जिल्हा बँक उपाध्यक्ष सुरेश दळवी आदी उपस्थित होते.
उपाध्यक्ष पदासाठी एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. त्यामुळे नाडकर्णी यांची निवड झाल्याचे रवींद्र सावळकर यांनी जाहीर केले. यावेळी सभागृहात उपस्थित सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
एकनाथ नाडकर्णी हे दोडामार्ग तालु्क्यातील सासोली मतदार संघातून निवडून आले आहेत. शिवसेनेकडून निवडून आलेल्या एकनाथ नाडकर्णी यांनी वर्षभरातच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उपाध्यक्षपदाची सूत्रे नाडकर्णी यांच्याकडे सोपवली गेल्यामुळे दोडामार्ग तालुक्याला दोन पदे मिळाली आहेत. यापूर्वी पुढील पाच वर्षासाठी म्हणजे (सन २0१७पर्यंत) समाजकल्याण सभापती म्हणून अंकुश जाधव यांची वर्णी लागली आहे.
मंगळवारी सकाळी उपाध्यक्षपदी एकनाथ नाडकर्णी यांचे नाव निश्चित झाले होते. त्यामुळे सकाळच्या सत्रात नाडकर्णी यांचे कार्यकर्ते दोडामार्ग तालुक्यातून जिल्हा परिषद भवनात दाखल होत होते. ३०० ते ४०० कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहिल्याने एकनाथ नाडकर्णी यांनी शक्तीप्रदर्शनच घडवले. दुपारी नाडकर्णी यांची निवड झाल्याचे जाहीर होताच फटाक्यांची एकच आतषबाजी करण्यात आली. ढोलताशांच्या गजरात परिसर दूमदमून गेला होता. (प्रतिनिधी)
शिवसेनेतून आलेल्या दोघांनाही पदे : विरोधी गट सदस्यांची पाठ
शिवसेनेतून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते व एकनाथ नाडकर्णी या दोघांनी वर्षभरातच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानुसार दीपलक्ष्मी पडते यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदावर संधी देण्यात आली होती. तर आता एकनाथ नाडकर्णी यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. उपाध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया होती. यासाठी काँग्रेसचे सर्वच सदस्य उपस्थित होते. मात्र, या निवडणुकीकडे विरोधी गटाच्या सर्वच सदस्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले.
वेंगुर्ले तालुक्याची पाटी कोरीच
जिल्हा परिषदेच्या पाच वर्षांच्या कालावधीत काँग्रेस नेतृत्वाने वेंगुर्ले तालुक्याला एकच पद दिले होते. या टर्मच्या सुरूवातीलाच तत्कालिन जिल्हा परिषद अध्यक्ष निकिता परब यांना सव्वा वर्षासाठी संधी देण्यात आली होती. त्यानंतर वेंगुर्ले तालुक्याला कोणतेच पद देण्यात आलेले नाही.