सिंधुदुर्ग: तुटलेल्या वीज वाहिनीचा शॉक लागून वृद्धाचा मृत्यू, भिरवंडे येथील दुर्देवी घटना

By सुधीर राणे | Published: September 19, 2022 11:35 AM2022-09-19T11:35:37+5:302022-09-19T11:36:13+5:30

गुरांनाही विजेचा धक्का बसताच गुरे तिथून पळाली त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत.

Elderly dies due to shock from broken power line, incident in Bhirwande sindhudurg district | सिंधुदुर्ग: तुटलेल्या वीज वाहिनीचा शॉक लागून वृद्धाचा मृत्यू, भिरवंडे येथील दुर्देवी घटना

सिंधुदुर्ग: तुटलेल्या वीज वाहिनीचा शॉक लागून वृद्धाचा मृत्यू, भिरवंडे येथील दुर्देवी घटना

Next

कणकवली : कणकवली तालुक्यातील भिरवंडे-जांभुळभाटलेवाडी येथील शेतकरी सत्यवान नारायण सावंत (वय ७८) हे सोमवारी सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास घरापासून काही अंतरावर नेहमीप्रमाणे गुरे चरण्यासाठी घेऊन जात होते.त्यावेळी तुटलेल्या विद्युतभारित वीजवाहिनीला स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा तीव्र धक्का बसून मृत्यू झाला.

दरम्यान, एक वर्षापुर्वी अशाच प्रकारे घडलेल्या एका प्रकरणाची नुकसान भरपाई महावितरणकडून न मिळाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. त्यामुळे ठोस लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. अखेर महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी कागदपत्रे पुर्ण झाल्यावर दोन महिन्याच्या आत नुकसान भरपाई देण्याची ग्वाही ग्रामस्थांना दिली.

रोज सकाळी सत्यवान सावंत हे गुरे चारण्यासाठी घरापासून काही अंतरावर रानात घेऊन जात असत. रात्री किंवा पहाटे कधीतरी त्या वाटेनजीक खांबावरील वीजवाहिनी तुटून पडलेली होती. तेथून जात असताना गुरांना सौम्य झटका बसला असावा त्यामुळे गुरे उधळून पुढे गेली. मात्र, पाठोपाठ असलेल्या सत्यवान सावंत यांना तुटलेली वीजवाहिनी लक्षात न आल्याने ते पुढे जात असताना विद्युतभारीत वाहिनीचा त्यांना स्पर्श झाला आणि ते जोरदार विजेचा धक्का बसून तेथेच कोसळले. काही वेळाने ही घटना स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

मात्र वीजवाहिनी चालू असल्याने काहीच करता येत नव्हते. महावितरणच्या कर्मचार्‍यांना संपर्क साधून विजपुरवठा खंडीत करण्यात आला. पोलिस आणि महावितरणच्या अधिकार्‍यांना कळविण्यात आले. या दुर्घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ मोठया संख्येने जमा झाले. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत, माजी सरपंच मंगेश सावंत,  प्रथमेश सावंत, सरपंच सुजाता सावंत, उपसरपंच नितीन सावंत आदींनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते, उपकार्यकारी अभियंता  बगाडे, सहायक अभियंता धोरबोले हे घटनास्थळी दाखल झाले.

वर्ष-वर्ष उलटले तरी नुकसान भरपाई नाही

एक वर्षापुर्वी भिकाजी कोकरे यांचा अशाच प्रकारे तुटलेल्या वीजवाहिनीला स्पर्श होऊन मृत्यू झाला होता. मात्र त्यांच्या कुटंबियांना नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही असे सांगत ग्रामस्थ आक्रमक झाले. वर्ष-वर्ष उलटले तरी नुकसान भरपाई मिळत नाही, याला जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थांनी करत महावितरण अधिकार्‍यांना धारेवर धरले. अखेर त्या प्रकरणाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे तसेच सत्यवान सावंत यांच्या मृत्युप्रकरणी कागदपत्रे पुर्ण झाल्यावर दोन महिन्यात नुकसान भरपाई देण्याची ग्वाही कार्यकारी अभियंता मोहिते यांनी दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सावंत यांच्या  पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Elderly dies due to shock from broken power line, incident in Bhirwande sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.