सावंतवाडीतील ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 01:30 PM2020-11-13T13:30:09+5:302020-11-13T13:31:56+5:30
grampanchyat, elecation, sindhudurg, sawantwadi कोरोना कालावधीत लॉकडाऊनमुळे लांबलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल आता वाजणार आहे. सावंतवाडी तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या व लोकसंख्येने मोठ्या असलेल्या अकरा ग्रामपंचायतींच्या निवडणुका जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे.
सावंतवाडी : कोरोना कालावधीत लॉकडाऊनमुळे लांबलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल आता वाजणार आहे. सावंतवाडी तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या व लोकसंख्येने मोठ्या असलेल्या अकरा ग्रामपंचायतींच्या निवडणुका जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे.
तालुका निवडणूक अधिकारी यांनी याबाबत माहिती दिली असून सर्वच राजकीय पक्षांनी या गावांकडे लक्ष वळविले आहे. तालुक्यातील या अकरा ग्रामपंचायतींपैकी निम्म्या ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता होती. आता शिवसेना महाविकास आघाडी व भाजप अशी लढत रंगणार आहे. कोरोनामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. मात्र, आता हळूहळू सर्व व्यवहार सुरू होत असल्याने जिल्हा निवडणूक विभागाने लॉकडाऊन काळात रखडलेल्या जिल्ह्यातील ६७ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकप्रश्नी शुक्रवारी तहसील कार्यालयात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या उपस्थितीत झाली. मतदार यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणूक दिवाळीनंतर जाहीर होणार आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुका होतील, अशी अपेक्षा आहे.
सावंतवाडी मतदारसंघातील १६ ग्रामपंचायती
विधानसभा मतदारसंघात सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला अशा एकूण सोळा ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. सावंतवाडी तालुक्यात इन्सुली, आरोस, मळगाव, आरोंदा, तळवणे, मळेवाड, आंबोली, चौकुळ, दांडेली, कोलगाव, डिंगणे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर दोडामार्ग तालुक्यातील आयनोडे हेवाळे, तेरवणमेढे, कुडासे तर वेंगुर्ला तालुक्यात आरवली व सागरतीर्थ या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या ग्रामपंचायतींचा कालावधी ऑगस्टमध्ये संपला होता. त्यानंतर या ग्रामपंचायतीने प्रशासक नियुक्त केले आहेत.