कलमठ येथे विद्युतभारीत वीजवाहिनी तुटली, वाहनाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 01:27 PM2019-06-24T13:27:33+5:302019-06-24T13:29:48+5:30
कणकवली ते आचरा रस्त्यावरील कलमठ मच्छिमार्केटच्या बाजूला मुलांच्या वसतीगृहासमोर विद्युतभारीत वीजवाहिनी अचानक तुटून खाली पडली.
कणकवली : कणकवली ते आचरा रस्त्यावरील कलमठ मच्छिमार्केटच्या बाजूला मुलांच्या वसतीगृहासमोर विद्युतभारीत वीजवाहिनी अचानक तुटून खाली पडली.
तिथे उभी करून ठेवलेल्या चारचाकी गाडीवर ही वाहिनी पडल्याने गाडीच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. तर अचानक वीज भारमान वाढल्याने आजुबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांची तसेच व्यावसायिकांची विजेवर चालणारी उपकरणे जळाली आहेत. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी वायरमनशी संपर्क साधला असता त्याने उद्धट उत्तरे दिली . त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी कणकवली येथील वीज वितरणचे विभागीय कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
आचरा रस्त्यावरील कलमठ ते वरवडे दरम्यानच्या वीजवाहिन्या जीर्ण झाल्या असून त्या बदलाव्यात अशी मागणी वारंवार कलमठ तसेच वरवडे ग्रामस्थ करीत होते. मात्र, वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.
त्यामुळे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा फटका ग्रामस्थांना बसला.
कणकवली-आचरा मुख्य मार्गावरील कलमठ मच्छिमार्केटच्या बाजूला मुलांच्या वसतिगृहासमोर विद्युतभारीत वीजवाहिनी अचानक तुटून तिथे उभी करून ठेवलेल्या गाडी (क्रमांक एम एच ०७ - ए .जे . ११५२) वर पडली. छोटा हत्तीसारख्या या चारचाकी गाडीच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. तर आबा गुडेकर यांच्या गॅरेजमधील कॉम्प्रेसर व आॅलविन फर्नाडिस यांची वेल्डिंग मशीन जळाली आहे.
कलमठ बाजारपेठमधील दुकानदारांचेही नुकसान झाले आहे. घटना घडल्यानंतर वायरमन राकेश कुबल यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ग्रामस्थांना उद्धट उत्तरे दिली. त्यामुळे कलमठ, वरवडे येथील ग्रामस्थ आक्रमक होत वीज वितरणाच्या कणकवली येथील कार्यालयात अतिरिक्त कार्यकारी अभियंता भगत यांची भेट घेतली. यावेळी कार्यकारी अभियंता संजय गवळी तसेच शाखा अभियंता कानडे अनुपस्थित होते.
कलमठ, वरवडे येथील ग्रामस्थानी वारंवार जीर्ण विजवाहिनी बदलाची मागणी केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच ही घटना घडली आहे, असा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. तसेच शाखा अभियंता कानडे यांच्या बदलीची मागणीही केली.
नुकसान झालेल्यांना भरपाई द्यावी अशी मागणी अतिरिक्त कार्यकारी अभियंता भगत यांच्याकडे केली. त्यांनी कार्यकारी अभियंता संजय गवळी यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. त्यानंतर भगत यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने ग्रामस्थ शांत झाले.
यावेळी स्वाभिमान पक्ष युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, हनुमंत बोंद्रे, सुशांत राऊळ, नितीन पेडणेकर, आबा गुडेकर, आॅलविन फर्नांडिस, बाबा पारकर, पपू सावंत, अभि करंबेळकर, तोहसीन शेख, नंदू कोरगावकर उपस्थित होते.