Sindhudurg: वीज तारा चोरणारे २४ तासांत गजाआड, पाच संशयितांसह एक टेम्पोही ताब्यात
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 30, 2023 05:30 PM2023-08-30T17:30:27+5:302023-08-30T17:30:47+5:30
देवगड ( सिंधुदुर्ग ) : मिठबांव येथील वीजवितरणची १० हजार रुपये किमतीची अॅल्युमिनियम वायर चोरट्यांनी चोरून नेली होती. ही ...
देवगड (सिंधुदुर्ग) : मिठबांव येथील वीजवितरणची १० हजार रुपये किमतीची अॅल्युमिनियम वायर चोरट्यांनी चोरून नेली होती. ही घटना १६ ऑगस्ट रोजी दुपारी १:३० ते २७ ऑगस्ट रोजी दुपारी १:३० वा. या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या चोवीस तासांत पोलिसांनी पाच संशयितांसह एक टेम्पोही ताब्यात घेतला आहे.
या चोरीच्या प्रकरणात सागर भिकाजी शिंगाडे (२६ रा. वरेरी), बिपीन सुरेश चव्हाण (३७, रा. कुणकेश्वर), शाहरूख आयुब खान (२५, रा. मळई, जामसंडे), जुनैद कय्युम होलसेकर (१९, रा. देवगड किल्ला) आणि मोहनलाल सुरजबली निसाद (३७, रा. देवगड सातपायरी) या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिठबांव गजबार येथील वीज खांबावरील सुमारे १६८० मीटर लांबीची १० हजार रुपये किमतीची ॲल्युमिनियम वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. तसेच डीटीसी बॉक्स पेटीतील फ्यूज काढून फोडून नुकसान केले. याबाबत मिठबांव येथील वीजवितरणचे कर्मचारी संदीप भागोजी गोसावी (रा. पडेल) यांनी देवगड पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळी पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे व पोलिस उपनिरीक्षक एस. एल. कदम यांनी भेट दिली. दरम्यान, या चोरीप्रकरणी पोलिसांनी तीन संशयित युवकांना ताब्यात घेतले आहे. तसेच वायर आणण्यासाठी वापरलेला टेम्पोही ताब्यात घेतला असून, तपास पोलिस उपनिरीक्षक कदम करीत आहेत.
२४ तासांतच चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या
मिठबांव येथील वीजवितरणच्या तारांची चोरी करणाऱ्या पाच आरोपींच्या मुसक्या २४ तासांच्या आत आवळून त्यांना गजाआड करण्याची कौतुकास्पद कामगिरी देवगड पोलिसांनी केली आहे. पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुधीर कदम, हवालदार अमित हळदणकर, शिपाई नीलेश पाटील, विशाल वैजल, स्वप्नील ठोंबरे यांनी गुन्ह्याचा कसून तपास करून देवगड शहर व परिसरातील गावातील चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यासोबत चोरीस गेलेला मुद्देमाल ही जप्त केला आहे