वीज कोसळून तिघेजण जखमी
By admin | Published: June 2, 2016 10:55 PM2016-06-02T22:55:30+5:302016-06-03T00:48:13+5:30
मान्सूनपूर्वची हजेरी : दोडामार्गात वजरे, मोरगावमध्ये वीज पडली; करूळ घाटात दरडी कोसळल्या
दोडामार्ग, वैभववाडी : मेघगर्जनांसह दमदार सरींनी सिंधुदुर्ग जिल्ह्याात मान्सूनपूर्व पावसाने गुरुवारी हजेरी लावली. दोडामार्ग तालुक्यातील वजरे-भोमवाडी येथील शिरोडकर यांच्या घरावर वीज कोसळून वासुदेव अनंत शिरोडकर (वय २७), अनंत वासुदेव शिरोडकर (४५) हे जखमी झाले. त्यांच्यावर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मोरगाव बौद्धवाडीत घराच्या बाहेर थांबलेल्या प्रज्ञा बाळकृष्ण कदम (४५) या महिलेच्या बाजूला विजेचा लोळ पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.वैभववाडी तालुक्यातील करूळ घाट परिसरात तासभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे घाट रस्त्यावर जागोजागी छोट्या दरडी कोसळल्या. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. दरडींच्या पडझडीतून वैभववाडीकडे येणारी एस. टी. एका जागी थोडक्यात बचावली. दरम्यान, मालवण, कुडाळ, सावंतवाडी आणि कणकवली अशा सर्वच ठिकाणी गुरुवारी सायंकाळी दमदार पाऊस झाला. कणकवलीत माडावर वीज पडून नुकसान झाले.दोडामार्ग तालुक्यात गेल्या दोन दिवसांत काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरीही कोसळत होत्या; परंतु दोडामार्ग शहरासहतिलारी खोऱ्यात मात्र पावसाने हजेरी लावली नव्हती. वाढत्या उष्म्यामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने तालुकावासीयांमधून पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात होती. गुरुवारी अचानक पावसाने हजेरी लावली. या पहिल्या पावसाचा फटका दुचाकी चालकांना चांगलाच बसला. अनेक ठिकाणी दुचाक्या घसरून किरकोळ स्वरूपाचे अपघात झाले. मात्र, सुदैवाने मोठी हानी झाली नाही. पहिल्याच पावसात वीज वितरण व दूरध्वनी सेवेच्या मर्यादाही उघड झाल्या. तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला, तर दूरध्वनी यंत्रणाही बंद होती.दुपारी साडेतीनच्या सुमारास करूळ घाट परिसरात विजांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तासभर पाऊस पडल्याने घाटातील गटारांसह नाले तुडुंब भरून वाहत होते. घाटमार्गातील नालेसफाई झालेली नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे पाण्याच्या मोठ्या प्रवाहातून वाहनचालक चाचपडत होते. त्यामुळे वळणावर काही प्रमाणात वाहने खोळंबलेली दिसत होती. घाटाच्या मध्यावर चार ते पाच ठिकाणी छोट्या दरडी कोसळल्या. दरडींचे दगड रस्त्यावर पसरल्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागली. घाट उतरून वैभववाडीकडे येणाऱ्या एस.टी.समोर काही फुटांवरच छोटी दरड कोसळली. मात्र, त्या दरडीपासून एस.टी. बचावली. करूळ घाटासह तालुक्याच्या अन्य भागात पाऊस झाला. त्यामुळे या भागात येत्या दोन दिवसांत पेरण्या सुरू होण्याची शक्यता आहे.
काळ आला होता पण...
तालुक्यातील वजरे-भोमवाडीत चिरेखाणीतील काम करून परतताना वासुदेव अनंत शिरोडकर यांच्या घरावर वीज कोसळली. यामुळे बाप व मुलगा हे जखमी झाले; पण सुदैवाने त्यांच्याजवळ वीज कोसळल्याने ते बालंबाल बचावले.
‘दत्तकृपा’च्या कार्यकर्त्यांनी दगड केले बाजूला
वैभववाडीतील दत्तकृपा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते करूळ घाटात गुरुवारी बाटलीमुक्त घाटाच्या मोहिमेसाठी गेले होते. त्याच दरम्यान मुसळधार पावसामुळे घाटात दरडींची पडझड झाली. त्यामुळे घाटातून एकेरी वाहतूक सुरू होती. दत्तकृपाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर विखुरलेले छोटे दगड बाजूला करून वाहनांना होत असलेला दगडांचा अडथळा दूर करीत वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत केली.
माडावर वीज पडली
कणकवली शहरातील कनकनगर येथील पांडुरंग अर्जुन मेस्त्री यांच्या घराशेजारील माडावर गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास वीज पडली. त्यामुळे माडाचे नुकसान झाले आहे. तसेच माडाने पेट घेतला होता. मात्र, पाऊस सुरू झाल्याने आग आटोक्यात आली. त्यामुळे शेजारी असणाऱ्या घराचे नुकसान होण्यापासून टळले. या घटनेबाबत तहसील कार्यालयात कळविण्यात आल्यानंतर नायब तहसीलदार प्रभुदेसाई, ज्ञानेश्वर फड तसेच अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मेस्त्री यांच्या २५ वर्षे वयाच्या माडाचे प्रतिवर्षी सहा हजार रुपयांप्रमाणे नुकसान झाल्याची नोंद तहसील कार्यालयात करण्यात आली आहे.