शुक नदीत आढळले शोभिवंत मासे
By admin | Published: November 5, 2015 11:06 PM2015-11-05T23:06:09+5:302015-11-05T23:55:09+5:30
किंमती मासे नदीत कसे?
वैभववाडी : येथील शुक नदीच्या पात्रात सायंकाळी अचानक शोभिवंत रंगीत मासे आढळून आले. नदीकाठी फेरफटका मारायला गेलेल्या तरुणांना नदीच्या प्रवाहात मासे चमकताना दिसले. या माशांची शहरात नागरिकांमध्ये चर्चा होताच कुतुहलापोटी नदीवर बघ्यांची गर्दी झाली होती. वैभववाडी बाजारपेठ गुरुवारी दुपारनंतर बंद असते. त्यामुळे शहरातील चार पाच तरुण सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शुक नदीकाठी फेरफटका मारायला गेले होते. त्यांना नदीपात्रातील प्रवाहात काहीतरी चमकताना दिसले. त्यामुळे त्यांनी नदीत उतरुन पाहिले असता शोभिवंत मासे आढळून आले. या तरुणांनी काही मासे प्लास्टिकच्या पिशवीत पकडून शहरात आणले. त्यामुळे नदीतील रंगीत माशांची शहरात जोरदार चर्चा सुरू होती. त्यानंतर शहरातील नागरिकांनी नदीकाठी शोभिवंत मासे पाहण्यासाठी गर्दी केली होती. तालुक्यात काही सुशिक्षित तरुण शोभिवंत मत्स्य पालनाचा व्यवसाय करतात. परंतु नदीच्या पात्रात अशाप्रकारे अचानक शोभिवंत रंगीत मासे आले कोठून याचे अनेकांना कुतूहल होते. लालसर सोनेरी, सफेद आणि काळ्या रंगाचे हे मासे अचानक आढळून आले. त्यामुळे सायंकाळी शहरात हा औत्सुक्याचा विषय होता. (प्रतिनिधी)
किंमती मासे नदीत कसे?
शुक नदीच्या पात्रात आढळलेल्या माशांबाबत शोभिवंत मासे पालन व्यवसाय करणाऱ्यांकडे चौकशी केली असता, हे रंगीत मासे गोल्ड फिश, गुरामी, अबीनो शर्क व पेंगाशियर या शोभिवंत मत्स्य प्रजातीतील असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हे किंमती मासे नदीत कसे? हे कोडेच आहे.