मोर्लेतील युवकांवर टस्कर हत्तीचा हल्ला, भयभीत लोकांनी रात्र काढली जागून
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 08:39 AM2019-06-09T08:39:26+5:302019-06-09T12:25:33+5:30
काजूच्या बागेत घुसलेल्या हत्तीला हुसकवण्यासाठी गेलेल्या युवकांवर टस्कर (सुळे असलेला) हत्तीने हल्ला करण्याची घटना मोर्ले येथे शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
-सचिन खुटवळकर
दोडामार्ग - काजूच्या बागेत घुसलेल्या हत्तीला हुसकवण्यासाठी गेलेल्या युवकांवर टस्कर (सुळे असलेला) हत्तीने हल्ला करण्याची घटना मोर्ले येथे शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. युवकांनी अंधारातून धूम ठोकून जीव वाचवला. त्यानंतर सुमारे तासाभराने हत्ती नंदकिशोर येर्लेकर यांच्या घराजवळ दिसून आल्याने लोकांनी जीवाच्या भीतीने रात्र जागून काढली. हत्तीप्रश्नी वन खात्याचे दुर्लक्ष होत असून लोकांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिण टोकाकडील मोर्ले गावात टस्कर हत्तीने दहशत निर्माण केली आहे. तुषार देसाई यांच्या काजूच्या बागेत हत्ती आल्याचा सुगावा लागल्यावर काही युवक हत्तीला पिटाळून लावण्यासाठी गेले. बॅटरीच्या उजेडात अकस्मात हत्ती समोर बघून युवक गडबडले. त्याच वेळी जोरात ओरडत हत्ती युवकांवर धावून आला. गांगरलेल्या युवकांनी प्रसंगावधान राखून जीवाच्या आकांताने तेथून पळ काढला. या गडबडीत एकाची बॅटरी तिथेच पडली.
त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नंदकिशोर येर्लेकर यांच्या घराजवळच हत्तीने दर्शन दिले. त्यामुळे ग्रामस्थांची भीतीने गाळण उडाली. येर्लेकर यांच्या घराजवळ बांबूचे बेट व फणसाची झाडे आहेत. फणसाच्या वासाने आकर्षित होऊन सदर हत्ती तिथे आला असता, घराच्या बाहेरील बाजूस भांडी धुवत असलेल्या येर्लेकर यांच्या मुलीच्या निदर्शनास आला. तिने ही बाब आईवडील व शेजार्यांच्या कानावर घातली. काही धाडसी युवक व ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली असता, बॅटरीच्या उजेडात त्यांना टस्कर हत्ती दिसून आला. यावेळी हत्ती केवळ वीस ते पंचवीस मीटर अंतरावर होता. ग्रामस्थांनी हाकारल्याने हत्ती लगतच्या दाट झाडीत शिरला. दरम्यान, प्रथमेश गवस या युवकाने अंधारात बॅटरीच्या उजेडात मोबाईलवर हत्तीच्या हालचाली टिपल्या. त्यानंतर दोन वेळा दहा-पंधरा मिनिटांच्या फरकाने हत्ती त्याच ठिकाणी येऊन गेला.
या ठिकाणी घरे असल्याने लोकांनी अॅटमबाॅम्ब लावून हत्तीला पिटाळून लावले. मात्र कोणत्याही क्षणी तो माघारी येण्याची शक्यता असल्याने लोकांनी रात्र जागून काढली.
दरम्यान, वन खात्याच्या कर्मचार्यांचे पेट्रोलिंग करणारे वाहन घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्यांच्याजवळ खात्याने दिलेले अॅटमबॉम्ब व बॅटरीव्यतिरिक्त काहीच नसल्याने त्यांचा मुळीच उपयोग झाला नाही.
यावेळी नामदेव सुतार, न्हानू गवस, अशोक गवस, अजित गवस, समीर खुटवळकर, राजू सुतार, नितीन खुटवळकर, सतीश खुटवळकर, वासुदेव गवस, कांता गवस, यशवंत गवस, तुषार देसाई आदी युवक उपस्थित होते. घटनास्थळी प्रस्तुत प्रतिनिधीही उपस्थित होता.
...तर कायदा हातात घ्यावा लागेल!
मोर्ले गावचे सरपंच महादेव गवस व उपसरपंच पंकज गवस यांनी 'लोकमत'ला सांगितले की, तिलारी परिसरात गेले अनेक महिने हत्ती ठाण मांडून आहेत. अनेक गावांमध्ये शेती-बागायतीचे नुकसान त्यांनी केले आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याबाबत वन खाते व सरकार गंभीर नाही. आता हत्ती गावात आले असून लोकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. यापुढे शेती-बागायती करण्यासाठीही कोणी धजावणार नाही. त्यामुळे वन खाते हत्तींचा बंदोबस्त करत नसेल, तर नाइलाजाने लोकांना आत्मसंरक्षणासाठी कायदा हातात घ्यावा लागेल. आणि याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासनाची असेल!
वनमंत्री महोदय, एखादा बळी जाण्याची वाट बघत आहात का?
दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा उपद्रव गेले कित्येक महिने सुरू आहे. याची माहिती वनमंत्र्यांना नाही का, वनमंत्री आहेत तरी कुठे, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. एखाद्या नागरिकाचा हत्तींकडून बळी जाण्याची वाट ते बघत आहेत का? अशा तीव्र भावना व्यक्त होत आहेत.