तिलारी परिसरात हत्तींचा धुमाकूळ
By admin | Published: June 9, 2015 10:22 PM2015-06-09T22:22:38+5:302015-06-10T00:29:16+5:30
कोटींचे नुकसान : चोख बंदोबस्त करण्याची मागणी
कसई दोडामार्ग : गेल्या १५-२० दिवसांपासून बाबरवाडी तिलारी परिसरात धुमाकूळ घालत बागायतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून शेतकऱ्यांना कंगाल केले असतानाही जंगली हत्तींचा बंदोबस्त करण्यास वनविभागाकडून ठोस कारवाई केली जात नसल्याने बाबरवाडीतील संतप्त शेतकरी व भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांच्या नेतृत्वाखाली कोनाळ येथील वनअधिकाऱ्यांना घेराव घालून हत्तींचा तत्काळ बंदोबस्त करा, अशी मागणी केल्यानंतर बाबरवाडी व तिलारी कर्मचाऱ्यांना तैनात करून हत्तींना रोखले जाईल, असे आश्वासन वनपाल देसाई यांनी दिले.
गेल्या १५-२० दिवसांपासून बाबरवाडीत १०-१५ शेतकऱ्यांच्या तसेच तिलारी धरण परिसरात राजेंद्र म्हापसेकर यांच्या बागायतीत घुसून जंगली हत्तींनी केळी-माड बागायती, सुपारी, फणस व इतर झाडांचे मिळून क ोट्यवधी रुपयांचे नुकसान केले. जवळ जवळ सर्वच बागायती हत्तींच्या कळपाने पूर्णपणे भुईसपाट केल्याने शेतकरी भिकेकंगाल झाले आहेत. असे असताना वन विभागाकडून या हत्तींचा बंदोबस्त करण्यास पूर्णत: दुर्लक्ष केले जात असल्याने बाबरवाडीतील ३० ते ३५ शेतकरी, बागायतदार व राजेंद्र म्हापसेकर यांनी मंगळवारी सकाळी कोनाळ वन विभागाचे एम. डी. देसाई व इतर कर्मचाऱ्यांना घेराव घालून प्रश्नांचा भडिमार केला. जंगली हत्तींना रोखून शेतकऱ्यांना जगू द्या. अन्यथा शेतकऱ्यांच्या रक्षणाची व पालनपोषणाची जबाबदारी तुम्ही घ्या, अशा शब्दात कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली. गेल्या महिन्यापासून हत्तींकडून नुकसान होत असताना केवळ बघ्याची भूमिका घेण्यापलिकडे वनविभाग काही करू शकला नाही, हे सर्व आमच्या सहन करण्यापलिकडे गेले आहे, असे सांगून वनकर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
अखेर आजपासून बाबरवाडीत व तिलारीत वनकर्मचारी तैनात केले जातील, असे आश्वासन
वन अधिकाऱ्यांकडून देण्यात
आले. (वार्ताहर)