मोर्ले येथे पुन्हा हत्तींची दहशत; वस्तीजवळ वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 01:21 AM2019-06-01T01:21:52+5:302019-06-01T01:22:08+5:30
मात्र हत्ती आणखी आक्रमक झाले व ग्रामस्थांच्या दिशेने चाल करून आले.
सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील तिलारी परिसरात हत्तींनी पुन्हा उपद्रव सुरू केला असून मोर्ले येथे शुक्रवारी मध्यरात्री तीन हत्तींच्या कळपाने ग्रामस्थांची झोप उडवली. सरपंच महादेव गवस यांनी 'लोकमत'ला दिलेल्या माहितीनुसार, हत्तींनी बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. मोर्ले येथे एका वृद्धेचे शुक्रवारी रात्री निधन झाले. तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामस्थ रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गावालगतच्या स्मशानभूमीत गेले. तेथे नजीकच्या एका बागायतीत तीन हत्ती असल्याचा सुगावा लागला. ग्रामस्थांनी त्यांना हाकलून लावण्याचे प्रयत्न केले. मात्र हत्ती आक्रमक झाले व बागयतीची नासधूस करू लागले. अखेरीस काही युवकांनी गावात जाऊन फटाके आणले व हत्तींच्या दिशेने फेकले. मात्र हत्ती आणखी आक्रमक झाले व ग्रामस्थांच्या दिशेने चाल करून आले. हा प्रकार रात्री साडेबारा वाजता घडला. हत्तींच्या उपद्रवामुळे त्या वृद्धेच्या अंत्यविधीसाठी चिता रचणेही अवघड बनले होते.
रात्री उशिरापर्यंत हत्तींना हाकलून लावण्याचे प्रयत्न सुरू होते. घटनास्थळी उपसरपंच पंकज गवस, सदस्य समीर खुटवळकर, आबा चव्हाण, रमेश गवस आदी ग्रामस्थ उपस्थित होते. हत्ती वस्तीलगत येऊन ठेपल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे.