कणकवलीत महामार्ग ठेकेदारा विरोधात एल्गार, अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 05:14 PM2019-06-25T17:14:43+5:302019-06-25T17:16:55+5:30

कोण म्हणतो देणार नाय, घेतल्या शिवाय जाणार नाय, बंद करा, बंद करा, महामार्गाचे बोगस काम बंद करा! , दिलीप बिल्डकॉन हाय-हाय, लोकांची छळवणूक थांबलीच पाहिजे , सर्व्हिस रस्ते प्रथम झालेच पाहिजेत', अशा जोरदार घोषणा देत कणकवलीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरीक, सामाजिक संघटनांनी मंगळवारी महामार्ग चौपदरीकरण ठेकेदाराच्या गलथान कामाविरोधात एल्गार पुकारला . तसेच प्रशासनाला जाग आणण्यासाठी अचानक रस्ता रोको आंदोलन केले.

Elgar against Kankavali highway contractor, officials took charge | कणकवलीत महामार्ग ठेकेदारा विरोधात एल्गार, अधिकाऱ्यांना धरले धारेवर

कणकवली शहरातील रस्त्याबाबत प्रांताधिकारी चंद्रकांत मोहिते व प्रकाश शेडेकर यांच्याशी आंदोलनकर्त्यांनी चर्चा केली.

Next
ठळक मुद्देनागरिकांनी प्रशासनाला ठणकावले; कणकवलीतील काम पाडले बंद; जोरदार घोषणाबाजीसर्व्हिस मार्ग सुस्थितीत आणण्याच्या आश्वासनाअंती आंदोलन तूर्तास स्थगित

कणकवली : कोण म्हणतो देणार नाय, घेतल्या शिवाय जाणार नाय, बंद करा, बंद करा, महामार्गाचे बोगस काम बंद करा! , दिलीप बिल्डकॉन हाय-हाय, लोकांची छळवणूक थांबलीच पाहिजे , सर्व्हिस रस्ते प्रथम झालेच पाहिजेत', अशा जोरदार घोषणा देत कणकवलीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरीक, सामाजिक संघटनांनी मंगळवारी महामार्ग चौपदरीकरण ठेकेदाराच्या गलथान कामाविरोधात एल्गार पुकारला . तसेच प्रशासनाला जाग आणण्यासाठी अचानक रस्ता रोको आंदोलन केले.

पोलीसांनी मध्यस्थी केल्याने या रस्ता रोको आंदोलनामुळे जनतेला त्रास होऊ नये म्हणून ते थांबवून शहरातील महामार्ग ठेकेदाराचे काम बंद पाडण्यात आले. तसेच सर्व्हिस रस्ते सुस्थितीत करेपर्यंत ठेकेदाराने काम सुरू करू नये.असा इशाराही यावेळी देण्यात आला. नागरिकांच्या या अचानक पेटलेल्या आंदोलनामुळे प्रशासनाचे एकप्रकारे धाबे दणाणले. दरम्यान, प्रांताधिकारी कार्यालयात महामार्ग ठेकेदारासह दाखल झालेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्या आश्वासनाअंती दोन दिवसांसाठी हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

कणकवलीत मुंबई - गोवा महामार्गावर पडलेले खड्डे, धोकादायक सर्व्हिस रस्ते, तुंबलेली गटारे, चिखलमय रस्ते यासह अन्य समस्यांच्या पार्श्वभूमिवर कणकवली शहरातील नागरीकांनी प्रांताधिकारी चंद्रकांत मोहिते यांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी नायब तहसीलदार आर.जे.पवार उपस्थित होते.

या भेटीनंतर ठोस निर्णय न झाल्याने चौपदरीकरणाच्या प्रश्नांबाबत संतप्त नागरीकांनी आक्रमक भूमिका घेत प्रांत कार्यालयासमोर महामार्ग रोखून धरला. तसेच जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात बाळू मेस्त्री, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबळेकर, कणकवली सभापती सुजाता हळदिवे, दादा कुडतरकर, उदय वरवडेकर, आनंद अंधारी, रोटरी क्लबचे अध्यक्ष महेंद्र मुरकर, नगरसेविका मेघा गांगण, आशिये सरपंच रश्मी बाणे, अण्णा कोदे, संजय मालंडकर, डॉ. संदीप नाटेकर, महेश सावंत, पंकज दळी, हेमंत सावंत, व्हि़.के. सावंत, राजेंद्र पेडणेकर, आतिष जेठे, संदीप राणे, विलास कोरगांवकर, राजन दाभोलकर, सुशांत दळवी, सुनिल कोरगांवकर, दिपक बेलवलकर, तुषार मिठबावकर, विनायक सापळे, सादीक कुडाळकर, मिलींद बेळेकर, अनिल हळदिवे, बाबू राऊळ, योगेश सावंत, सुदीप कांबळे, तुकाराम राणे, प्रदीप मांजरेकर, सिध्देश सावंत, अ‍ॅड. एन. आर. देसाई , अजित नष्टे, रुपेश नेवगी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरीक सहभागी झाले होते.

कणकवली शहरातील महामार्गाची दुरावस्था झाली आहे. पावसामुळे या स्थितीत आणखीनच भर पडली आहे. वयोवृध्द नागरीकांना, शाळकरी मुलांना, महिलांना, वाहन चालकांना रस्त्याने प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. पादचाऱ्यांवर चिखल उडत आहे. याला जबाबदार कोण? अनेकदा निवेदने देवूनही तुम्ही या समस्यांकडे का दुर्लक्ष करता? अशी विचारणा अशोक करंबेळकर, बाळू मेस्त्री, दादा कुडतरकर आदींनी प्रांताधिकाऱ्यांना केली.

महामार्ग रस्त्याचे काम महामार्ग प्राधिकरणच्या माध्यमातून संबंधित ठेकेदार करत आहे़. त्यामुळे रस्त्याच्या तक्रारींबाबत माझी जबाबदारी आहेच. पण, त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवू़न वाद करून प्रश्न मिटणार नाही, अशी भूमिका प्रांताधिकाऱ्यांनी मांडत महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. आपण कुडाळ येथून येत असल्याचे प्रकाश शेडेकर यांनी यावेळी सांगितले. त्यानुसार आंदोलनकर्त्यांनी शेडेकर येईपर्यंत रस्ता रोखण्याचा इशारा देत प्रांत कार्यालयासमोरच रस्ता रोको आंदोलन केले.

रस्ता रोको होताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक जँबाजी भोसले, उपनिरीक्षक प्रकाश कदम यांच्यासह पथक दाखल झाले. यावेळी आंदोलक आणि पोलीसांत रस्ता अडविण्यावरून किरकोळ शाब्दीक बाचाबाची झाली़ . अखेर शिवाजी कोळी यांनी रस्ता रोखता येणार नाही. तुम्ही महामार्ग ठेकेदाराविरूध्द आंदोलन करून प्रश्न चर्चेतून सोडवा .असे सांगितले. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी महामार्गाचे काम बंद पाडण्याचे ठरविले. त्यानंतर रस्ता रोको मागे घेऊन संतप्त आंदोलक चालत अप्पासाहेब पटवर्धन चौकापर्यंत जात महामार्ग ठेकेदाराचे काम बंद पाडले.

त्यानंतर पटवर्धन चौकात रस्ता रोको करत ठेकेदाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आंदोलनकर्त्यांनी केली. त्यावेळी पोलीसांनी आपण प्रांत कार्यालयात चर्चेसाठी जावूया, असे सांगितले. अखेर आंदोलनकर्ते चालत प्रांत कार्यालयापर्यंत पोहोचले. त्या ठिकाणी प्रांत कार्यालयाच्या पायऱ्यांवरच ठाण मांडत आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.

आंदोलनकर्ते संतप्त !

उपअभियंता प्रकाश शेडेकर आंदोलनकर्त्यांची नजर चुकवून प्रांताधिकाऱ्यांच्या दालनात गेले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी पुन्हा घोषणाबाजी सुरू केली. शेडेकर हाय हाय, मुजोर ठेकेदाराचा निषेध असो अशी जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. चर्चा करायची असेल तर शेडेकर यांनी बाहेर आलेच पाहिजे . अशी मागणी आंदोलकांनी केली. त्यावेळी पोलीस निरीक्षकांनी ते चर्चेला बाहेर येणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे आंदोलक आणि पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. तेवढ्यातच पोलीसांनी दंगल काबू पथकाला पाचारण केले . चोख पोलीस बंदोबस्तात शेडेकर चर्चेसाठी बाहेर आले.

आंदोलकांचे मुद्दे शेडेकर यांनी ऐकून घेतले. कणकवलीतील चिखलमय रस्ता दुरूस्त करा, संपुर्ण सर्व्हिस मार्ग पुर्ण करा, गटारे अपुर्ण असल्याने नागरीकांना त्रास होत आहे, सर्व शहरातील रस्ते डांबरीकरण झाले पाहिजेत. माती टाकलेली चालणार नाही, असे अशोक करंबेळकर , बाळू मेस्त्री , संदीप मेस्त्री यांनी सांगितले. त्यावर रस्ता करून देतो, असे आश्वासन प्रकाश शेडेकर यांनी दिले.

दोन तासांत काम सुरू करण्याचे आश्वासन !

प्रकाश शेडेकर यांनी आश्वासन दिल्यावर आंदोलनकर्त्यांनी मागच्या प्रमाणे आमची फसवणूक केल्यास पुन्हा दोन दिवसात आम्ही आंदोलन करू, अशी भूमिका मांडली. प्रांताधिकारी चंद्रकांत मोहिते यांनी आंदोलनकर्त्यांशी बाहेर येऊन संवाद साधला. थातूर-माथूर काम केलेले चालणार नाही. चांगले रस्ते येत्या चार दिवसात पुन्हा करा. नागरीकांना त्रास होणार नाही, याची हमी द्या. ठेकेदाराची मस्ती सहन करू नका, अशा सूचना प्रांताधिकाऱ्यांनी प्रकाश शेडेकर यांना केल्या. तसेच आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी दालनामध्ये बोलविले.

यावेळी झालेल्या चर्चेत प्रकाश शेडेकर यांनी दोन तासात कणकवली शहरातील काम सुरू करतो. जोपर्यंत सर्व्हिस मार्ग पुर्ण करत नाही तोपर्यंत शहरातील चौपदरीकरणाचे काम करणार नसल्याचे आश्वासन पुन्हा एकदा आंदोलनकर्त्यांना दिले. त्यामुळे कामावर आम्ही लक्ष ठेवणार असे सांगत आंदोलनकर्ते शांत झाले.

 

Web Title: Elgar against Kankavali highway contractor, officials took charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.