CoronaVirus Lockdown : रेल्वे विरोधातील एल्गार आंदोलन स्थगित : डी. के. सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 11:32 AM2020-04-21T11:32:59+5:302020-04-21T11:35:40+5:30

कोरोनाच्या संकटामुळे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सावंतवाडी रेल्वे स्थानकावर १ मे रोजी होणारे एल्गार आंदोलन स्थगित करून ते १५ आॅगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष डी. के. सावंत यांनी दिली.

Elgar agitation against railway postponed: D. K Sawant | CoronaVirus Lockdown : रेल्वे विरोधातील एल्गार आंदोलन स्थगित : डी. के. सावंत

CoronaVirus Lockdown : रेल्वे विरोधातील एल्गार आंदोलन स्थगित : डी. के. सावंत

googlenewsNext
ठळक मुद्देरेल्वे विरोधातील एल्गार आंदोलन स्थगित : डी. के. सावंत विनायक राऊत यांचे मानले आभार; १५ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलले

सावंतवाडी : कोरोनाच्या संकटामुळे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सावंतवाडी रेल्वे स्थानकावर १ मे रोजी होणारे एल्गार आंदोलन स्थगित करून ते १५ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष डी. के. सावंत यांनी दिली.

गेल्या आठवड्यात खासदार विनायक राऊत यांनी गणेश चतुर्थीनिमित्त कोकण रेल्वे आरक्षण कालावधी कमी करण्याच्या मागणीसाठी रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यासाठी पत्रव्यवहार
केला. याबद्दल डी. के. सावंत यांनी खासदारांचे आभार मानले आहेत.

गेल्या बावीस वर्षांत रेल्वे प्रवाशांच्या रास्त मागण्या असूनही रेल्वे प्रशासन नेहमीच दुर्लक्ष करीत असल्याने नाईलाजाने आम्हांला अनेकवेळा विविध आंदोलने करून लक्ष वेधून घ्यावे लागले. कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्या ह्या कोकणी प्रवाशांच्या सोयीसाठी नसून सर्व दृष्टीने गैरसोयीच्या आहेत, असे सावंत यांनी सांगितले.

कोकण रेल्वे प्रशासन प्रवाशांची चारही बाजूंनी लूट करूनही दखल घ्यायला प्रशासन तयार नाही. कुठच्याही मागणीसाठी रेल्वे बोर्डाकडे बोट दाखविले जाते. हे जर खरे असेल तर प्रवाशांच्या मागण्यांबाबत रेल्वे बोर्डाशी काय पत्रव्यवहार केला ते कोकण रेल्वे प्रशासनाने जाहीर करावे.

आमच्या माहितीप्रमाणे कुठलेही वरिष्ठ नियंत्रण बोर्ड प्रशासनाशी विचारविनिमय केल्याशिवाय निर्णय घेत नाही. स्थानिक समस्या दिल्लीत बसून समजत नाहीत. असे असताना कोकण रेल्वे प्रशासन महंमद तुघलकाच्या भूमिकेत आहे. याची दखल घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही सावंत म्हणाले.

वास्तविक रेल्वे प्रवाशांच्या समस्या रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन सोडविणे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. परंतु कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी स्थानिक कर्मचाऱ्यांना विश्वासात घेणे कमीपणाचे मानतात आणि म्हणूनच प्रवाशांच्या या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत, असे ते म्हणाले.

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने १ मे रोजी सावंतवाडी रेल्वे स्थानकावर एल्गार आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु प्राप्त परिस्थितीत देशावरील कोरोना संकट लक्षात घेता हे आंदोलन १५ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.

याची दखल घेऊन खासदार विनायक राऊत आणि जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधींनी आमच्या रास्त मागण्यांबाबत रेल्वे बोर्डाशी पत्रव्यवहार करून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा कोकण रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे करण्यात येत आहे, असे सावंत म्हणाले.

Web Title: Elgar agitation against railway postponed: D. K Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.