प्रलंबित वेतनासाठी एस टी कामगार संघटनेचा एल्गार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 05:49 PM2020-10-01T17:49:51+5:302020-10-01T17:55:59+5:30
ST workers union, pending wages, sindhudurg news एसटी कामगारांना ७ ऑक्टोबर पर्यंत प्रलंबित वेतन न मिळाल्यास महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्यावतीने विभागीय कार्यालयासमोर ९ ऑक्टोबर रोजी उपोषण करण्याचा निर्णय संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी घेतला आहे. अशी माहिती संघटनेचे प्रदेश सचिव दिलीप साटम यांनी दिली आहे.
कणकवली : एसटी कामगारांना ७ ऑक्टोबर पर्यंत प्रलंबित वेतन न मिळाल्यास महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्यावतीने विभागीय कार्यालयासमोर ९ ऑक्टोबर रोजी उपोषण करण्याचा निर्णय संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी घेतला आहे. अशी माहिती संघटनेचे प्रदेश सचिव दिलीप साटम यांनी दिली आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोविड - १९ च्या महामारीत एस. टी. कामगार जिवाची बाजी लावून काम करीत आहेत. मात्र, तीन -तीन महीने वेतन मिळत नसल्याने हे कामगार हवालदील झाले आहेत. उपासमारीमुळे तर काही जणांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.
वेतन कायद्यानुसार महामंडळाने वेळेवर वेतन देणे बंधनकारक असताना निधी नसल्याचे कारण सांगुन राज्यसरकारकडून मदत मागितली आहे. परंतु , या वेतनासाठी तीही मदत मिळेनाशी झालेली आहे. याबाबत संघटननेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार , परिवहन मंत्री ऍड. अनिल परब तसेच प्रशासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. तसेच प्रत्यक्ष भेटून विनंतीही केली आहे. मात्र, पगार मिळण्यास विलंब होत आहे.
त्यामुळे येत्या ७ ऑक्टोबर पर्यंत जुलै व ॲागस्ट या दोन महीन्यांचे प्रलंबित वेतन व सप्टेंबर महिन्यांचे देय वेतन न मिळाल्यास महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्यावतीने विभागाचे पदाधिकारी राज्यभरातील सर्व विभागीय कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत.असेही दिलीप साटम यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.