सारस्वत बँकेच्या वैभववाडी शाखेत साडेतीन कोटीचा अपहार; कर्मचाऱ्यानेच मारला २८ ग्राहकांच्या ठेवींवर डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 09:32 PM2020-06-26T21:32:52+5:302020-06-26T21:34:00+5:30
सारस्वत बँकेच्या येथील शाखेत प्रल्हाद मांजरेकर(रा. नाधवडे, ता.वैभववाडी) हा ज्युनियर ऑफिसर पदावर कार्यरत होता.
वैभववाडी(सिंधुदुर्ग): सारस्वत बँकेच्या एका कर्मचाऱ्यांने ग्राहक आणि बँक व्यवस्थापकासह सहका-यांचा विश्वास संपादन करुन प्रल्हाद मनोहर मांजरेकर या बँक कर्मचा-याने तब्बल ३ कोटी ५१ लाख ३७ हजार रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार येथे उघड झाला आहे. त्याने २८ ग्राहकांच्या ठेवींवर डल्ला मारल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याने या प्रकरणी बँकेच्या व्यवस्थापकाने मांजरेकर विरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार त्याच्याविरुद्ध ग्राहकांची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
सारस्वत बँकेच्या येथील शाखेत प्रल्हाद मांजरेकर(रा. नाधवडे, ता.वैभववाडी) हा ज्युनियर ऑफिसर पदावर कार्यरत होता. बँकेत काम करीत असताना या कर्मचाऱ्याने ग्राहक, बँकेचे कर्मचारी आणि बँकेच्या शाखा व्यवस्थापकाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने काही ठेवींदारांच्या ठेवी त्यांची कोणतीही संमती न घेता परस्पर हडप करण्यास सुरुवात केली. एकेक करीत त्याने २८ ठेवीदारांच्या तब्बल ३ कोटी ५१ लाख ३७ हजार रुपयांवर डल्ला मारला आहे.
एका ठेवीदाराची बँकेतील मोठी रक्कम परस्पर हडप झाल्याचा प्रकार जानेवारीत त्या ठेवीदाराच्या लक्षात आला होता. ही माहीती बँकेच्या अन्य ठेवीदारांना समजल्यानंतर त्यांनी आपापल्या ठेवींची चौकशी केली असता त्यातून धक्कादायक माहीती पुढे येऊ लागली. अनेकांच्या ठेवी त्यांच्या समंत्तीशिवाय बँकेतून गायब झाल्याचे उघड होऊ लागल्याने त्यानतंर अनेक ठेवीदारांनी आपले पैसे बँकेतून काढून घेतले होते. तर काही ठेवीदारांनी बँकेत जाऊन धिंगाणाही घातला होता. त्यानंतर बँकेच्या वरिष्ठानी या प्रकाराची दखल घेतली.
बँकेच्या विभागीय व्यवस्थापकांमार्फत अपहारित व्यवहारांची चौकशी करण्यात आली. त्या चौकशीअंती बँकेच्या २८ ग्राहकांची ३ कोटी ५१ लाख ३७ लाख रुपये रक्कम बँकेचे कर्मचारी प्रल्हाद मांजरेकर याने हडप केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार बँकेचे शाखाधिकारी नीलेश श्रीकृष्ण वालावलकर यांनी मांजरेकर याच्याविरोधात गुरुवारी(ता.२५) वैभववाडी पोलीसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलीसांनी मांजरेकर याच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.
मृत खातेदारांच्या ठेवीही गायब
सारस्वत बँकेचे खातेदार असलेल्या काही ठेवीदारांचे निधन झालेले आहे. या मृत खातेदारांच्या नावावर लाखो रुपयांच्या ठेवी होत्या. त्या ठेवीदेखील गायब झाल्याची चर्चा आहे. एका मृत ठेवीदारांच्या पाच पाच लाखांच्या तीन मुदत ठेवी परस्पर हडप केल्याचीही जोरदार चर्चा आहे.
'त्या' कर्मचा-याचे पुर्वीच झालेय निलंबन
शाखेतील कर्मचा-याच्या गैरव्यवहारांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. त्यामध्ये आढळून आलेल्या बाबींच्या आधारे बँकेच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसार आपण पोलीसांत तक्रार दिली असून त्या कर्मचाऱ्यांचे यापुर्वीच निलंबन करण्यात आले आहे, असे सारस्वत बँकेचे शाखा व्यवस्थापक निलेश वालावलकर यांनी स्पष्ट केले.