आपत्कालीन बैठकीत वीजवितरण, बांधकाम विभागावर नागरिकांनी व्यक्त केला रोष
By अनंत खं.जाधव | Published: July 24, 2023 03:17 PM2023-07-24T15:17:51+5:302023-07-24T15:46:52+5:30
सावंतवाडी : सावंतवाडीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत आपत्कालीन बैठक पार पडली. या बैठकीत येवून नागरिकांनी विद्युत ...
सावंतवाडी : सावंतवाडीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत आपत्कालीन बैठक पार पडली. या बैठकीत येवून नागरिकांनी विद्युत विभागासह बांधकाम विभागावर आपला रोष व्यक्त केला. त्यावर केसरकर यांनी अधिकाऱ्यांनी गावात जाऊन पाहाणी करावी आणि त्याच्या समस्या सोडवाव्यात अशा सुचना केल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची आपत्कालीन बैठक काल, रविवारी उशिरा मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत सावंतवाडीत पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्षमी, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपवनसंरक्षक एस.एन.रेड्डी, निवासी जिल्हाधिकारी मच्छीद्र सुकटे, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसिलदार श्रीधर पाटील, आपत्कालीनच्या राजश्री सामंत, सचिन वालावलकर, जिल्हाप्रमुख संजय आग्रे, अशोक दळवी, बबन राणे, गणेशप्रसाद गवस आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात गत वर्षीच्या तुलनेत यावेळी दमदार पाऊस झाला. मात्र प्रशासनाकडून योग्य ती दक्षता घेतल्याने लोकांना चांगल्या सुविधा मिळाल्या आहेत. मात्र प्रशासनाने अजून ही चांगले काम केले पाहिजे. ज्या ठिकाणी खरोखरच आपत्ती येईल तिथे लोकांमध्ये जागृती करावी. शाळा रिकामी करून त्याना राहण्याची व्यवस्था करावी असे केसरकर यांनी सांगितले.
यावेळी नागरिकांनी बैठकीत येवून विद्युत विभागावर आपली नाराजी व्यक्त केली. बांदाचे सरपंच प्रियंका नाईक यांनी तर गावात विजेची समस्या असताना त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. ओटवणे येथे विद्युत वाहिनी पडून मुलाचा मृत्यू झाला तसेच अनेक गावात वीज वाहिनी पडून गुरे दगावली अश्या तक्रारी केल्या. यावर मंत्री केसरकर यांनी विद्युत विभागाने गावात जाऊन स्वत: पाहणी करावी अशी सुचना केली.
आंबोली घाटात दरड कोसळली ती काढण्यासाठी बारा तास लागले. याबाबत सर्वगौड यांनी जेसीबी चालक दरड काढण्यास घाबरत होता असे उत्तर दिले. तर मंत्री केसरकर यांनी सावंतवाडी दोडामार्ग मार्गावर रस्त्यावर पाणी आल्याने रस्ते खराब होतील यावर उपाय योजना कराव्यात अशी सुचना केली. तसेच बांदा तसेच ओटवणे आंबोली चौकुळ येथे कायमस्वरूपी एक होडी ठेवण्यात यावी अशी सुचना महसूल प्रशासनास केली तसेच पूर परस्थीतीच्या पाश्र्वभूमीवर बांदा येथे एक निवारा शेड उभी राहिल्यास दुकान दाराच्या सामानाचे नुकसान होणार नसल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.
सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक घराचे नुकसान
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 159 घराचे अतिवृष्टीत नुकसान झाले आहे.यातील 110 घरे ही सावंतवाडी तालुक्यातील असल्याचे प्रशासनासाकडून सांगण्यात आले.
केसरकर स्वत: आर्थिक मदत देणार
सावंतवाडी तालुक्यात जी घरे कोसळून नुकसान झाले आहे या घरांना प्रशासन मदत देणार आहे. मात्र माझ्याकडून ही थोडी फार नुकसान भरपाई दिली जाईल असे मंत्री केसरकर म्हणाले.