पोलिसांना आपत्कालीन प्रशिक्षण, सागरी सुरक्षा दलाकडून मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 12:34 PM2020-06-11T12:34:17+5:302020-06-11T12:35:54+5:30
पावसात पूरस्थिती अथवा आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास पोलिसांना नागरिकांना तत्काळ मदत करता येणे आवश्यक आहे. त्यासाठी देवगड येथील सागरी सुरक्षा दलाच्यावतीने कलमठ कुंभारवाडी येथील नदीपात्रात कणकवलीतील पोलीस कर्मचाऱ्यांना बोट चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच आपत्कालीन स्थितीत करायच्या उपाययोजनांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
कणकवली : पावसात पूरस्थिती अथवा आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास पोलिसांना नागरिकांना तत्काळ मदत करता येणे आवश्यक आहे. त्यासाठी देवगड येथील सागरी सुरक्षा दलाच्यावतीने कलमठ कुंभारवाडी येथील नदीपात्रात कणकवलीतील पोलीस कर्मचाऱ्यांना बोट चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच आपत्कालीन स्थितीत करायच्या उपाययोजनांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
सिंधुदुर्गात गेल्या वर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. यावेळी उपलब्ध असलेल्या बोटींचे वजन जास्त असल्याने एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करण्यास अवघड होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यातील सावंतवाडी, बांदा, कणकवली, आचरा, दोडामार्ग, वेंगुर्ला आदी ८ पोलीस ठाण्यात रेस्क्यू बोट दिली आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, जंबाजी भोसले, सागरी सुरक्षा दलाचे जे. बी. साळुंखे, शकील हमीद, एस. पी. खांदार, व्ही. आय. कराळे, व्ही. बी. चव्हाण, एम. एस. गुरव आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.