वाढत्या वीज समस्यांसाठी कर्मचाऱ्यांची गरज
By admin | Published: June 27, 2016 10:44 PM2016-06-27T22:44:27+5:302016-06-28T00:33:16+5:30
बांदा परिसरातील स्थिती : शहर मर्यादेच्या तुलनेत कर्मचारी कमी; २४ तास सेवा देऊनही अधिकाऱ्यांचे प्रयत्न ठरताहेत निष्फळ
नीलेश मोरजकर --बांदा शहर व परिसरात गेल्या महिनाभरात वीज अचानक गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे येथील वीज ग्राहक हे त्रस्त झाले आहेत. वीज वितरण कंपनीच्या बांदा विभागातील २३ गावांमध्ये तब्बल २१ हजार ५00 वीज जोडण्या आहेत. येथील विजेच्या समस्या या वाढत्याच असून, त्या तुलनेत कर्मचारी संख्या कमी असल्याने या समस्यांचे तातडीने निराकरण करणे हे अशक्यप्राय होते. परिणामी ग्राहकांचा नाराजीला बांद्यातील अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागते. बांदा हे ग्रामीण भागात येत असल्याने येथे काम करण्यासाठी मर्यादा येत आहेत. अशा स्थितीतही येथे नव्यानेच आलेले अधिकारी हे २४ तास सेवा बजावून येथील समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, येथील भौगोलिक परिस्थिती, जंगल भागातून गेलेल्या लाईन या काम करण्यासाठी अडचणीच्या ठरत आहेत.
बांदा शहर व परिसरातील गावांमध्ये विजेच्या समस्या या गंभीर असून, याबाबत ग्राहकांचा मोठा रोष आहे. यामुळे गेल्या काही कालावधीत वीज ग्राहकांकडून येथील अधिकाऱ्यांना घेराव घालण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. अपुरा कर्मचारी वर्ग, जीर्ण झालेल्या वीज वाहक तारा, विद्युत खांब यामुळे विजेच्या समस्या या वाढत्याच आहेत.
वीज वितरण कंपनीच्या बांदा विभागीय कार्यालयात दोन विभाग आहेत. बांदा १ मध्ये बांदा शहर, डेगवे, वाफोली, नेतर्डे, विलवडे, भालावल, डिंगणे, गाळेल, डोंगरपाल, शेर्ले ही गावे येतात. या विभागासाठी सहायक अभियंता म्हणून सुभाष आपटेकर कार्यरत आहेत. बांदा २ मध्ये असनिये, आरोस, तांबोळी, कोनशी, नांगरतास, सरमळे, दाभिल, कास, निगुडे, पाडलोस, मडुरा, इन्सुली, रोणापाल ही गावे येतात. या विभागासाठी कनिष्ठ अभियंता पी. के. आखाडे हे कार्यरत आहेत. या दोन्ही विभागातील गावांमध्ये तब्बल २१ हजार ५00 घरगुती, व्यावसायिक वीज जोडण्या आहेत.
दोन्ही विभागांतील २३ गावांसाठी कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने काम करताना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. बांदा एकमध्ये नेतर्डे, गाळेल, डिंगणे, डोंगरपाल या गावांसाठी, तर बांदा २ मध्ये मडुरा, रोणापाल, दाभिल, सरमळे, कोनशी, तांबोळी या गावांसाठी एकही कर्मचारी नसल्याने येथील वीज ग्राहक हे वाऱ्यावरच आहेत. बांदा २ साठी मुख्य तंत्रज्ञच नसल्याने त्यांना बांदा १ वर अवलंबून रहावे लागते. बांदा शहरामध्ये ६000 वीज जोडण्या आहेत, तर या विभागातील ९ गावांमध्ये सुमारे १५ हजार वीज जोडण्या आहेत. बांदा येथे तक्रारींची संख्याही अधिक आहे. बांदा शहरासह विभागात केवळ १ लाईनमन, १ विद्युत सहायक व २ तंत्रज्ञ आहेत. २१ हजार वीज जोडण्यांसाठी हा अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने या कर्मचाऱ्यांना विजेच्या समस्या सोडविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. बांदा शहरात २२५ स्ट्रिटलाईट असून, या दिव्यांची देखभाल दुरुस्तीदेखील करावी लागते.
निवेदन देऊनही ‘जैसे थे’ स्थिती
बांदा शहरात २५ ट्रान्स्फॉर्मर (वीज जनित्र), तर बांदा विभागात ६0 जनित्रे आहेत. बांदा २ मध्ये ४३ जनित्रे आहेत. या जनित्रांचीदेखील देखभाल व दुरुस्तीची कामे वारंवार करावी लागतात. बांदा येथील नागरीकरणात वाढ होत आहेत. परिणामी वीज ग्राहक झपाट्याने वाढत आहेत. येथील समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, रात्रीच्या वेळीदेखील वीज गायब होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यासाठी बांद्यात रात्रपाळीसाठी २ कर्मचारी द्यावेत असे पत्र सहाय्यक अभियंता आपटेकर यांनी ३0 मे रोजी कार्यकारी अभियंत्यांना दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत कर्मचारी देण्यात आले नाहीत.