कर्मचाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे

By admin | Published: May 11, 2016 11:16 PM2016-05-11T23:16:47+5:302016-05-11T23:55:52+5:30

वनविभाग वाऱ्यावर : सुरक्षेसाठी अपुरी साधने, जीवावर उदार होऊनच कार्य

Employees' safety Ram Bharose | कर्मचाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे

कर्मचाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे

Next

वैभव साळकर -- दोडामार्ग --तिलारी खोऱ्यात हैदोस घालणाऱ्या आणि शेतकऱ्यांवर जीवघेणे हल्ले करणाऱ्या जंगली हत्तींना पिटाळून लावण्यासाठी नेमण्यात आलेल्या सिंधुदुर्गातील वनकर्मचाऱ्यांची सुरक्षा मात्र रामभरोसे आहे. काही वर्षांपूर्वी कुडाळ येथे एका वनकर्मचाऱ्याचा हत्तींच्या हल्ल्यात मृत्यू झाला असतानाही वनकर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत मात्र वनविभाग आणि राज्यशासन अद्याप गंभीर नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या वनकर्मचाऱ्यांचीच सुरक्षा धोक्यात आली आहे.
सिंधुदुर्गात गेल्या पंधरा वर्षांपासून जंगली हत्तींचे संकट आहे. प्रामुख्याने दोडामार्ग तालुक्याला लागलेले हे ग्रहण अद्याप सुटण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे वनकर्मचारी आणि शेतकरीही हत्तीसंकटामुळे हैराण झाले आहेत. फेब्रुवारी सन २००२ मध्ये सर्वात प्रथम जंगली हत्तींचे आगमन दोडामार्ग तालुक्यात झाले. मांगेली गावात कर्नाटकातून आलेल्या हत्तींनी सर्वप्रथम प्रवेश केला आणि त्यानंतर पुढे हत्तींचा प्रवास सुरू झाला. सुरूवातीला मांगेलीमधील शेतकऱ्यांनी गजांतलक्ष्मी संबोधून हत्तींच्या पावलांची पूजा केली. मात्र, याच हत्तींनी तेथील शेतकऱ्यांची भातशेती पायदळी तुडवत शेतकऱ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी केली. हत्तींच्या धास्तीने मांगेलीत आजही शेती करणे शेतकऱ्यांनी सोडून दिले आहे. दोडामार्गमार्गे गोवा राज्यासहीत जिल्ह्यातील कुडाळ, माणगाव खोरे, कणकवली, मालवण, ओरोस अशी धडक या हत्तींनी मारली. या काळात शेतकऱ्यांची भातशेती, माड, पोफ ळी आणि केळीच्या बागायती पायदळी तुडवत कोट्यवधी रूपयांचे नुकसान शेतकऱ्यांनी केले. हत्तींना आवर घालण्यासाठी शेकडो वनकर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. रात्रीच्यावेळी गस्त घालण्याचे काम हे वनकर्मचारी करायचे. त्यामुळे हत्ती आणि वनकर्मचारी असू जणू समीकरणच तयार झाले. हातात बॅटरी, फटाके आणि अ‍ॅटमबॉम्ब एवढेच साहित्य घेऊन हत्तींना हाकलवून लावण्याची ही मोहीम या वनकर्मचाऱ्यांवर होती. पण सुरक्षेच्या दृष्टीने मात्र कोणतेच साधन नव्हते. अशा परिस्थितीत जंगलात दबा धरून बसलेले हत्ती रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात कधी हल्ला करतील, याची शाश्वती नसायची. त्यामुळे जीव मुठीत धरून दिलेली मोहीम फत्ते करण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर होती. गेली दोन वर्षे दोडामार्ग तालुक्यात आणि पर्यायाने तिलारी खोऱ्यात हत्तींची जाग नव्हती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा तिलारी खोऱ्यात बाबरवाडी, बिजघर व बोरयेवाडी या परिसरात हत्तींच्या संकटाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दरदिवशी शेती बागायतीचे नुकसान होत असल्याने वनकर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा हत्तींची ‘ड्युटी’ सुरू झाली आहे. मात्र, त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतेच साधन नसल्याने वनकर्मचारी हतबल आहेत. दोन दिवसांपूर्वीच बाबरवाडी येथे वनकर्मचारी आणि शेतकऱ्यांवर टस्कर हत्तीने हल्ला चढविला. या हल्ल्यात वनकर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे शेतकरी आणि गस्तीवरील कर्मचारी थोडक्यात वाचले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. मात्र, या प्रकारामुळे वनकर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
वनकर्मचाऱ्यांना सुरक्षिततेसाठी फायबरच्या लाठ्या आणि शिल्ड (ढालसदृश वस्तू) देण्यात आली आहे. मात्र, या वस्तू हत्तीसारख्या महाकाय प्राण्याच्या तुलनेत फारच नगण्य आहेत. त्यांच्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी काहीच उपयोग नाही. त्यामुळे गस्तीवर असणाऱ्या या वनकर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरूनच काम करावे लागत आहे. एकंदरीत वनकर्मचाऱ्यांची सुरक्षा मात्र रामभरोसे आणि बेभरवशाची असून, राज्यशासन मात्र अद्याप कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्याबाबतीत कानाडोळा करत आहे.

Web Title: Employees' safety Ram Bharose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.